काय आहे जॉर्ज फ्लॉइड प्रकरण आणि कोण होता हा जॉर्ज फ्लॉइड?

1679
काय आहे जॉर्ज फ्लॉइड प्रकरण आणि कोण होता हा जॉर्ज फ्लॉइड?

जॉर्ज फ्लॉयड हा एक सामान्य अमेरिकन होता,  त्याचा जन्म नॉर्थ कॅरोलिना मध्ये झालेला पण  तो एक सिक्युरिटी गार्ड म्हणून मिनीयापोलिसमध्ये एका रेस्टॉरंट मध्ये कामाला होता. २५ मे रोजी त्याने एका दुकानातून काही जिन्नस विकत घेऊन ज्या नोटा दिल्या त्यातली एक २० डॉलरची नोट बनावट निघाली. लगोलग दुकानदाराने पोलिसांकडे तक्रार केली आणि डेरेक चोवीन या पोलीस अधिकाऱ्याने त्याला ताब्यात घेतले.

तब्बल आठ मिनिटं या पोलिसाने जॉर्जची मान आपल्या गुडघ्याखाली दाबली आणि यातच त्याचा जीव गेला. हि घटना घडत असताना आजूबाजूच्या लोकांनी या घटनेचे मोबाईलवर शूटिंग केलं आणि हि बातमी जागोजागी पसरली. खरं तर १५०० रुपयांसाठी किंवा २० डॉलर्सची हि शिक्षा अमानवीयच, पण पोलिसाने वर्ण द्वेषातून हे कृत्य केलं असल्याचे समोर आले आणि या घटनेला वेगळेच हिंसक वळण लागले.

फ्लॉइड सातत्याने आपण गुदमरत असल्याचं सांगताना व्हीडिओत दिसतात. मला श्वास घेता येत नाहीये, असं ते विनवणीच्या स्वरात म्हणतात. पण पोलीस काही त्याला सोडत नाहीत. फ्लॉइड बेशुद्ध झाल्यानंतरही सुमारे तीन मिनिटं या पोलिसाने आपला गुडघा हलवला नाही.

अमेरिका कितीही स्वतःचा टेम्भा मिरवत असली तरी या  प्रकरणामुळे अमेरिकेत आजही वर्णद्वेष कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच संपूर्ण देशातील लोक रस्त्यावर उतरून प्रदर्शन करू लागले. पोलिसांनी लोकांना पिटाळून लावण्यासाठी अश्रुधुर आणि रबराच्या गोळ्यांचा मारा केला. परिणामी लोक चिडले आणि पाहता पाहता संपूर्ण देशात जाळपोळ सुरू झाली.

मागील काही दिवसांपासून अमेरिकेत प्रचंड हिंसाचार सुरू आहे. आतापर्यंत हजारो लोकांना अटक करण्यात आली. परंतु, प्रकरण अद्यापही शांत झालेले नाही. सर्वाधिक हिंसाचार मिन्नेसोटा, जॉर्जिया, ओहियो, उटाह, टेक्सास आदी भागात झाला आहे. संतप्त लोकांनी अनेक पोलिस स्टेशन आणि इमारतींना आगी लावल्या.पोलीस अमानुषपणे निदर्शकांना मारत आहेत, अंगावर गाड्या घालत आहेत, अश्रूधूर सोडत आहेत, पोलिसांचे वागणे देखील आता दंगल कर्त्यां प्रमाणेच होत चालले आहे. वर्णद्वेषाला या देशात खूप मोठा इतिहास आहे.

या सगळ्या प्रकरणाचा फायदा ना  घेतला तर ते ट्रम्प कसले, जाळपोळ चालू झालेली असताना त्यांनी ट्विट केलं कि जेव्हा लुटालूट चालू होता तेव्हा गोळीबार चालू होतो, अर्थात हे ट्विट ट्विटर या कंपनीने लपवले आणि मग ट्रम्प ट्विटर वर बरसले. एक जूनला तर या कृष्णवर्णीयांनी ट्रम्प यांच्या व्हाईट हाउस वरच हल्ला केला आणि ट्रम्प यांना सुरक्षित स्थानी हलवायला लागलं. हे प्रकरण चिघळतच चाललं आहे आणि शांत होण्यासाठी काही वेळ जावा लागेल.

पोलीस देखील बिथरले आणि मग पोलिसांनी जमवला फोडून काढायला सुरुवात केली पण पोलिसांचे हे वागणे निश्चितच मानवतेला शोभा देणारे नव्हते. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी अमानवीय पद्धतींचा अवलंब चालू केला असल्याचे व्हिडियोज देखील प्रसिद्ध होऊ लागले आहेत आता.

आधीच कोरोनाने त्रस्त असलेल्या या देशाला हे नवे संकट सावरताना चांगलाच घाम गाळावा लागत आहे. लाखो लोक रस्त्यावर एकत्र आल्याने कोरोना संक्रमणाचा धोका कैक पटीने वाढला आहे.