साधे विचार क्लिष्ट व्यापार: गणित नफ्या तोट्याचे 

537

मला आठवतं मी नुकताच कॉलेज मधून बाहेर पडलेलो, धंद्याची  सुरवात झालेली आणि काही चांगली कामं हातात आलेली, माझ्या मित्रांनी मला काम सुचवायला सुरवात केलेली, लोकांना भेटत गेलो तसं शेयर मार्केट बद्दल कळत गेलं, एक दिवस बिलकेयर नावाच्या कंपनीचा आयपीओ आला, मी माझ्या काही मित्रांच्या सांगण्यावरून तो आयपीओ १० रुपयाने विकत घेतला. कालांतराने कामं येत गेली तशी माझी शेयर्स मध्ये गुंतवणूक करायची हौस मग मागे पडत गेली. मी विसरून पण गेलेलो कि आपण असं कोणत्या शेयर मध्ये पैसे लावले आहेत.

आणि एक दिवस अचानक मग काही वर्षांनी आठवण झाली कि अरे आपण असा एक शेयर घेतलेला, त्या दिवशी त्या शेयरची किंमत मला १७०० रुपये दिसली, माझ्या डोळ्यावर माझा विश्वासच बसेना, एवढी कशी झाली असेल किंमत, पण झाली होती. शेयर जार हे खरंच एक असं रसायन आहे जे तुम्हाला आकृष्ट करायला काहीही घडवू शकत. १७० पटीने हा शेयर काही वर्षात वाढलेला. माझ्या जवळ असलेले शेयर्स मी तात्काळ काढून टाकले. मी खूप खुश झालो, स्वर्ग जणू दोन बोटांवर राहिलेला, वॉरन बफेट नंतर कोणी असेल तर तो मीच अशा अविर्भावात मी थोडा काळ गेलो.

पण मित्रांनो मार्केट खरच इतकं सोपं नसते  की कुणीही सहज पैसे कमवू शकतं? बाजारात प्रवेश तर कुणीही करू शकतं,  त्याला वयाची, शिक्षणाची अट नाही. पण बाजारात यायचे म्हणजे अपार मेहनत घ्यावी लागते. ती मेहनत अभ्यास रूपात थोडीफार असते पण किंबहुना त्याहीपेक्षा अधिक मेहनत स्वतःला बदलण्यासाठी लागते. अनुभवावरून सांगतो, मार्केटला सर्वात वावडं कशाचं असेल तर ते इगोचं. तुमचा अंदाज चुकला हे खुल्या दिलाने आणि त्वरित मान्य करा, मला तोटा होणारच नाही हा अहंकार सोडा, भांडवल बाजारात यशस्वी व्हायचे असेल तर स्वयं शिस्त महत्वाची असते. साधारणपणे मनुष्य स्वभावाच्या विरुद्ध जाऊन अंगी ट्रेडिंगची शिस्त बाणवावी लागते.

आता तुम्हाला माहिती म्हणून सांगतो  कालांतराने हीच बिलकेयर जिने मला माझे पैसे १७० पट करून दिले ती कंपनी दिवाळखोर झाली, बँकेची कर्जफेड देखील या कंपनीला करता नाही आली. हे दाहक वास्तव मी विसरू शकलो नाही , खार सांगायचं तर मी हे पैसे चुकीमुळे कमावले, माझ्या विसरभोळे पणामुळे कमावले, कदाचित मी रोज पाहत राहिलो असतो तर इतके पैसे नसते मिळाले.
आता अजून एक आठवण सांगतो, जेव्हा मी बिलकेयर घेतले  तेव्हाच कोणत्याशा जिंदाल कंपनीचे देखील शेयर्स घेतले. त्या कंपनीचे नाव पण मला आठवत नाही पण जिंदाल स्टील नव्हते ते, ते देखील मी २-३ वर्ष विसरूनच गेलेलो. पण त्याचा भाव पाहायला गेल्यावर काही केल्या अशी कंपनीचं सापडेना. बहुधा ती कंपनी लोप पावलेली. मी आयपीओ मध्ये दिलेले पैसे घेऊन गायब झालेली.
या दोन्ही घटना माझ्या साठी डोळ्यात अंजन घालणाऱ्या होत्या, शेयर मार्केटची भुरळ कोणालाही पडू शकते, गुंतवणूकदाराला, ट्रेडरला किंवा सट्टेबाजाला.  यातून मी दोन गोष्टी शिकलो, शेयर बाजारात पैसे कमवायचे असतील तर चांगले शेयर घेऊन विसरून जाणे हे बरेचदा हिताचे ठरते. काळ हे अनेक प्रश्नाचे उत्तर असते तसेच ते गुंतवणुकीवर मिळणाऱ्या नफ्याचेही असते. त्याच बरोबर शेयर बाजारात प्रवेश केला म्हणजे तोटा निश्चित होतो.
शेयर बाजरात तोटा झाला नाही असा माणूस जगात कोणीही नाही पण यशस्वी गुंतवणूकदार तोच जो नफा कमावतो आणि तोटा पचवतो पण दिवसाच्या शेवटी ज्याची नफ्या तोट्याची गोळा बेरीज शून्यपेक्षा जास्त  राहते.