आकाशवाणीतील आठवणीतले दिवस: भाग ८

समालोचनाच्या जागेचा शोध

43

महिनाभरावर येऊन ठेपलेल्या 2003 च्या नाशिक कुंभमेळा तयारीला आता वेग आला होता. नाशिकची पंचवटी आणि त्र्यंबकेश्वरचं कुशावर्त या दोन्हीठिकाणांहून आकाशवाणीसाठी धावतं समालोचन करता येईल अशा मोक्याच्या जागांचा शोध आम्ही घेत होतो. फार शोध घ्यावा लागला नाही. पंचवटीत रामकुंडावरच्या महापालिकेच्या एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावरचा स्पॉट आम्ही निश्चित केला. तसं पत्र महापालिका आणि जिल्हाप्रशासनाला दिलं. मीडिया सेंटरही तिथेच थाटण्यात येणार होतं. हा स्पॉट असा होता की रामकुंडावर गोदावरीच्या पात्रात साधूंचा शाही स्नानाचासोहळा जवळून बघता येणार होता. कुशावर्तावर त्या तुलनेने मर्यादित जागेमुळे अडचणी होत्या. पोलीस आणि प्रशासनाने त्या अरुंद रस्त्यावरच उंचमचाणं बांधून स्वतःची सोय केली होती.

फिरताफिरता आम्हाला कुशावर्तासमोरील जुने वाडे खुणावू लागले. अगदी कुशावर्तासमोर असलेल्या एका वाड्यात आम्ही प्रवेश केला. ओळखदिली. प्रयोजन सांगितलं. पौरोहित्य करणाऱ्यांचा तो वाडा. एकत्र मोठं कुटुंब. मुलं घरात होती. वडील नव्हते. कुणी तरी त्यांना बोलावून आणलं. आल्यावर त्यांना विनंती केली. कामाचं स्वरूप आणि महत्त्व सांगितलं. ते म्हणाले, “हरकत नाही. वरती माडीवर जाऊन बघा.”  घरातल्या जिन्यानंमाडीवर गेलो. एक आयताकृती खोली. फारशी वापरात नसलेली. शेतीभातीचं सामान, घरपसारा अस्ताव्यस्त पडलेला. पावसामुळे भिंतींना ओलआणि कुबट वासही. खोलीची खिडकी उघडली. वारा आत आला आणि दृष्टी समोर जाताच थक्क झालो. खाली अंगणात बघावं असं कुशावर्त..! गजबजाटापासून दूर आणि सुरक्षित. या खिडकीशी खुर्चीवर बसून शाही पर्वणी न्याहाळता येणार होती. खाली आलो. “जागा पसंत आहे. थोडीस्वच्छता करून ठेवा. तीन शाही पर्वण्यांसाठी एक एक दिवस आधी आम्ही येