नवं तंत्र आणि छापील पुस्तकांचा गंध

216

जून महिना उजाडला की शाळेचे दिवस आठवतात. मृदगंध आणि नव्या कोऱ्या पुस्तकांचा गंध यांच्या दरवळानं  मन भरून जायचं. पुस्तकांशी असलेल्या नात्याची ओल  अशी गंधभारित आहे. “पुस्तक म्हटलं की छापील” या प्रखर वास्तवामुळे कल्पनेला पंख फुटण्याचं काही कारणच नव्हतं तेव्हा. परंतु आता पुस्तकांचं जग पार बदललंय. तंत्रज्ञानानं निर्माण केलेल्या या नव्या जगात ई- पुस्तकांना, किंडलवरच्या पुस्तकांना तो परिचित गंध नसला तरी नव्या पिढीत नेटवर पुस्तकं वाचण्याचा छंद जपला जातोय याचा आनंद मानायलाच हवा. त्याचबरोबर दुसरीकडे, आव्हानांना धैर्यानंं सामोरे जात जगभरचा पुस्तक प्रकाशन व्यवसाय नेटानं चालवला जातो आहे त्याबद्दल प्रकाशकांना दाद द्यायला हवी. छापील पुस्तकं वाचणाऱ्या वाचकांनाही दाद !

पुस्तकांचं जग अफाट आहे. मराठीतच जवळपास पाचशे प्रकाशक आहेत. हे साहित्य प्रकाशित करणारे. परंतु पाठ्यपुस्तकं आणि इतर पुस्तकांच्या प्रकाशकांचीही संख्या शंभरावर नक्कीच आहे. मोहन वैद्य हे अवलिया संपादक दर दोन वर्षाआड ‘प्रकाशनविश्व’ हा सातशे पानी ग्रंथराज पुण्यातून प्रकाशित करतात. मराठी प्रकाशन आणि साहित्यव्यवहाराच्या थक्क करणाऱ्या व्याप्तीची प्रकाशनविश्ववरून कल्पना येते.

‘शोधगंगा’ने तर देशपातळीवरील अभ्यास आणि निष्कर्ष मांडणारा ग्रंथच 2016 साली प्रकाशित केला आहे. त्यातला आकडेवारीचा तपशील छापील पुस्तकव्यवहाराच्या बाबतीत आजही चिंतामुक्त करणारा वाटतो. सध्या भारतात विविध प्रकारचे 16 हजारावर प्रकाशक आहेत. वर्षाला सर्व 24 भारतीय भाषांमध्ये दरवर्षी 90 हजारांहून अधिक पुस्तकं प्रकाशित होत असतात.

पूर्वीच्या तुलनेत आता कुठलंही पुस्तक फक्त आठवडाभरात छापून तयार होऊन मार्केटमध्ये येऊ शकतं. पुस्तकांचं मार्केटिंग हा स्वतंत्र विषय आहे. ज्यांना पुस्तकाचं मार्केटिंग उत्तम करता येतं असे मराठीतले उत्तमोत्तम प्रकाशक आताच्या प्रचंड स्पर्धेतही चांगली कामगिरी करताहेत. नवे लेखक, नवे विषय, वाचकांची बदलती अभिरुची या गोष्टी लक्षात घेऊन नियोजन केलं जातं. शिवाय वाचकांसाठी सवलतीच्या आकर्षक योजना आखल्या जातात. दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात होणारी पुस्तकांची कोट्यवधी रुपयांची खरेदी-विक्री आपण अनुभवतो आहोत. ही बौद्धिक श्रीमंती वाचनसंस्कृतीबद्दलच्या निराशाजनक आणि उथळ चर्चांना चोख आणि रोख उत्तर आहे.

