30.4 C
Pune
Sunday, May 19, 2024

एफडीआय आणि एफआयआय मध्ये काय फरक आहे?

भांडवल बाजारात काम करणा-या मंडळींसाठी एफडीआय आणि एफआयआय हे दोन शब्द गोंधळ निर्माण करणारे असतात. दोन्ही शब्दांची सुरूवात एफ ने होते म्हणून नाही तर फॅारेन हा शब्द कॅामन आहे म्हणून. तर या सदरात आपण पाहणार आहोत या दोन संक्षिप्त स्वरूपात वापरल्या जाणा-या दोन संज्ञामधील फरक.

फॅारेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर (एफआयआय) म्हणजे असा गुंतवणूकदार किंवा गुंतवणूक निधी आहे जो कोणत्याही परदेशातील कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतो. फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर हा शब्द बहुधा भारतात वापरला जातो. एफआयआय म्हणजे अश्या परदेशी संस्था ज्या देशाच्या आर्थिक बाजारपेठांमध्ये गुंतवणूक करतात.

फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असे परदेशी गुंतवणूकदार आहेत जे भारतात गुंतवणूक करतात. एफआयआय कोणत्याही देशातील म्युच्युअल फंड किंवा इन्श्युरन्स बिझनेस असू शकतात. एफआयआयनी सेबीकडे आपली नोंदणी करणे आवश्यक असते. एफआयआयला  एफपीआय (फॉरेन पोर्टफोलिओ  इन्व्हेस्टर) म्हणून देखील ओळखले जाते. एफआयआय मध्ये परकीय चलन गुंतलेले असल्याने त्यातील मूल्यांमध्ये झालेल्या बदलांचा  थेट परिणाम या व्यवहारांवर होतो.

उदाहरणे – जे.पी. मॉर्गन, ब्लॅक रॉक, मॉर्गन स्टॅनली.

भारतीय शेअर बाजारात एफआयआयवर काही प्रमाण मर्यादा घातलेल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे:

१. एफआयआय भारतीय निधी कंपनीच्या एकूण पेड अप कॅपिटलच्या १०% निधी गुंतवू शकतात.

२. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये गुंतवणूक करण्याची कमाल मर्यादा बँक च्या एकूण पेड अप कॅपिटलच्या केवळ २०% आहे.

३. एफआयआय फक्त भारतीय कंपनीच्या एकूण भांडवलाच्या २४% पर्यंत गुंतवणूक करू शकतात.

४. जर प्रायव्हेट कंपनीला त्यांच्या भागधारकांकडून परवानगी मिळाली तर गुंतवणुकीची कमाल मर्यादा ३०% पर्यंत वाढू शकते.

५. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कमाल गुंतवणुकीपेक्षा २% कमी कटऑफ पॉइंट्स लागू करून या मर्यादांचे पालन केले जात आहे की नाही यावर लक्ष ठेवते. याद्वारे भारतीय कंपनी सावध होऊ शकतात.

एफआयआय चे उदाहरण म्हणजे जर्मनी मधील म्युच्युअल फंडला भारतातील सूचीबद्ध कंपनीमध्ये गुंतवणुकीची संधी देऊन त्याला भारतीय शेअर बाजारातील समभाग खरेदी आणि विक्री करण्याचे अधिकार देणे. या प्रकारच्या व्यवस्थेचा फायदा खाजगी जर्मन गुंतवणूकदारांना होतो जे भारतीय कंपनीचे शेअर्स थेट खरेदी करू शकत नाहीत. त्याऐवजी, ते म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतात आणि त्यांच्या फायद्याच्या कक्षा रुंदावू शकतात. फक एफआयआयला समोरील देशातील सर्व कायद्यांचे पालन करावे लागते.

एफडीआय आणि एफआयआय मध्ये काय फरक आहे?

“एफडीआय” म्हणजे परदेशातून भारतात केली जाणारी गुंतवणूक किंवा परदेशी कंपनीने भारतात केलेली गुंतवणूक. “एफआयआय” म्हणजे एखादी व्यक्ती किंवा संस्था जी परदेशी शेअर बाजारात गुंतवणूक करते

एफडीआय मुळे देशातील भौतिक मालमत्तेमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक, आर्थिक विकास आणि रोजगार निर्मितीमध्ये वाढ होते. एफआयआय आर्थिक बाजारातील अल्प-मुदतीच्या गुंतवणुकीचे प्रतिनिधित्व करतात. एफडीआय चा थेट परिणाम प्राप्तकर्त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो  तर एफआयआय  प्रामुख्याने बाजारातील तरलता आणि कार्यक्षमतेवर प्रभाव टाकते. हे फरक समजून घेतल्याने दोन्ही प्रकारच्या गुंतवणुकीच्या फायद्यांचा फायदा घेण्यासाठी गुंतवणूक धोरणे आणि नियामक फ्रेमवर्क तयार करण्यात मदत होते.

ऋता कुलकर्णी
ऋता कुलकर्णी
ऋता ही कायदेतज्ज्ञ असून तिने आर्थिक व्यवहारांचे ज्ञान सुलभ होऊन ते सामान्य मराठी माणसांपर्यंत पोहोचावे म्हणून अर्थसाक्षरता नावाचा उपक्रम चालू केला आहे.
- Advertisment -spot_img

वाचनीय असे काही

error: Content is protected !!
×