अभ्यासोनी प्रगट व्हावें! – भाग २

ज्ञान आणि माहिती याची गल्लत होऊ नये हे महत्त्वाचे. हे सर्व सांगणारा विश्वासू - महत्त्वाचा मुख्य स्रोत म्हणजे अनुभवी शिक्षक. मातृभाषेतून शिक्षण हा वेगळाच महत्त्वाचा फॅक्टर दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रत्येक पालकाने वाचावा असा प्रसाद कुंटे यांचा कॉलम "अभ्यासोनी प्रगट व्हावे"

875
अभ्यासोनी प्रगट व्हावें!

‘ शुद्धलेखन आणि पाढे झाले की नाष्टा करायला या रे मुलांनो ‘ असं वाक्य घराघरात आमच्या आळीत ऐकू यायचं . सकाळी लवकर उठून व्यायामाला जाणं, आल्यावर चहा किंवा दूध आणि साडेसातच्या आंत अंघोळ अशी दिवसाचीसुरुवात. अंघोळ झाल्यावर गीतेचा पंधरावा अध्याय रोज म्हणायचा हा दंडक असे. पाढे रोज म्हणायचे आणि शुद्धलेखन म्हणजे काय तर एक दिवसाआड इंग्रजी – मराठी वृत्तपत्रातून येणारे आवडतील ते कोणतेही दोन बातमी वजा कॉलमसुवाच्य अक्षरात लिहून काढायचे.

काही कारणाने एखादा दिवस हे राहिलं तर आजी म्हणायची, ‘राहू दे आज एकदिवस’, मग खूप आनंद व्हायचा. कधीतरी आजोबा किंवा काका हाताला धरून भाजी मंडईत घेऊन जायचे. शाळेला सुट्टीसुरू झाली की सकाळचा हा उपक्रम शिक्षणपूरक असायचा हे त्यावेळेला कधी समजलेच नाही. पण कालांतराने त्याचाउपयोग कळला तेव्हा समजलं की पुस्तकी शिक्षण एवढेच पुरेसे नाही. त्याकाळी आजी आजोबा घरातली वडीलधारीमाणसं यांच्याकडून जे जे काही शिकता आलं त्या शिक्षणाचा पुढे व्यवहारात सतत उपयोग होत राहतो हे आत्ता समजते. संध्याकाळच्या वेळेला शेजारी-पाजारील सर्व मुलं स्तोत्र / श्लोक म्हणायला एकत्र यायची आणि याबरोबर आजीकडून,शेजारील काकूंकडून काही गोष्टी ऐकायला मिळायच्या. यात रामायण-महाभारत, इसापनीती तसेच काही उद्बोधककथाही असायच्या. नकळतच शिक्षणाबरोबर संस्कारही होत गेले. सुशिक्षित असणं, सुसंस्कारित असणं याहीपेक्षा सुसंस्कारित सुशिक्षित असणं केव्हाही प्रतिष्ठेच.

मनात विचार असा येतो की शैक्षणिक वर्षात उन्हाळ्याची सुट्टी आणि दिवाळीची सुट्टी ही अभ्यासपूरक शिक्षणासाठीदिली असेल, म्हणजे अंदाजे पन्नास दिवस तर आत्ता हा लॉकडाऊनचा मिळालेला कालावधी संधी म्हणून पाहिला आणिया काळात आपल्या आयुष्यातील वर्ष-दीड वर्ष ज्ञानोपासना, बलोपासना, संस्कार, जीवनाची ध्येयं आणि  उद्दिष्टंठरविणं या सर्वांसाठी दिलं तर काय हरकत आहे? पण असं म्हणणं थोडेस धाडसाचेच होईल आणि सर्वमान्य होणारहीनाही – कदाचित!   अशा काळात शिक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची … पिढीला योग्य दिशा दाखविणं, चांगली वाटदाखविणं, मार्गदर्शन करणं या जबाबदारीला  जागलंच पाहिजे. कारण शिक्षकांविषयी आदर-विश्वास विद्यार्थ्यांच्या खूपअग्रस्थानी असतो.