पुण्यातल्या चपराक प्रकाशनानं 2019 मध्ये एक वर्षात 365 पुस्तकं प्रकाशित करण्याचा संकल्प केला होता आणि बव्हंशी तो पूर्णही केला. घनश्याम पाटील यांनी हा संकल्प यशस्वी करण्यासाठी अनेक कल्पक उपक्रम केले.  कोविड संकटामुळे दिवाळी अंक यंदा निघतील की नाही अशी चर्चा आता सुरू झाली आहे; परंतु त्याच्या कितीतरी आधीच या चपराकने दिवाळी अंकाचं नियोजन जाहीर करून अंकाचं ऑनलाइन बुकिंगही केलं. वाचकसंख्येमुळेच ते हे धाडस करू शकतात हे लक्षात घेतानाच मार्केटिंगसाठी अद्ययावत तंत्रज्ञान वापरायचं आणि मुद्रित माध्यमांची कास सोडायची नाही यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांना दाद द्यायलाच हवी. मेहता पब्लिकेशनचे सुनील अनिल मेहता यांचा अनुभव आणि अॅप्रोच सुद्धा सकारात्मक आहे. त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर ते म्हणाले, “लॉकडाऊनच्या काळात पुस्तकांची दुकानं बंद होती. पुढची स्ट्रॅटेजी आखायला त्यामुळे वेळ मिळाला. या काळात ई बुकवर आमच्या पुस्तकांना चांगली मागणी होती. ॲमेझॉन आणि गुगलवर ई बुक्समुळे 70% व्यवसाय वाढला.”   छापील पुस्तकांशिवाय इतर तंत्रमाध्यमाची जोड आज प्रकाशक आणि पुस्तक विक्रेत्यांसाठी गरजेची आहे यावर त्यांनी भर दिला.

ग्रंथाली, मौज, मॅजेस्टिक, पॉप्युलर, मनोविकास, राजहंस, मेहता, कॉन्टिनेन्टल, रोहन, अक्षर, श्रीविद्या, ढवळे, ऋतुरंग, शब्द, समकालीन, प्रसाद, पद्मगंधा, परममित्र, नवचैतन्य, विजय, साहित्य प्रसार केंद्र, गोदा, डिम्पल अशा पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर अशा राज्यभरातील शेकडो प्रकाशकांनी दर्जेदार साहित्याशी आणि निर्मितीमूल्यांशी तडजोड न करता, प्रसंगी तोटा आणि आव्हानं स्वीकारून पुस्तक प्रकाशन व्यवसाय सुरू ठेवला आहे.

छापील पुस्तकांचा सुजाण वाचकांकडील वैयक्तिक संग्रह आणि ग्रंथालयांमधील संग्रह हे मराठीचं वैभव आजही डोळे दिपवतं. वाचनाकडे गंभीरपणे बघणारे आणि अभ्यासू, जिज्ञासू वाचक म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित असलेले सोलापूरचे नितीन वैद्य यांच्याशी त्यांच्या वाचन सवयींविषयी बोललो. ते म्हणाले, ” वर्षभरात ठरवून किमान 100 पुस्तकं वाचतो. त्यातली 50 पुस्तकं चालू वर्षात प्रकाशित झालेली असावीत असा माझा आग्रह असतो. आता लॉकडाऊनच्या तीन महिन्यांच्या काळात नव्या पुस्तकांचं येणं लांबलं तसं जुन्या, वाचायच्या राहून गेलेल्या पुस्तकांकडे वळलो. त्यात एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अशा पन्नास वर्षात प्रकाशित झालेली स्त्रियांची आत्मचरित्रं होती. त्यातली दुर्मिळ चरित्रं वाचली. वैचारिक विषयांवरचीही पुस्तकं वाचली. नितीन वैद्य यांच्या संग्रहात आज पाच हजार छापील पुस्तकं आहेत. वाचनासाठी नव्या तंत्रज्ञानाचा त्यांनी अद्याप स्वीकार केलेला नाही.

माझ्याही वैयक्तिक संग्रहात पाच हजार पुस्तकं आहेत. मला स्वतःला असं वाटतं की पुस्तकांशी मैत्री, पुस्तकांत हरवून जात आपली लागणारी तंद्री आणि पुस्तकांचा घरातला चैतन्यदायी सहवास हा जिवलग जिव्हाळा.. काळ कितीही पुढे गेला तरी टिकून रहायला हवा.