शब्दांच्या मागचे शब्द- १० -मेख, भाऊगर्दी, अभीष्टचिंतन

शब्दांच्या मागचे शब्द - मनोगतया सदरात शब्दांचा उगम, व्युत्पत्ति, शब्दार्थ तसेच व्याकरणाच्या दृष्टीने त्या शब्दांचा केलेला ऊहापोह  जाणून घेता येईल 

1103

मेख

मेख म्हणजे खुंटी – लाक्षणिक अर्थाने बारीकसा मुद्दा/खोच/गूढ. यावरून,

मेख मारणे- अडकवून ठेवणे, काम थांबवणे
मेख बसणे – अडकून बसणे, काम थांबणे
मेख ठेवणे – एखाद्या करारात खोच किंवा अट ठेवणे
मेख घेणे – वेठीस धरून काम करून घेणे
मेखा घेणे – सूड घेणे
मेखा उचटणे/उपटणे – ताबडतोब घालवून देणे
तुकाराम बुवाची मेख – न सुटणारे कोडे – तुकारामबुवांच्या काही अभंगात असा काही गूढ अर्थ भरला आहे की तो कुणालाच निश्चयपूर्वक उकलता येत नाही.

(संदर्भ: मराठी व्युत्पत्ति कोश -कृ पां कुलकर्णी आणि मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी – वा गो आपटे)

भाऊगर्दी /भाऊ/भाई

संस्कृतमधील भ्रातृ या शब्दावरून ‘भाऊ’ शब्द तयार झाला.

सदाशिवराव पेशवे यांना ‘भाऊ’ संबोधण्यात येत असे. पानिपतची लढाई चालू असताना एकदा ‘भाऊ’ घोड्यावरून उतरुन लढाईत घुसल्यानंतर सर्व रणक्षेत्रावर धुमाळी माजली. यावरून भाऊगर्दी म्हणजे अतिशय निकराचे युद्ध असा अर्थ. गर्दीच्या ठिकाणी गोंधळ माजल्यास ‘भाऊगर्दी झाली’ असे म्हणतात.

‘भाऊ’ शब्दावरून इतर काही शब्द –

भाऊबंद – नातेवाईक
भाऊबंदकी – भावा-भावातले वितुष्ट
भाऊबळ – भाऊबंदाच्या क्रमाने वतनाचा प्राप्त होणारा हिस्सा
भाऊबीज – कार्तिक शुद्ध द्वितीया – यमद्वितीया – या दिवशी बहीण भावाला ओवाळते
भाईचारा – सलोख्याचे संबंध
भावोजी/भाऊजी – दीर

(संदर्भ: मराठी व्युत्पत्ति कोश -कृ पां कुलकर्णी आणि मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी – वा गो आपटे)

अभीष्टचिंतन

वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करणाऱ्या जाहिराती अनेक ठिकाणी झळकतात. हा शब्द अभिष्टचिंतन, आभीष्टचिंतन असा लिहून चालणार नाही.

अभीष्ट हा या शब्दातील घटक अभि+इष्ट या दोन भागांचा मिळून बनतो. भि मधील ‘इ’ आणि इष्ट मधील ‘इ’ एकत्र येऊन त्यांचा ‘ई’ बनतो व म्हणून अभीष्ट असे रूप प्राप्त होते.

‘इष्ट’ दिशेने जाणारे, इच्छिलेले, कल्याणकारक असा या ‘अभि+इष्ट’चा (म्हणजे अभीष्टचा) अर्थ आहे.

आपले चिंतन (म्हणजे मनातला विचार) असे इष्ट दिशेने जाणारे हवे, म्हणून अभीष्टचिंतन !

(संदर्भ : मराठी व्युत्पत्ति कोश – कृ पां कुलकर्णी आणि शब्दचर्चा – मनोहर कुलकर्णी)

लेखन आणि संकलन – नेहा लिमये