Newsinterpretation

सांगलीच्या पटवर्धन संस्थानाचा इतिहास

माझी शाळा म्हणजे हुजुरपागा. हुजुरपागेच्या हायस्कूलचे नाव “चिंतामणराव पटवर्धन गर्ल्स हायस्कूल” असे आहे. शाळेत असल्यापासूनच या पटवर्धन प्रस्थाविषयी आम्हा विद्यार्थिनींना वेगळेच कुतूहल होते. भारतातील एवढ्या नामांकित शाळेला पटवर्धनांचे नाव लाभले आहे म्हणजे नक्कीच हे काही साधे सुधे व्यक्तिमत्व नसणार अशी खात्री देखील होती. याच कुतूहलापोटी अधिक माहिती शोधण्यास मी सुरवात केली आणि पटवर्धन घराण्याचा इतिहास वाचून अचंबित झाले.

भारत स्वतंत्र झाला तेव्हा ब्रिटिश मुलुख वगळता अनेक स्वतंत्र राज्ये वा संस्थाने अस्तित्वात होती. पटवर्धनांचं सांगली हे त्यापकीच एक संस्थान. संस्थान म्हणून सांगलीचा जन्म १८०१ सालचा. मूळ संस्थान किंवा जहागीर म्हणजे मिरज. या जहागिरीच्या २२ कर्यातींपकी सांगली गाव ही एक कर्यात. जवळ जवळ वसलेल्या पाच-सहा गावांना मिळून ‘कर्यात’ म्हणत. मूळ जहागिरीतून फुटून थोरले चिंतामणराव पटवर्धन यांनी स्वतंत्र राज्य स्थापन केलं आणि सांगली या कृष्णाकाठच्या गावात त्याची राजधानी स्थापन केली.

पहिले चिंतामणराव पटवर्धन

सांगलीचे हे आद्य अधिपती. चिंतामणराव पटवर्धन यांचा जन्म १७७५ सालचा. १७८३ साली त्यांना सरदारकीची वस्त्रे मिळाली. तेव्हा त्यांचं वय होतं अवघं सात वर्ष. त्यामुळे जहागिरीची सर्व व्यवस्था त्यांचे चुलते गंगाधरपंत यांच्याकडे होती. पुढे त्यांच्यात गृहकलह वाढत गेला. अखेर पेशव्यांच्या संमतीने वाटण्या किंवा घरसमजूत झाली. चिंतामणराव सहा लाखांचा मुलुख घेऊन बाहेर पडले आणि सांगली संस्थानाचा जन्म झाला.

सांगलीत ते डेरेदाखल कधी झाले याची स्पष्ट नोंद मिळत नाही. कारण या सुमारास मोहिमांची गडबड चालू होती. चिंतामणराव पटवर्धनांची मोहीम प्रथम पेशव्यांच्या आज्ञेने करवीरकर छत्रपतींविरुद्ध परशुरामभाऊ पटवर्धनांसोबतच झाली, आणि नंतर जनरल वेलस्ली, सरदार धोंडोपंत गोखले यांच्याबरोबर धोंडजी वाघ या दरोडेखोराविरुद्ध कर्नाटकात! या दुसऱ्या कार्नाटक मोहिमेत त्यांना गंभीर जखमा झाल्या. पण वेलस्लीने त्यांची प्रशंसाही खूप केली.

चिंतामणराव बहुधा १८०४-०५ साली सांगलीत परतले असावेत. कारण याच सुमारास गावापासून काही कोसांवर भुईकोट किल्ल्याचे बांधकाम सुरू झाले. हा गणेशदुर्ग म्हणजेच आजचा राजवाडा. आता तो गावाचा मध्यवर्ती भाग झाला आहे. दरबार हॉलसारख्या वारसांकडे असलेल्या काही विद्यमान इमारती सोडल्या तर या वास्तूचा बहुतांश भाग आता सरकारी कचेऱ्या आणि लहान-मोठे बंगले यांनी व्यापून टाकला आहे.

