शब्दांच्या मागचे शब्द – ८- खटाटोप

या सदरात शब्दांचा उगम, व्युत्पत्ति, शब्दार्थ तसेच व्याकरणाच्या दृष्टीने त्या शब्दांचा केलेला ऊहापोह  जाणून घेता येईल 

498

खटाटोप

खटाटोप या शब्दाची उगमकथा रंजक आहे. ‘फटाटोप’ या शब्दापासून पुढे ‘खटाटोप’ असा अपभ्रंश होऊन हा शब्द मराठीत आला असे सांगतात.

मूळ संस्कृत श्लोक असा-
निर्विषेणापि सर्पेण कर्तव्या महति फणा |
विषमस्तु न चाप्यस्तु फटाटोपो भयंकर: ||

या श्लोकाचा शब्दशः अर्थ असा की विष नसलेल्या सापाने सुद्धा (स्वसंरक्षणार्थ) विषारी सापाचे अनुकरण करावे कारण विष नसलेल्या सापाने नुसता फटाटोप केला (फणेचा विस्तार केला) तरी तो लोकांना भयप्रद होतो.

या संदर्भात एक कथा सांगितली जाते ती अशी-
एकदा एक विषारी साप होता आणि तो जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांना दंश करीत असे. जेव्हा हा प्रकार आदि शंकराचार्यांच्या कानावर गेला तेव्हा त्यांनी त्या सापाला लोकांना दंश न करण्याची /त्रास न देण्याची विनंती केली. काही दिवसांनी आदि शंकराचार्य तिथून जात असताना त्यांना दिसले की साप जखमी अवस्थेत आहे आणि त्याची फारच वाईट अवस्था आहे. त्यांनी त्याला कारण विचारले असता साप उत्तरला, “महर्षी, तुम्हीच मला लोकांना त्रास देऊ नको, दंश करू नकोस असे सांगितले होते. मी त्याप्रमाणे केले. परंतु जेव्हा लोकांना हे कळले की मी निरुपद्रवी आहे तेव्हा त्यांनी मला दगड मारण्यास, त्रास देण्यास सुरुवात केली.

त्यावर शंकराचार्यांनी त्याला सांगितले की “मी तुला दंश करू नकोस असे सांगितले होते, लोकांवर फणा वर काढू नकोस असे नव्हते सांगितले” या कथेचा परिपाक वरील श्लोकाच्या अर्थात दिसून येतो.यावरून खटाटोप म्हणजे सर्व बाजूनी जिवापाड केलेली खटपट, कार्य थोडे आणि खटपटीचे अवडंबर मोठे असा अर्थ रूढ झाला.