जनीं वंद्य ते: कथा क्विकहिलची- भाग २

संजय काटकर, हा काटकर बंधूंमधला लहान भाऊ आणि क्विक हिल या अँटी व्हायरस प्रणालीचा लेखक आणि जन्मदाता 

751

संगणकाचा उदय होऊन काही वर्षे लोटली होती, इंटरनेटचे युग तेव्हा अवतरले नव्हते, हळूहळू संगणक जोडले जायला लागले होते, काही एकमेकाला जोडले जात होते तर काही बाकी उपकरणांना. पेनड्राईव्ह, सीडी, डीवीडी अशा अनेक उपकरणांवरून गेम्स, चित्रपट, डेटा संगणकावर उतरवला जाऊ लागला आणि या डेटा सोबत येऊ लागले संगणकातले किडे अर्थात व्हायरस. संगणकात विंडोजची मूळ अथवा लायसेन्सड प्रत नसल्यामुळे संगणकात किडे सोडणं सोप होऊ लागलं, अनेक समाज उपद्रवी मंडळींनी व्हायरसचे प्रोग्रॅम लिहले आणि ते समाजकंटकात सोडून दिले मग एखाद्या गेम सोबत अथवा एखाद्या चित्रपटाच्या विडिओ सोबत या व्हायरसनी संगणकात चंचू प्रवेश करायला सुरवात केली आणि मग एक दिवस अचानक कोणाच्या संगणकातल्या फाईल्स गायब होऊ लागल्या, कोणाचे कम्प्युटर्स अचानक बंद पडू लागले, चित्रपट पाहतापाहता काहीच न करता अर्ध्यातच संपू लागले आणि ग्राहक त्रस्त होऊ लागले. अनेक घरात हा प्रश्न उद्भवू लागला, हळूहळू या प्रश्नाने अक्राळ विक्राळ रूप धारण करायला सुरुवात केली.हा तो काळ होता जेव्हा व्हायरस हे उदार निर्वाहाचे साधन बनले नव्हते, हा तो काळ होता जेव्हा व्हायरस फक्त संगणकाची नासधूस करण्यासाठी लिहले जात असत, व्हायरसद्वारे तेव्हा डेटा चोरला जात नव्हता किंवा माहितीचे स्वातंत्र्य सैनिकही  तेव्हा उदयास आले नव्हते. त्यावेळेस भारतात येणारे व्हायरस हे फक्त आणि फक्त नासधूस करणे या एकाच उद्देशाने बनवले जात होते.

पाकिस्तान मधून भारतात मानवी घुसखोरां सोबतच संगणकीय घुसखोर यायला पण सुरुवात झालेली. बासित फारूक अल्वी आणि अमजद फारूक अल्वी या दोन लाहोर स्टेशन जवळ राहत असलेल्या दोन भावांनी तेव्हा ब्रेन नावाचा व्हायरस बनवला. हा व्हायरस डॉस ऑपरेटिंग सिस्टिम वरचा पहिला व्हायरस मानला जातो. या व्हायरसने भारतामध्ये प्रचंड धुमाकूळ घातलेला फ्लॉपी मध्ये जाऊन हा व्हायरस फ्लॉपी खराब किंवा संगणकाच्या भाषेत करप्ट करायचा. त्या काळात फ्लॉपी हे डेटा एका कम्प्युटर वरून दुसऱ्या कम्प्युटरवर हलवायच एकमेव साधन होतं, सीडीचा जन्म झाला होता तरी फ्लॉपी वापरणं तुलनेने सोप असल्यामुळे तमाम जनता तेव्हा फ्लॉपी वापरात असे.