पटवर्धन घराणं मोठं गणेशभक्त! या घराण्याचा मूळ पुरुष हरभट्ट पटवर्धन आणि गाव कोकणातले कोतवडे. त्यांनी १२ वर्ष दुर्वांचा रस पिऊन गणपतीपुळे येथे गणेशाची उपासना केली होती असे सांगितलं जातं. गणेशभक्तीचा हा वारसा पुढे चालवत १८११ मध्ये चिंतामणरावांनी भव्य गणपती मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली. ते तब्बल ३० वर्षांनी पूर्ण झालं. हेच श्री गणपती पंचायतन. म्हणजे शिव, सूर्य, चिंतामणेश्वरी, लक्ष्मी-नारायण आणि गणपती यांची एकाच आवारात देवळं असलेलं मंदिर. हे प्रशस्त मंदिर आज ही सांगलीचे श्रद्धास्थान म्हणून प्रचलित आहे.

राजकारणातील घडामोडी

याच काळात राजकारणातही बऱ्याच घडामोडी घडत होत्या. १८१८ साली पेशवाई बुडाली. साताऱ्याची गादी तात्पुरती नामशेष झाली. सातारच्या सर्व सरदारांनी आपल्या सेवेत यावं असे फर्मान इंग्रजांनी काढलं. चिंतामणरावांनी त्याला विरोध केला. १८१२ च्या पंढरपूर करारावर बोट ठेवत आपण फक्त पेशव्यांचे चाकर असल्याचं त्यांनी सांगितलं. वाद चिघळत गेला आणि अखेर जनरल प्रिट्झलर सांगलीच्या वेशीवर दाखल झाला. सामना करण्याचा प्रश्नच नव्हता. वाटाघाटी झाल्या. मात्र, इंग्रजांची चाकरी न करण्याचा आपला निर्णय काही चिंतामणरावांनी बदलला नाही. त्याच्या बदल्यात कंपनी सरकारला हुबळी, तुरुम, बरडोल असा आपल्या जहागिरीतला मुलुख तोडून द्यावा लागला.

नंतरही काही काळ इंग्रजांबरोबरच्या कुरबुरी सुरूच राहिल्या. हळूहळू त्यांच्या संबंधांत सुधारणा होत गेली. माल्कम गव्हर्नर म्हणून आला आणि उभयतांचे संबंध खूपच सुधारले. १८४४ साली कोल्हापूरमध्ये ‘सामंतगड’चे लष्करी बंड झाले. त्यावेळी संस्थानाने इंग्रजांना लष्करी मदत केली. त्याची परतफेड म्हणून दोन वर्षांनी राजेसाहेबांचा बेळगाव येथे सोन्याची मूठ असलेली तलवार बहाल करून विशेष सत्कार करण्यात आला. त्यांना गार्ड ऑफ ऑनर देऊन सन्मानित करण्यात आले.

व्यापार-उद्योगास चालना

चिंतामणरावांची ख्याती एक प्रजाहितदक्ष राजा म्हणून होती. काका परशुरामभाऊंचे निधन, दुसऱ्या बाजीराव पेशव्यांची नाराजी, राजकारणातील ताणेबाणे, चढउतार यांना तोंड देत असतानाही ना त्यांचं सांगलीकडे दुर्लक्ष झालं, ना सांगलीकरांकडे. सांगलीच्या भरभराटीची सुरुवात त्यांच्याच काळात झाली. नियोजित  व्यापारी पेठा रचून त्यांनी व्यापारास चालना दिली. तसेच व्यापाऱ्यांना अनेक सवलती देखील दिल्या. रुंद, सरळ रस्ते बांधून त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड केली. १८२१ मध्ये त्यांनी शिळाप्रेस छापखान्याची स्थापना केली. पाठोपाठ टांकसाळ सुरू करून नाणी पाडण्यास सुरुवात केली. गावात जागोजागी बगीचे, मळे, आमराया यांची रचना केली. मॉरिशसचा ऊस त्यांनीच सांगलीत आणला आणि रेशीम उद्योगाचीही सुरुवात केली. कैक विद्वान, पंडित, कलावंत, कारागीर, शिल्पकार यांना आवर्जून सांगलीत बोलावून घेतलं. मराठी रंगभूमीवरचं पहिलं नाटक ‘सीतास्वयंवर’ हे त्यांच्याच प्रेरणेनं उभं राहिलं. त्यांनीच विष्णुदास भावे यांच्या मागे लागून ते लिहून घेतलं होतं.

