अभ्यासोनी प्रगट व्हावें!

1052

ई-लर्निंग ही आता काळाची गरज झाली आहे. या ई-लर्निंग चा उपयोग विद्यार्थ्यांना कितपत होईल, शिक्षकांना हे कितपत झेपेल आणि यामुळे केलेले मार्गदर्शन किती सखोल होईल याची उत्तरे काळच देणार आहे. पण या दिवसांमध्ये पालक – शिक्षक – विद्यार्थी हा तंत्रज्ञान जाणून घेणारा, तंत्रज्ञानाचा उपयोग करुन घेणारा झाला हेही महत्त्वाचे. यात शहरी विद्यार्थी आणि ग्रामीण भागातला विद्यार्थी असा फरक होणारच आहे. कारण ग्रामीण भागातील बुद्धिमान विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची सहजसुलभ उपलब्धता असेल की नाही हे सांगता येत नाही , याउलट शहरी भागात तंत्रज्ञानाची सहजसुलभ उपलब्धता असूनही ती या कार्यासाठी वापरली जाणे हे महत्त्वाचे. या सर्वात केंद्रीभूत असणारा विद्यार्थी आदर्श (आयडियल स्टुडन्ट) असावा हे नक्की.

आता हे पाहणे आणखी गंमतशीर असेल कि तंत्रज्ञान मानवावर मात करणार का मानव तंत्रज्ञानावर ! विद्यार्थ्यांना माहितीची उपलब्धता भरपूर असेल, पुरेशी असेल पण त्यांना मिळणाऱ्या ज्ञानाचे काय ? ज्ञान आणि माहिती याची गल्लत होऊ नये हे महत्त्वाचे. हे सर्व सांगणारा विश्वासू – महत्त्वाचा मुख्य स्रोत म्हणजे अनुभवी शिक्षक. मातृभाषेतून शिक्षण हा वेगळाच महत्त्वाचा फॅक्टर दुर्लक्ष करून चालणार नाही.

अध्ययन करताना शिक्षक समोर असणे हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने जास्त हिताचे अन् फलदायी असणार हे नक्की, यावर कुणाचे दुमत असणार नाही. मी गणिताचा शिक्षक असल्याने मुलांनी गणित शिकल्यावर ते कितपत आत्मसात
केलं हे वेळोवेळी बघणं आणि मार्गदर्शन करणे हे जास्त उपयुक्त असे मला वाटते. गणितात संकल्पना स्पष्टीकरणावर तसेच सरावावर तसेच काही सूत्रांवर भर देणे हे महत्त्वाचे.

विद्यार्थी समोर असताना याबाबतीत मार्गदर्शन हे जास्त फलदायी असेल. कारण विद्यार्थी समोर असताना त्याची परीक्षा घेणे आणि त्याला अनुसरून मार्गदर्शन करणे हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने जास्त आत्मविश्वास  वाढविणारं आणि त्याला प्रगतीकडे नेणारं ठरतं. आणि हे सर्व कुठे येऊन थांबतं? तर स्वयंअध्ययनापाशी … म्हणजेच आत्मनिर्भरतेपाशी.
आपल्याकडे मुलांना अकरावी प्रवेश घेताना कला – शास्त्र – वाणिज्य अशी शाखानिहाय प्रवेश द्यायची पद्धत रूढ आहे. पण आपण असा कधी विचार केलाय का, की शाखा समन्वयाने जर त्या मुलाला त्याच्या आवडीचे विषय निवडायचे असतील आणि त्याविषयी अभ्यास करायचा असेल तर तशी सवलत आहे का. नाही ! एकदा विद्यार्थ्याने
कला किंवा शास्त्र शाखा निवडली की त्या शाखेला अनुषंगानेच विषयाचा अभ्यास त्याने करायचा मग शास्त्र शाखेच्या मुलाला कॉमर्स मधला इकॉनोमिक्स किंवा अकाउंटन्सी विषय शिकायची इच्छा असेल तरी त्याने ते बोलू़नंही दाखवायची नाही ! विचारंही करायचा नाही ! असंच झालंय.

एखाद्या कला शाखेच्या विद्यार्थ्याला जर गणित घ्यायचं असेल, फिजिक्स घ्यायचं असेल आणि त्याबरोबर संस्कृत जर्मन व इकॉनॉमिक्स किंवा राज्यशास्त्र असा विषय
अनुक्रम घेऊन अकरावी – बारावीची परीक्षा द्यावयाची असेल तर ते त्या विद्यार्थ्याच्या पुढील जीवनात उपयुक्त असेल असा विचार आपणही कधी करत नाही. काही शिक्षणतज्ञांच्या मनात हा विचार येऊनही गेला असेल पण तो कार्यान्वित करणं कठीण होत असेल. अहो याचं अगदी साधं उदाहरण म्हणजे मुलगा आयुर्वेद शास्त्राचा अभ्यास करायला जातो त्यावेळेला त्याने बारावीला संस्कृत घेतलेलेही नसते आणि मग तो भाषांतर शिकून आयुर्वेद शास्त्राचा अभ्यास करतो . . . किती हास्यास्पद आहे हे !

जोपर्यंत त्या संस्कृत श्लोकातला गर्भितार्थ कळत नाही तोपर्यंत त्या शास्त्राने सांगितलेलं औषध कसं तयार करणार ? यामुळे होईल असं की, अर्थ एक सांगितलेला असेल अन् भाषांतरामुळे याला अर्थ समजला वेगळाच असेल  आणि मग भलतंच औषध तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अगदी तसाच भाग सहकार, चिटणीसाचा व्यवसाय, अर्थशास्त्र आणि गणिताचा ! आणि जीवशास्त्र – अभियांत्रिकीचाही !  कितीतरी उदाहरणे अशी देता येतील.

हे केव्हा ना केव्हा बदलले पाहिजे. यासाठी समाजानेही मानसिकतेत जागृती दाखवायला हवी, प्रतिष्ठित बुद्धिजीवी वर्गानेही याबाबतीत आपली मतं स्पष्टपणे समाजासमोर मांडायला हवीत. विषय समन्वयाने अभ्यास करणे आणि त्याला प्रगत तंत्रज्ञानाची जोड देणे ही आता काळाची पावले ओळखली पाहिजेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचा गोडीचा विषय शिकायला मिळणं आणि त्यावर त्यांनी काही रिसर्च करणं हे जसं त्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत उत्कर्ष निर्माण करतं तसेच ते त्या देशालाही मान उंचावायला लावणारं असतं.