या विद्यार्थी-शिक्षक नात्यात डिस्टंसिंग मात्र काही कामाचं नाही. मनमोकळा सुसंवाद झालाचपाहिजे.  शिक्षकांनी वर्गात शिकवताना आपला अभ्यासक्रम किंवा पाठ्य जास्तीत जास्त उत्कृष्ट कसा होईल हेपाहण्याबरोबर त्याची सखोलता अधिक विवरून सांगितली, स्पष्ट केली तर विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हे खूप उपयोगाचं, महत्त्वाचं ठरतं आणि विद्यार्थ्यांनाही त्याच प्रमाणे अभ्यास करावयाची सवय लागते. स्वयंअध्ययन-चिकित्सक अभ्यासाचीहीच तर सुरुवात. एखादा भाग येत नसेल, त्यावेळेला सुटत नसेल तर वर्गात मुलांना हे लगेच समजतं की इथे शिक्षकांनाथोडीशी अडचण येत आहे … अशा वेळेला स्पष्टपणे कबुली देणे केव्हाही योग्यच. ‘वेळ मारून नेण्यासाठीविद्यार्थ्यांपर्यंत चुकीची माहिती जाणार नाही ’ हा शिक्षकधर्म कटाक्षाने पाळलाच पाहिजे. समर्थांनी म्हटल्याप्रमाणे, अभ्यासे प्रगट व्हावेनाहीतरी झाकुनी असावे | प्रकट होऊनी नासावे | हे बरे नव्हे | याचा थोडा तरी विचार कधी विद्यार्थ्यांनी – शिक्षकांनी केला आहे का ? नसेल केला तर करायलाच हवा. म्हणजे पूर्ण तयारी असल्याशिवाय शिक्षकअध्यापनासाठी वर्गात जाणार नाही आणि विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट होणार नाही. यामुळे एखाद्या महाविद्यालयाचीकिंवा एखाद्या कोचिंग क्लासची उत्कृष्ट निकालाची परंपरा नक्कीच राहील.

असे अभ्यासपूर्ण अध्ययन-अध्यापन झाले तर अग्रस्थानी असणारा गुणवंत विद्यार्थीही विषयज्ञानात नक्कीच तरबेजअसेल, परिपक्व असेल. असं म्हटलं याचं कारण काही वेळेस दहावी-बारावीला उत्कृष्ट गुण असणारा विद्यार्थी नंतरच्यापरीक्षांमध्ये मागे पडलेला दिसतो तर विषय ज्ञान भक्कम असणारा विद्यार्थी चमकतो. प्रश्न असा येतो की परीक्षेचीतयारी करताना आणि विषयज्ञानाचा अभ्यास करताना त्याची सांगड कशी घालावी? त्यासाठी अगदी साधी आणि सोपीपद्धत अवलंबिली की हे सहज जमून येईल. अभ्यास करताना व्याख्या-सूत्र स्वतंत्र वहीत लिहून काढाव्यात, आकृत्यांसाठीवेगळी वही करावी. आठवड्यातून एकदा या सर्वांचा लिहून सराव करावा. भाषा विषयांसाठी संदर्भ शोधावेत, वृत्तपत्र – नियतकालिकं वाचनात ठेवावीत, जेणेकरून स्वतःची भाषा समृद्ध होते. विषयाची तयारी कितपत झाली आहे हे जाणूनघेण्यासाठी परीक्षा पाहिजे.त्यासाठी पाठ्यपुस्तकातील कोणतेही पान उघडा… डोळ्यासमोर येईल तो प्रश्न, येईल तेउदाहरण एका स्वतंत्र कागदावर लिहून घ्या … असं पाच ते सात वेळा केलं की आपली प्रश्नपत्रिका तयार होईल… तीसोडवा. आपोआपच आपल्याला कळून येतं की आपली तयारी कितपत झाली आहे.

सराव अत्यंत महत्त्वाचा…सराव जेवढा अधिक तेवढा आत्मविश्वास वाढतो… आत्मविश्वास वाढला की विषयाची गोडीनिर्माण होते आणि विषयज्ञान परफेक्ट पक्क व्हायला लागतं. यालाच तर आपण म्हणतो पाया पक्का असणे. मागीलपिढीकडून आलेला ज्ञानवारसा, संस्कार आपण पुढील पिढीकडे धनात्मक वाढीने संक्रमित केला आणि असेच संक्रमणचालू राहिले तर ज्ञानसमृद्ध-संस्कारक्षम-बलवान राष्ट्रनिर्मिती होणारच.