या पराक्रमी, कल्पक, गुणग्राहक, प्रजाहितषी राजाचं १८५१ साली वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झालं आणि सांगलीच्या इतिहासातील पहिलं पर्व संपलं. त्यांच्यानंतर तात्यासाहेब गादीवर आले. त्यांच्या कारकीर्दीत सांगली म्युनिसिपालिटीची स्थापना झाली खरी; पण थोरल्या चिंतामणरावांचा वारसा खऱ्या अर्थानं चालवला तो दुसऱ्या चिंतामणरावांनी. दुसऱ्या चिंतामणरावांच्या अधिपत्याखाली प्रगती आणि आधुनिकता यांच्या दिशेने सांगलीचा प्रवास चालू झाला.

दुसरे चिंतामणराव पटवर्धन

दुसरे चिंतामणराव म्हणजेच विनायकराव ऊर्फ भाऊसाहेब पटवर्धन यांचा जन्म १८९० चा. त्यांना राजेपद मिळणे हा योगायोगाचा आणि बहुधा सांगलीच्या पुण्याईचा भाग असावा.कारण हे दत्तक पुत्र होते. त्यांचे आजोबा पहिल्या चिंतामणरावांना दत्तक गेले होते. पण नंतर लगेचच राजेसाहेबांना संततीचा लाभ झाला. दत्तक पुत्रास रद्दबातल करण्यात आले. भरपाई म्हणून त्याला २५,००० रुपयांची जहागीर देण्यात आली. आणि असं ठरवण्यात आलं की, पुन्हा असा प्रसंग कधी निर्माण झालाच, तर याच घराण्यातील ज्येष्ठ पुत्रास दत्तक घेण्यात येईल. आणि असा प्रसंग लवकरच आला. धुंडिराज ऊर्फ तात्यासाहेब पटवर्धन १९०१ मध्ये निपुत्रिक निधन पावले. आणि विनायकराव म्हणजेच दुसरे चिंतामणराव १९०३ मध्ये ब्रिटिश प्रशासक बर्क यानं घेतलेल्या कठोर चाचणीनंतर दत्तक घेतले गेले.

चिंतामणरावांनी १९०३ ते १९०९ हा काळ राजकोटच्या princes college मध्ये काढला. तिथे त्यांना इंग्रजी विषयात प्रथम क्रमांक आणि सुवर्णपदक मिळाले. परत आल्यानंतर काही काळ त्यांना कॅप्टन बर्क या अत्यंत कुशल प्रशासकाचे मार्गदर्शन लाभले. चिंतामणराव आणि बर्क यांचे संबंध अत्यंत सौहार्दाचे होते. राजेसाहेब सज्ञान झाल्यावर त्यांच्या हाती कारभार सोपवून बर्कसाहेब निघाले, तेव्हा त्यांना काही दिवस थांबण्याची विनंती राजेसाहेबांनी केली होती. पण बर्कसाहेबांनी त्याला कठोरपणे नकार दिला आणि चिंतामणरावांना राज्याची जबाबदारी स्वीकारण्यास भाग पाडले. ही जबाबदारी चिंतामणरावांनी बर्कच्या कल्पनेपेक्षाही कदाचित अधिक यशस्वीरीत्या पार पाडली.

