माध्यमातून बाहेर पडलेले स्वतःच बनत आहेत माध्यम

गेल्या वेळी आपण प्रिंट मीडियाबद्दल बोललो. इलेक्ट्रॉनिक माध्यमांची अवस्थाही काही फारशी चांगली नाही. आपल्या देशात सुमारे नऊशे टीव्ही चॅनल्स आहेत. त्यातली निम्मी न्यूज चॅनल्स आहेत.

374

कोरोनाचं संकट कायमच असलं तरी अनलॉकचे टप्पे सुरू झाल्यानं सर्वच माध्यमं सध्या काहीशी ” रिलॅक्स्ड ”  झाली आहेत. गेल्या वेळी आपण प्रिंटमीडियाबद्दल बोललो. इलेक्ट्रॉनिक माध्यमांची अवस्थाही काही फारशी चांगली नाही. आपल्या देशात सुमारे नऊशे टीव्ही चॅनल्स आहेत. त्यातली निम्मी न्यूज चॅनल्स आहेत. न्यूज चॅनल्सच्या दर्शकांमध्ये लॉकडाऊनच्या काळात वाढ झाली हे खरं आहे. कारण लोकांना बातम्यांत आणि ताज्याघडामोडींविषयी जाणून घेण्यात रस आहे. डिजिटल आणि व्हिडिओ पोर्टलवर त्यामुळे सध्या प्रचंड ट्रॅफिक वाढलं आहे; पण ही स्थिती चॅनेलसाठी सुखावह नव्हती आणि नाही. कारण लॉकडाऊन असल्यामुळे सर्व चॅनल्सना कोरोना एके कोरोना करत बसावं लागलंय. नाही म्हणायला मध्यंतरी निसर्ग चक्रीवादळानं थोडं डायव्हर्शन झालं. पण नव्या स्टोरीज मिळवायला फिल्डवर जाणं सध्या तरी शक्य नाही. परिणामी जाहिरातींचा ओघ आटला आहे. वसुलीचं अत्यल्प प्रमाण आणि भविष्यातील आर्थिक प्राप्ती बद्दलची अनिश्चितता यामुळे पुढचे सहा ते नऊ महिने सर्वांनाच झळ पोचणार आहे.

न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशन NBA  ने गेल्याच महिन्यात केंद्र सरकारला पत्राद्वारे विनंती केली आहे की न्यूज चँनल्सच्या जाहिरातींवरचा 18% जीएसटी रद्द करावा किंवा कमी तरी करावा. इंडिया टीव्हीचे एडिट- इन-चीफ श्री. रजत शर्मा हेच एनबीएचे चेअरमन आहेत. केंद्र सरकारचं असं म्हणणं आहे की आम्ही आमच्या परीनं सर्वच मीडियाला या संकटात करता येईल तेवढी मदत करीत आहोत.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 11 एप्रिल 2020 रोजी सर्व केंद्रीय मंत्रालयांना पत्र पाठवून सूचित केलं आहे की “लॉकडाऊनमुळे संकटात असलेल्या मीडिया हाऊसेसना जाहिराती देऊन सहकार्य करा.”  केंद्रातील सर्व मंत्रालयांचं मिळून वर्षाला मीडियासाठीचं बजेट किती असेल?  चारशे कोटींचं.  त्यातून आता इलेक्ट्रॉनिक मीडियाला किती मिळतात आणि ती रक्कम त्यांच्यात किती प्राण फुंकू शकेल हे सांगणं अवघड आहे.महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर मराठीतल्या न्यूज चॅनल्सची धडपड आपण बघतो आहोत. रोजचा शो रन करणं ही अवघड कामगिरी आहे. बिग बॅनर्सआणि उत्तम नेटवर्किंग असलेले काही न्युज चॅनल्स त्यातही नावीन्य आणू बघत आहेत. परंतु मुळातच आर्थिक कोंडीमुळे विविध डिपार्टमेंटमधील स्टाफकाही चॅनल्सनी कमी केला आहे. काही करस्पाँडंट्स आणि अँकर्स गर्दीत आणि तणावात अथक काम करीत राहिल्याने आजारी पडले; तर काहींनाकोरोनाची बाधा झाली. वर्क फ्रॉम होमचा नवा प्रयोगही  लॉकडाऊनच्या  प्रारंभीच्या काळात  चॅनल्सवर प्रथमच यशस्वीपणे करण्यात आला.

या काळातील आणखी एक ठळक बाब म्हणजे इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट मीडियातून बाहेर पडलेले अनेक जण स्वतःच एक “माध्यम”  बनले आहेत. अनेकांनी आपापली युट्युब चॅनल्स सुरू केली आहेत. काहींनी फेसबुक पेजेस, इन्स्टाग्राम पेजेस या माध्यमातून जिल्हा आणि तालुका स्तरावर बातम्या दाखवायला सुरुवात केली आहे. फेसबुक लाईव्ह ही देखील आता सवयीची बाब झाली आहे. स्थानिक प्रशासन, नेते, कार्यकर्ते यांची या नव्याव्यक्तिकेंद्रित माध्यमांमुळे चांगलीच सोय झाली आहे. परंतु या माध्यमांना व्ह्युअर्स किती मिळतात यावर त्यांचं आर्थिक गणित अवलंबून असेल. शिवाय या नव्या माध्यमांची ही भाऊ गर्दी कोरोना काळापुरतीच आहे की पुढेही ते स्पर्धेत टिकून राहतील हे येणारा काळच सांगेल. कारण या संकटाला संधी मानून टिकून राहायचं असेल तर सातत्य, संयम, दर्जा  आणि विश्वासार्हता या गोष्टी गरजेच्या आहेत. त्याच्याच जोडीला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला उद्देश काय हेही या नव्या माध्यमांना निश्‍चित करावं लागेल. हे भान असलेले कुशल, कल्पक पत्रकार या क्षेत्रात उत्तम कामगिरी करून वैध मार्गाने नक्कीच नाव आणि पैसाही कमवू शकतात.

Previous articleThrough The Eyes Of A Commoner
Next articleशब्दांच्या मागचे शब्द -९ -किमया 
कवी, लेखक, माध्यमस्नेही अशा विविध भूमिका सुनील शिनखेडे हे पार पाडत आहेत . ते सध्या आकाशवाणी सोलापूर केंद्रात सहायक संचालकपदी कार्यरत आहेत . त्यांच्या करिअरची सुरुवात नागपुरात १९८० साली पत्रकारितेतून झाली . त्यांनी कविता संग्रह, ललित लेखन, समीक्षा अशी ५ पुस्तकं प्रकाशित केली . यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी "बातमीची विविध क्षेत्रे" या पुस्तकसंचाचं लेखन त्यांनी केले . गेल्या ३० वर्षात आकाशवाणीसाठी विविध क्षेत्रातील  अनेक मान्यवरांच्या  मुलाखती घेतल्या.