जनीं वंद्य ते: कथा क्विकहिलची – भाग १

जनीं वंद्य ते हा मराठी स्तंभ मी न्यूजइंटरप्रेटेशन साठी चालू करत आहे यात अनेक वंदनीय मराठी यशोगाथा मांडायचा माझा प्रयत्न असेल. 

775

सध्या स्टार्टअप या शब्दाने व्यवसाय क्षेत्रात नुसता धुमाकूळ घातला आहे, सगळ्या वर्तमानपत्रात, इंटरनेट साईट्सवर कोणी किती पैसे गुंतवणूकदार कडून उभे केले, कोणत्या स्टार्टअपचं व्हॅल्युएशन किती झालं याची तर सध्या स्पर्धाच चालू आहे. कोणी स्टार्टअप विकली ? कोणी घेतली ? का विकली ? का घेतली ? यावर चर्चांचा महापूर आला आहे.

स्टार्टअप हा व्यवसायाचा असा प्रकार असतो जो कोणता तरी अस्तित्वात असलेल्या महत्वाच्या वेदनेचा अंत करण्यासाठी झटत असतो , त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची मदत घेत असतो, व्यवसाय चालेल किंवा नाही याची कोणतीही शाश्वती व्यवसाय करणाऱ्याला नसते. स्टार्टअप मध्ये काम करणाऱ्यांसाठी हा मटका असतो, लागला तर कोट्यवधींचा. अनिश्चिततेलाच स्टार्टअप असे नाव असते. क्विकहिल ची स्थापना झाली त्या काळात स्टार्टअप्सचा एवढा गवगवा झालेला नव्हता पण एखादी यशस्वी स्टार्टअप कंपनी कशी असावी याच क्विकहिल हे उत्तम उदाहरण म्हणता येईल.
या कंपनी सोबत काम करत असताना मला खूप जवळून या कंपनीच्या झपाटलेल्या प्रवर्तकांना जाणून घेण्याची संधी मिळाली आणि एक शिकवण देखील मिळाली. हीच शिकवण वाचकांपर्यंत पोचवायचा माझा प्रयत्न आहे. क्वीकहिलची ही कथा मी पाच भागात मांडणार आहे.

प्रस्तावना

ते युग होतं संगणकाचं, सगळ्यांच्या घरात तेव्हा नुकतेच संगणक बसायला लागले होते. हार्डवेयरचा डिप्लोमा केलेले युवक तेव्हा घराघरात जाऊन संगणक विकत होते, प्रत्येक संगणकावर विंडोज गुण्यागोविंदाने नांदत होते पण विंडोजची एक मूळ प्रत विकत घेण्यासाठी जितके पैसे लागायचे तेवढ्या किमतीत तर कॉम्प्युटर विकणारी मुलं अख्खा संगणक बांधून देत होते, कंपनी कडून ब्रँडेड कम्प्युटर घेण्यापेक्षा हे बांधून घेतलेले असेम्ब्लड कम्प्युटर खूपच स्वस्त असायचे पण बांधलेल्या संगणकासाठी प्रचंड देखभाल लागायची, संगणक विकणारे आपली अनुभव प्रमाणे हवे तसे बांधून हे संगणक विकत होते, त्यामुळे कधी सॉफ्टवेयर अपग्रेड करायला तर कधी रॅम बदलायला, कधी मेमरी वाढवायला तर कधी फ्लोपी ड्राइव्ह बसवायला संगणकाची देखभाल करणाऱ्या कुशल मनुष्यबळाची मागणी प्रचंड वाढत होती. अनेक युवकांनी तेव्हा असे बांधणीचे संगणक विकून बराच पैसे गाठीशी बांधला होता काहींनी देखभाल करून पैसा कमावला. त्यातून काही यशोगाथा निर्माण होत गेल्या, हि यशोगाथा आहे अशाच एका संगणकाची देखभाल करत फिरणाऱ्या एका महत्वाकांक्षी तरुणाची. रहिमतपूर वरून पुण्यात आलेल्या आणि शिक्षणाला रामराम ठोकलेल्या धडपड्या युवकाची, १५००० रुपयाच्या भाग भांडवलापासून १५० कोटींचं साम्राज्य बनवणाऱ्या मराठमोळ्या व्यावसायिकांची. पैशासाठी अब्रूची लक्तरं वेशीवर टांगणाऱ्या अंबानी बंधूंच्या किंवा प्रॉपर्टीसाठी न्यायालयाची दार ठोठावणाऱ्या भाऊ बंदकीचा या युगात कोट्यवधी रुपये कमवून सुद्धा नात्यातला ओलावा अलगद जपणाऱ्या दोन भावंडांची हि प्रेरणादायी कथा.