दुसऱ्या चिंतामणरावांचा कार्यभार

२ जून १९१० रोजी राजेसाहेबांनी अधिकृतपणे राज्याची सूत्रे हाती घेतली. त्यावेळी संस्थानाचे क्षेत्रफळ ११३६ चौ. मल होतं. पण मुलुख एकसंध नव्हता. महाराष्ट्र-कर्नाटकातील सोलापूर, सातारा, बेळगाव अशा जिल्ह्य़ांतून तो पसरलेला होता. शहापूर, शिरहट्टीसारखी गावे तर दीड-दोनशे मलांवर होती. पण लवकरच राजेसाहेबांनी संपूर्ण संस्थानाच्या कारभारावर आपली घट्ट पकड बसविली.

चिंतामणरावांच्या एकंदर कारकीर्दीकडे पाहता त्यांनी स्वत:ला ‘रयतेचा मालक कमी, चाकरच अधिक’ मानले असावे असे वाटते. संस्थानाची- पर्यायाने प्रजेची भरभराट व्हावी म्हणून त्यांनी सर्वच आघाडय़ांवर झटून भरघोस काम केल्याचे दिसून येते.

शेती व इतर संलग्न उद्योग सुधारण्याचे कार्य

शेतीसुधारणेच्या कामाला राजेसाहेबांनी खूप महत्त्व दिले. संस्थान सहा तालुक्यांत विभागलेले असल्याने प्रत्येक तालुक्यातील शेतीच्या पद्धती आणि समस्या देखील वेगळ्या होत्या. या सर्व तालुक्यांतील नैसर्गिक साधनसंपत्तीचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यात आला. ताली घालणे हा जमीनसुधारणेचा पाया आहे, हे शेतकी अधिकाऱ्यांनी राजेसाहेबांना पटवून दिल्यानंतर या कामाला अग्रक्रम देण्यात आला. ताली तसेच बंधारे बांधण्यासाठी राजेसाहेब स्वत: आपल्या अधिकाऱ्यांसोबत आवश्यक तेव्हा बैलगाडीने, तर कधी पायीही बरेच फिरले. शेतीचे शास्त्रशुद्ध शिक्षण, पशुपालन, खतांची साठवण, बी-बियाणे, फळझाडांची कलमे यासाठी विशेष योजना राबवण्यात आल्या. सर्व साधनांनी युक्त अशी एक अद्ययावत दुधाची डेअरी काढण्यास राजेसाहेबांनी प्रोत्साहन दिले.

चिंतामणरावांनी सांगलीमध्ये उद्योगधंदे वाढावेत म्हणूनही अथकपणे प्रयत्न केले. १९०८ साली दादासाहेब वेलणकरांनी ‘गजानन वििव्हग मिल’ सुरू केली. पाठोपाठ लढ्ढांची सूतगिरणी उभी राहिली. दांडेकर, भिडे वगरे लोकांनी लोखंडी मोटा, पिठाच्या चक्क्या अशी विविध उत्पादनांची निर्मिती सुरूकेली. शिरगावकर बंधूंचा साखर कारखाना उभा राहिला. शेडजी, आरवाडे, अथणीकर वगरे उद्योजकांमुळे तेल गाळण्याच्या, हळद पॉलिश करण्याच्या गिरण्या उभ्या राहिल्या. १९०७ साली रेल्वे सुरू झाली. त्यामुळे व्यापारउदिमाची चांगलीच सोय झाली. दोन लाखांचे स्वत:चे भांडवल घालून राजेसाहेबांनी सांगली बँकेची स्थापना करण्यात पुढाकार घेतला आणि वाढत्या व्यापारउदिमासाठी भांडवलाची सोय करून दिली.

