आकाशवाणीतले आठवणीतले दिवस: भाग 3

लाड स्मृती व्याख्यानमालेत असे "लाड" होण्याचं भाग्य माझ्यासाठी कायम आनंददायी आणि अविस्मरणीय ठरलं.

572

लाड स्मृती व्याख्यानमाला

पुरुषोत्तम मंगेश लाड स्मृती व्याख्यानमाला ही  आकाशवाणीची गौरवशाली परंपरा आहे. हा एक अखंड ज्ञानयज्ञच! गेली ६२ वर्षे ही व्याख्यानमाला सातत्यानं सुरू आहे. पुरुषोत्तम मंगेश लाड हे भारताच्या माहिती आणि नभोवाणी मंत्रालयाचे पहिले सचिव होते. संत साहित्य, संस्कृती, तत्त्वज्ञान हेत्यांच्या जिव्हाळ्याचे आणि अभ्यासाचे विषय. त्यांनी लिहिलेले अनेक ग्रंथ प्रकाशित आहेत. त्यांच्या निधनानंतर १९५८ सालापासून ही स्मृती व्याख्यानमाला सुरू झाली. योजनाबद्ध रीतीने पूर्वतयारी करून या व्याख्यानमालेचे विषय, वक्ते आणि अध्यक्ष निश्चित केले जातात. आजवर असंख्यविद्वान वक्ते महत्त्वपूर्ण विषयांवर बोलले आहेत. आकाशवाणीतल्या माझ्या सहकारी (आता निवृत्त) डॉ. प्रतिमा जगताप यांनी या व्याख्यानमालेचा इतिहास, आजवरच्या भाषणांचे सार आणि आयोजकांचे अनुभव यावर प्रबंध लिहून पीएचडी प्राप्त केली आहे. तो प्रबंध देखील ग्रंथरूपाने प्रकाशित झाला आहे.

महाराष्ट्रातील एखादं केंद्र या व्याख्यानमालेचं यजमानपद स्वीकारतं. जाहीर आयोजन ते महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून या व्याख्यानाचं एकाच वेळी प्रसारण.. इथपर्यंतचा बौद्धिक प्रवास ज्ञानवर्धक, रंजक, काहीसा कष्टप्रद परंतु अविस्मरणीय असतो. मला आजवर तीन केंद्रांवर या व्याख्यानमालेची संपूर्ण जबाबदारी सांभाळण्याचं भाग्य लाभलं.  औरंगाबाद (१९९६) , जळगाव (१९९९) आणि सोलापूर (२००७).

औरंगाबादला प्राचार्य शिवाजीराव भोसले हे वक्ते होते, तर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे अध्यक्ष होते. विषय होता “शिवशाही आणि लोकशाही”. त्यावेळी प्रथमच महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा युतीचं सरकार स्थापन झालं होतं. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. शिवाजीराव आणि बाबासाहेब हे दोघेही ख्यातनाम वक्ते. त्यांची भाषणं अप्रतिम झाली. यावेळी मी प्रथमच या महत्त्वपूर्ण आयोजनाचे धडे घेतले. आपल्याच माध्यमातून केलं गेलेलं जाहीरभाषण प्रसारणयोग्य करण्यासाठी किती काटेकोर संपादन करावं लागतं याचं प्रात्यक्षिकच जणू त्यावेळचे केंद्रसंचालक गंगाधर चाफळकर यांच्याकडून मिळालं.  सोलापूरचा विषय शेतीच्या अर्थशास्त्राशी संबंधित होता. वक्ते होते कॉम्रेड अशोक ढवळे. अध्यक्ष होते अकोल्याच्या पंजाबराव देशमुखकृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. निंबाळकर. सोलापूर जवळच्या वडाळा या गावात हे आयोजन आम्ही केलं होतं. सुभाष तपासे केंद्र संचालकहोते. शेतकऱ्यांना या भाषणाचा लाभ व्हावा म्हणून ग्रामीण भागात आयोजन ही त्यांची कल्पना. सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीरामकाका साठे यांच्या सहकार्याने ती उत्तम साकार झाली.

आज मी प्रामुख्यानं सांगणार आहे तो अविस्मरणीय अनुभव मात्र जळगावचा आहे. जळगावला लाड व्याख्यानमालेसाठी विषय होता भारताचं मुक्तआर्थिक धोरण. अर्थशास्त्राचे व्यासंगी अभ्यासक या नात्याने नाव निश्चित झालं प्रा. गंगाधर गाडगीळ यांचं. गंगाधर गाडगीळ हे सुप्रसिद्ध ज्येष्ठसाहित्यिक. वलयांकित. साहित्य अकादमीचे ते अध्यक्ष होते. मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. मोठं प्रस्थ. ते येणार याचा खूप आनंद झाला. अध्यक्ष म्हणून नाव निश्चित झालं ते मिलिंद गाडगीळ यांचं. मिलिंद गाडगीळ तेव्हा मुंबई तरुण भारतचे संपादक होते. तेहीअर्थशास्त्राचे विद्वान अभ्यासक व वक्ते.