संगणकाचा उदय होऊन काही वर्षे लोटली होती, इंटरनेटचे युग तेव्हा अवतरले नव्हते, हळूहळू संगणक जोडले जायला लागले होते, काही एकमेकाला जोडले जात होते तर काही बाकी उपकरणांना. पेनड्राईव्ह, सीडी, डीवीडी अशा अनेक उपकरणांवरून गेम्स, चित्रपट, डेटा संगणकावर उतरवला जाऊ लागला आणि या डेटा सोबत येऊ लागले संगणकातले किडे अर्थात व्हायरस. संगणकात विंडोजची मूळ अथवा लायसेन्सड प्रत नसल्यामुळे संगणकात किडे सोडणं सोप होऊ लागलं, अनेक समाज उपद्रवी मंडळींनी व्हायरसचे प्रोग्रॅम लिहले आणि ते समाजकंटकात सोडून दिले मग एखाद्या गेम सोबत अथवा एखाद्या चित्रपटाच्या विडिओ सोबत या व्हायरसनी संगणकात चंचू प्रवेश करायला सुरवात केली आणि मग एक दिवस अचानक कोणाच्या संगणकातल्या फाईल्स गायब होऊ लागल्या, कोणाचे काॅम्प्युटर्स अचानक बंद पडू लागले, चित्रपट पाहतापाहता काहीच न करता अर्ध्यातच संपू लागले आणि ग्राहक त्रस्त होऊ लागले. अनेक घरात हा प्रश्न उद्भवू लागला, हळूहळू या प्रश्नाने अक्राळ विक्राळ रूप धारण करायला सुरुवात केली.हा तो काळ होता जेव्हा व्हायरस हे उदार निर्वाहाचे साधन बनले नव्हते, हा तो काळ होता जेव्हा व्हायरस फक्त संगणकाची नासधूस करण्यासाठी लिहले जात असत, व्हायरसद्वारे तेव्हा डेटा चोरला जात नव्हता किंवा माहितीचे स्वातंत्र्य सैनिकही  तेव्हा उदयास आले नव्हते. त्यावेळेस भारतात येणारे व्हायरस हे फक्त आणि फक्त नासधूस करणे या एकाच उद्देशाने बनवले जात होते.

पाकिस्तान मधून भारतात मानवी घुसखोरां सोबतच संगणकीय घुसखोर यायला पण सुरुवात झालेली. बासित फारूक अल्वी आणि अमजद फारूक अल्वी या दोन लाहोर स्टेशन जवळ राहत असलेल्या भावांनी तेव्हा ब्रेन नावाचा व्हायरस बनवला. हा व्हायरस डॉस ऑपरेटिंग सिस्टिम वरचा पहिला व्हायरस मानला जातो. या व्हायरसने भारतामध्ये प्रचंड धुमाकूळ घातलेला फ्लॉपी मध्ये जाऊन हा वायर्स फ्लॉपी खराब किंवा संगणकाच्या भाषेत करप्ट करायचा. त्या काळात विंडोज फ्लाॅपी हे डेटा एका कम्प्युटर वरून दुसऱ्या काॅम्प्युटरवर हलवायचं एकमेव साधन होतं सीडीचा जन्म झाला होता तरी फ्लॉपी वापरणं तुलनेने सोप असल्यामुळे तमाम जनता तेव्हा फ्लॉपी वापरात असे.

भाग दोन | भाग तीन | भाग चार | भाग पाच