संस्थानचा कारभार उत्तम चालावा म्हणून त्यांनी ब्रिटिश मुलुखातून निवृत्त आय. सी. एस अधिकारी, हायकोर्टाचे न्यायाधीश वगरे प्रशासकांना बोलावून उच्च हुद्दय़ांवर नेमले. सर वाडिया, पॅट्रिक केडेल, बी. एन. डे हे त्यापैकी काही अधिकारी. सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ आणि प्रा. डी. जी. कर्वे यांची एक समिती राजेसाहेबांनी स्थापन केली होती. सांगली संस्थानच्या भौतिक साधनसंपत्तीचा एकंदर अंदाज घेऊन शेती व औद्योगिक विकासासाठी शिफारशी करण्याची जबाबदारी या समितीवर सोपविण्यात आली होती. त्यांच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी प्रख्यात अर्थतज्ज्ञ पी. एम. लिमये यांना नियुक्त करण्यात आलं होतं. या समितीच्या शिफारशींनुसार राजेसाहेबांनी मुंबईचे उद्योगपती वामन आपटे यांच्याबरोबर दोन कोटी भांडवलाचे विविध कारखाने काढण्यासंबंधीचा करार केला होता. त्यानुसार कैक लाखांची मशिनरी येऊन पडलीदेखील. पण पुढे ही योजना बारगळली. गांधीहत्येनंतर उसळलेल्या दंगलीने सगळ्या मेहनतीवर बोळा फिरवला. राजेसाहेबांनी संस्थानच्या विकासासाठी पंचवार्षकि योजनाही आखली होती. पण ती राबवण्याआधीच संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झालं. त्यामुळे तोही प्रश्न मिटला.

शिक्षण व इतर क्षेत्रातील कामगिरी

शिक्षणविषयक सांगली संस्थानचा दृष्टिकोन प्रथमपासूनच प्रागतिक होता. सांगलीमध्ये १८६१ साली सार्वजनिक शिक्षणाला सुरुवात झाली. १८६३ साली पहिली मराठी शाळा निघाली आणि लगेचच दोन वर्षांनी वेदशाळेची स्थापना झाली. १९१० साली राजेसाहेबांनी प्राथमिक शिक्षण संपूर्ण संस्थानात मोफत केलंच, पण महत्त्वाचं म्हणजे ते सक्तीचंही केलं. १९१९ साली स्वत: पुढाकार घेऊन वििलग्डन कॉलेजची स्थापना करवली. १९३३ साली फक्त मुलींसाठी म्हणून राणी सरस्वतीदेवी कन्याशाळा या हायस्कूलची स्थापना करण्यात आली. तर १९४७ साली वालचंद इंजिनीयिरग कॉलेज राजेसाहेबांच्या आशीर्वादाने व सक्रिय सहभागाने स्थापन झालं. शहापूरसारख्या दीडेकशे मलांवर असलेल्या गावीही १९२० सालीच हायस्कूल सुरू झालं होतं. याखेरीज पुण्याची हुजुरपागा, फर्ग्युसन कॉलेज यांसारख्या संस्थांनाही राजेसाहेबांनी भरघोस देणग्या दिल्या.