दोघांशीही माझा पत्र, फोनद्वारे संपर्क सुरू झाला आणि अचानक एके दिवशी मला शोध लागला तो म्हणजे हे दोघं सख्खे भाऊ असल्याचा. लाड व्याख्यानमालेच्या इतिहासात ही एक अपूर्व घटना होती. दोघं सख्खे भाऊ आहेत म्हटल्यावर आपलं काम सोपं होईल असं मला वाटलं, पण जसजसा संपर्क वाढला तसं जाणवलं की सोपं होण्याऐवजी काम अवघड होणार . मिलिंद गाडगीळ यांच्या बाजूने नाही, तर गंगाधर गाडगीळ यांच्या बाजूने. अन्सारी साहेब तेव्हा संचालक होते. ते मध्य प्रदेशातील. अशा आयोजनाबद्दल त्यांना काहीच कल्पना नव्हती.  तेमला म्हणाले, “देखो भैया, आप सब संभालो.”

दोन भावांमध्ये वयाचं अंतर बरंच होतं, पण स्वभावातलं अंतर कमालीचं थक्क करणारं होतं.  प्रवास, निवास, भोजन या सर्व दृष्टीने मिलिंद गाडगीळयांच्या काहीच अपेक्षा नव्हत्या; तर गंगाधर गाडगीळ यांची दोन पत्रं अपेक्षांच्या यादीचीच होती. शिवाय फोनवर असंख्य सूचना. हॉटेलची स्वतंत्र एसीरूम, ( दोन भाऊ एकत्र राहणार नव्हते) रूममधल्या अंतर्गत सोयी, बेड, चादर , प्रकाश इथपासून तर चहा, जेवण, जेवणातले पदार्थ यांची आग्रहवजा सूचना. अगदी दही हवंच आणि रूममध्ये विविध फळांची करंडी हवीच हा कटाक्ष. रेल्वेस्टेशनवर स्वागताला कोण येणार, वाहन कुठलं याचीही चौकशी. असे अभ्यागत आकाशवाणीला नवे होते. व्यक्तिशः मलाही गंमत वाटायची. घरीही चर्चा व्हायची. पण मीही जिद्दीला पेटलो. त्यांना हवं ते, हवं तसं मिळेल याची स्वतः सर्व आघाड्यांवरची जबाबदारी स्वीकारून त्यांच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणत गेलो.

व्याख्यानमालेचा दिवस उजाडला. त्यांच्या आवडीच्या फुलांचा गुच्छ घेऊन स्वागताला स्टेशनवर गेलो. त्यांची बॅग हातात घेतली. हॉटेलला आलो. सर्व मनासारखं होतंय हे बघून ते सुखावले. दोन दिवस त्यांचा सहवास लाभला. मिलिंद गाडगीळ दुपारी व्याख्यानाच्या थोडावेळ आधी पोहोचले. दोनभावांची अगदी औपचारिक भेट मी अनुभवली. कसा आहेस वगैरे अगदी जुजबी विचारपूस. भाषणं छान झाली. प्रतिसाद उत्तम होता. परतीच्या प्रवासासाठी स्टेशनवर गाडीत एसी कोचमध्ये बसवून निरोप घेईपर्यंत मी गंगाधर गाडगीळ यांच्या सोबतच होतो आणि त्यांची अजिबात गैरसोय होणार नाही याची काळजी घेत होतो.

व्याख्यानमालेच्या प्रकाशित झालेल्या बातम्यांची कात्रणणं, फोटो आणि आभाराचं पत्र त्यांना लगेच दुसऱ्या दिवशी पाठवलं आणि भाषणांच्या एडिटिंगच्या कामाला लागलो. प्रसारणही राज्यभरात सर्व केंद्रांवरून सुरळीत पार पडलं. घरातलं एखादं मंगलकार्य निर्विघ्न पार पडल्याचा आनंदआणि मोकळा श्वास घेतला. साधारण महिनाभरानंतर ऑफिसमध्ये दिल्लीहून आकाशवाणी महासंचालकांचं माझ्या नावे पत्र आलं. क्षणभर धडकीभरली. व्यक्तिगत पत्र कशाबद्दल? घाबरतच पाकीट उघडलं आणि पत्र वाचून डोळे भरून आले. फारच अनपेक्षित आणि सुखद. गंगाधर गाडगीळ यांनी महासंचालकांकडे पत्र पाठवून माझी प्रशंसा केली होती आणि महासंचालकांनी गाडगीळ यांच्या पत्राची झेरॉक्स प्रत पाठवताना स्वतःही अॅप्रिसिएशन लेटर पाठवलं होतं. लाड स्मृती व्याख्यानमालेत असे “लाड” होण्याचं भाग्य माझ्यासाठी कायम आनंददायी आणि अविस्मरणीय ठरलं.