मॉडर्न कॉलेज मध्ये दुसऱ्या वर्षात तेव्हा संजय काटकर नावाचा विद्यार्थी कम्प्युटर आणि सी प्रोग्रामिंग शिकत होता. साताऱ्यातून आलेला हा विद्यार्थी तेव्हा तानाजी वाडीत राहत असे. घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. वडील साहेबराव तेव्हा फिलिप्स मध्ये मशीन फिक्सिंगच काम करत होते, त्यांना वेगळ्या वेगळ्या इलेकट्रोनिक वस्तू रिपेयर करताना पाहून मोठा भाऊ कैलास त्याच शिक्षण सोडून रिपेयरमन म्हणून काम करत होता. संजयला पण शिक्षण सोडायची भयानक इच्छा झालेली पण त्या वेळेस कैलाशने त्याला शिक्षणाच महत्व पटवून सांगितलेलं. फावल्या वेळेत काही तरी काम केले पाहिजे म्हणून संजय, तेव्हा अमोल देशपांडे सोबत त्याच्या सॉफ्टएड कम्प्युटर्स या कंपनी मध्ये जायला लागला, या कंपनीकडे सीजी क्योर नावाचे अँटी व्हायरस सॉफ्टवेअर होते, या सॉफ्टवेयरवर काम करत करत संजयला संगणकातील व्हायरस या विषयामध्ये रुची निर्माण झाली, संगणकीय व्हायरस कशा पद्धतीने संगणकाचे काम बंद पडतात ? ऑपरेटिंग सिस्टिम म्हणजे काय ? संगणकात मेमरी ऑलोकेशन कशा पद्धतीने होते अशा क्लिष्ट संगणकीय संकल्पना तो समजावून घेऊ लागला. एक दिवस त्याला डिबग.कॉम या प्रणालीची माहिती कळली (पूर्वी जेव्हा डॉस ऑपरेटिंग सिस्टिम ४ किंवा त्याचा आधीची प्रणाली अस्तित्वत होती तेव्हा डीबग.ईएक्सईला डिबग.कॉम म्हंटलं जात असे). या प्रणाली योगे सॉफ्टवेअर सिस्टिम मधल्या चुका शोधता येत असत. हि प्रणाली तेव्हा प्रत्येक संगणकावर उपस्थित असायची, या प्रणाली वर व्हायरस ग्रस्त फाइल्स पाहत असताना त्याला या क्षेत्रात आणि पर्यायाने संगणकात आणि प्रोग्रामिंग मध्ये रुची निर्माण होऊ लागली. पुढे हा विद्यार्थी इतिहास घडवणार आहे याची कोणाला कल्पना पण तेव्हा नव्हती. संजय तेव्हा अक्राळ विक्राळ बनत चाललेला व्हायरसच्या आपत्तीतून हाच संजय प्रचंड संपत्ती निर्माण करणार आहे याची पुसटशी कल्पना सुद्धा कोणाला नव्हती.

संजय हा शैक्षणिक दृष्ट्या खूप ब्राईट या सदरात मोडणारा विद्यार्थी नव्हता, उलट शाळेमध्ये असताना सतत दांड्या मारल्याने प्राचार्यांनी संजयला एकाच वर्गात दोन वर्ष बसायला लावलं होत, वडिलांना बोलावून घेऊन संजय शाळेत दांड्या असल्याचं सांगितलं होतं. पण साहेबराव काटकर हा खूप आदर्शवादी माणूस होता, त्यांना शिक्षणाची किंमत माहिती होती, आपली मुलं शिकावीत म्हणून ते  फिलिप्स कंपनीमध्ये काबाड कष्ट करत होते, ८० च्या दशकात वाकडेवाडी सारख्या, पुण्याच्या, तुलनेने मागासलेल्या भागात राहूनसुद्धा त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना इंग्लिश मीडिअम शाळेमध्ये घातलेलं. प्राचार्यांनी जेव्हा त्यांना बोलावून घेतलं आणि संजयची शाळा बुडवायची कथा कथन केली तेव्हा साहेबरावांनी प्राचार्यांना सांगितलं कि करा संजयला नापास, हरकत नाही, शिक्षणाची किंमत कळेल त्याला.

छोट्या संजयसाठी हा धक्का होता, त्याला वाटलेल आपले वडील आपल्याला प्राचार्यांसमोर वाचवतील पण घडलं काही तरी वेगळंच. या धक्क्यातून संजय सावरला, त्याने नेटाने अभ्यास केला आणि बऱ्यापैकी मार्क्स मिळवत तो इंजिनीरिंगला दाखल झाला. या काळात त्याचा सोबत त्याचा मोठा भाऊ भक्कमपणे उभा राहिला.

भाग एक | भाग तीन | भाग चार | भाग पाच