चिंतामणरावांचं सर्वच क्षेत्रांतील कर्तृत्व वादातीत आहे हे खरं. मात्र, रयतसभेच्या बाबतीत त्यांनी घेतलेली भूमिका अचंबित करणारी आहे. कॅप्टन बर्क यानं १९०५ ते १९१० या आपल्या कारभाराच्या काळात रयतसभेची स्थापना केली. त्याला राजेसाहेबांनी पुढे पद्धतशीर आकार दिला. हळूहळू तिला अधिकाधिक अधिकार देण्यास सुरुवात केली. १९३० साली रयतसभा नियमबद्ध करण्यात आली. तिच्या सरकारी-निमसरकारी सभासदांची संख्या वाढवण्यात आली. १९३८ मध्ये निवडून आलेल्या सभासदांमधून दोन मंत्री संस्थानच्या कार्यकारी मंत्रिमंडळात घेण्यात आले. पुढे १९४६ साली तर रयतसभेस पूर्ण अधिकार देण्यात आले आणि राजेसाहेबांनी इंग्लंडच्या राजाप्रमाणे घटनात्मक राजाची जबाबदारी स्वीकारली. त्यावेळी भाषण करताना आपलं स्वप्नं पुरं झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन यांचं वैयक्तिक राहणीमान अत्यंत साधं होतं. त्यांनी फुकटचा डामडौल, उधळपट्टी कधी केली नाही. इतर अनेक किंवा बहुतांश संस्थानिकांच्या, राजेरजवाडय़ांच्या ऐय्याशी आणि उधळपट्टी करण्यात पिढय़ान् पिढय़ा व्यतीत झाल्या. त्यांच्या वाह्य़ातपणाचे किस्से मशहूर आहेत. त्यावर पुस्तकंही लिहिली गेली आहेत. राजेसाहेबांबद्दल मात्र तशी अफवाही नाही. याला कारण आहे- त्यांचा अनासक्त कर्मयोग.

पटवर्धन संस्थानाची भरभराट

राजेसाहेबांनी राजसूत्रे हाती घेतली तेव्हा संस्थानचं उत्पन्न दहा लाखांच्या आसपास होतं. त्यांच्या राजवटीच्या अखेरीस ते ३५ लाखांपर्यंत पोहोचलं होतं आणि संस्थानची मालमत्ता एक कोटीपेक्षाही जास्त होती. राजेसाहेबांनी खासगीचा आणि दौलतीचा खर्च वेगळा ठेवला होता. १९३० साली एकूण उत्पन्नाच्या २० टक्के असलेला खासगीचा खर्च १९४७ पर्यंत दहा टक्क्यांवर आणला होता. त्यांनी वैयक्तिक हितापेक्षा प्रजेच्या हितालाच नेहमी महत्त्व दिलं. कृष्णा नदीवरचा आयर्वनि पूल हे याचं उत्तम उदाहरण आहे.

राजेसाहेबांचं वास्तव्य माळबंगल्यावर असे. हा भाग तेव्हा ओसाड होता आणि बंगलाही जुनाट होता. त्या ठिकाणी भव्य राजप्रासाद बांधण्यासाठी सातएक लाख रुपयांची रक्क्म बाजूला काढण्यात आली होती. त्याच सुमारास कृष्णा नदीवर पूल बांधण्याची निकड उत्पन्न झाली. संस्थानला त्यासाठी पसा कमी पडू लागला, तेव्हा राजेसाहेबांनी राजप्रासाद रद्द केला आणि सगळा पैसा पुलाच्या बांधकामात ओतला.

राजेसाहेबांचं एकंदर चरित्र आणि व्यक्तिमत्त्व पाहिलं की प्लेटोच्या ‘तत्त्ववेत्ता राजा’  या संकल्पनेची आठवण येते. ‘प्रजेचं हित तेच स्वत:चं हित’! फरक इतकाच, की राजेसाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाला तात्त्विकतेबरोबरच अध्यात्माचंही अधिष्ठान होतं. घराण्यात गणेशभक्तीची परंपरा होतीच. पण त्यापलीकडे जाऊन त्यांना दिव्यत्वाचा साक्षात्कार झाला असावा. १९३२ साली त्यांनी नारायणराव केडगावकर यांच्याकडून नाममंत्र घेतला होता. १९३३ साली सद्गुरू बाबा सावनसिंगजी महाराज- बियास यांचा गुरुपदेश त्यांना मिळाला. निंबाळचे गुरुदेव रानडे यांच्या सहवासात तर ते कित्येक वर्षे होते. या सगळ्यांच्या प्रभावामुळे बहुधा राज्याप्रती त्यांची भूमिका बहुतांशी विश्वस्ताचीच राहिली आणि समचित्तावस्थेतच त्यांनी राजत्याग केला.

संस्थानाचे विलीनीकरण

८ मार्च १९४८ रोजी सांगली संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झालं. त्याचा शोक राजापेक्षा प्रजेनेच अधिक केला. राजेसाहेबांनी सांगलीतच स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. भारतीय गणराज्याचा सर्वसामान्य नागरिक म्हणून ते आयुष्य व्यतीत करू लागले. पण प्रजेच्या मनातील त्यांचं अढळ स्थान मात्र अबाधित राहिलं. त्याचा प्रत्यय दहा-बारा वर्षांनी ते शिरहट्टीत गेले असता आला. भव्य मिरवणूक, मानपत्रे अशा स्वरूपात त्यांचं अभूतपूर्व स्वागत करण्यात आलं आणि जनमानसात त्यांच्याविषयी असलेलं निस्सीम, निरपेक्ष प्रेम पाहून खुद्द राजेसाहेबही भारावून, गहिवरून गेले.

१९६० साली सांगलीच्या जनतेने त्यांचा ७० वा वाढदिवस मोठय़ा थाटामाटात साजरा केला. भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ देऊन सन्मानित केलं.

२३ फेब्रुवारी १९६५ साली दुसरे चिंतामणराव पटवर्धन कालवश झाले. अवघी सांगली शोकसागरात बुडालीच; पण असं म्हटलं जातं की, त्यांच्या हत्तीनेही त्यांच्या पाíथवावर अश्रू ढाळले.

पटवर्धन संस्थानाचा सध्याचा आढावा

दुसरे चिंतामणराव पटवर्धन यांना दोन पुत्र. माधवराव आणि प्रतापसिंह. दुसऱ्या महायुद्धात इंग्रजांकडून लढताना युवराज प्रतापसिंह ब्रह्मदेशात वीरगतीस प्राप्त झाले. माधवरावांचे चिरंजीव विजयसिंहराजे चिंतामणरावांनंतर गादीवर आले. आजही तेच संस्थानचा आणि विश्वस्त म्हणून श्री गणपती पंचायतन ट्रस्टचा कारभार सांभाळत आहेत.

विजयसिंहराजे पटवर्धन म्हणजे मोठे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व. अभियांत्रिकी आणि वकिली असे ते मुंबई विद्यापीठाचे दुहेरी पदवीधर आहेत . काही काळ त्यांनी मुंबईतील एका प्रख्यात संस्थेमध्ये मशीन डिझाइन शिकवण्याचं काम केलं. पण नंतर त्यांनी स्वत:ची कन्सल्टन्सी सुरू केली.

१९६९ मध्ये त्यांनी मॉरिशसमध्ये जॉइंट व्हेन्चर सुरू केलं. असं करणारे ते पहिलेच भारतीय. पुढे अशा प्रकारचे संयुक्त उद्योग उभारण्यासाठी त्यांनी औद्योगिक सल्लागार म्हणून काम पाहिले. आणि नंतर बजाज इंटरनॅशनलमध्ये ते रुजू झाले. त्यांनी निवृत्ती स्वीकारली तेव्हा ते बजाज इंटरनॅशनलचे सीनिअर व्हाइस प्रेसिडेंट आणि कायदेविषयक सल्लागार होते. पुढे त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले.

सांगलीच्या राजघराण्याची विधायक आणि प्रजाहितैषी कामांची परंपरा विजयसिंह राजेंनी पुढे चालू ठेवली आहेत. विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम ते राबवत आहेत. त्यांनी विजयसिंहराजे-लायन्स हॉस्पिटल सुरू केले आहे. त्यामध्ये गोरगरीबांसाठी मोफत सेवांची सुविधा आहे. त्यांनी कुंभार समाजाचे पुनर्वसन केले. खोकेवाले आणि भाजीवाले यांच्या पुनर्वसनासाठीजागा उपलब्ध करून दिली आणि मोफत अन्नछत्रही सुरू केले. गायत्री परिवाराला वृद्धाश्रमासाठी जागा दिली.

सर्वधर्मसमभाव प्रस्थापित व्हावा म्हणून ते अनेक प्रकल्प राबवत आहेत. एकात्मता सांस्कृतिक मंदिराची उभारणी आणि ‘एकात्मता अॅंथम’ची शब्दरचना आणि संगीत हे त्यापैकीच एक. त्यांचा अत्यंत महत्त्वाचा आणि समस्त सांगलीकरांची मनं जिंकून घेणारा उपक्रम म्हणजे त्यांनी घडवून आणलेला गणपतीमंदिराचा कायापालट.

विजयसिंह राजांविषयी थोडी माहिती

विजयसिंहराजेंनी औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रात अनेक शिखरे काबीज केली असली तरी ते मनानं कलावंत आहेत. लेखन आणि संगीतावर त्यांचं विशेष प्रेम आहे. ‘स्त्री हक्क’ ‘devotional symbolism and lords of destrirny’ अशी विविध विषयांवरची पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. कैक हिंदी  चित्रपटांना आणि मालिकांना त्यांनी संगीत दिलं आहे, त्याकरता गाणी लिहिली आहेत. काही चित्रपटांचं लेखन आणि दिग्दर्शनही केलं आहे. भाग्यश्री पटवर्धन ही सिनेतारका त्यांचीच थोरली लेक. वडिलांचा वारसा ती पुढे चालवीत आहे. त्यांच्या इतर दोन मुली- पौर्णिमा आणि मधुवंती परदेशात स्थायिक आहेत.

पटवर्धनांची हि नवीन पिढी देखील सार्वजनिक स्तरावर चांगले काम करून आपला ठसा उमटवत आहे. महाराष्ट्राला लाभलेल्या संस्थानिकांच्या दैदिप्य्मन इतिहासात पटवर्धन घराण्याचे नाव अग्र स्थानी आहे आणि त्यांची पुढची पिढी ते तसेच ठेवण्यास त्यांच्या घराण्यास शोभेल अशीच कामगिरी बजावत आहेत.

ऋता कुलकर्णी
ऋता ही कायदेतज्ज्ञ असून तिने आर्थिक व्यवहारांचे ज्ञान सुलभ होऊन ते सामान्य मराठी माणसांपर्यंत पोहोचावे म्हणून अर्थसाक्षरता नावाचा उपक्रम चालू केला आहे.

TOP 10 TRENDING ON NEWSINTERPRETATION

Newsom draws Megyn Kelly’s ire after sharing old Trump clips to boost online trolling campaign

A sharp exchange unfolded when a well-known media host...

Shocking Files Reveal Bill Clinton Letter in Epstein’s Infamous ‘Birthday Book’

Oversight Committee Releases New Epstein Records The House Oversight Committee...

McGregor channels Trump populism with Musk support in high-stakes Irish presidential race

In early September 2025, Ireland was taken by surprise...

Federal authorities seize $3 million in crypto linked to ransomware that hit US hospitals

Federal authorities have seized nearly $3 million worth of...

Bernie Sanders backs Zohran Mamdani in New York City mayor race citing grassroots momentum

A major political figure has stepped into the New...

JPMorgan handled $1.1 billion for Jeffrey Epstein despite warnings of criminal ties and reputation risk

JPMorgan Chase, one of America’s biggest banks, had a...

Qualys confirms limited Salesforce data access during Drift hacking campaign raising security concerns

Hackers accessed some Salesforce information from risk management company...

Ashley Hinson sparks clash with Newsom after claiming America should look more like Iowa

A sharp political exchange has broken out after U.S....

WSJ report says malware email linked to Chinese group aimed at U.S. tariff negotiations

U.S. authorities are investigating a suspicious email that carried...
error: Content is protected !!
Exit mobile version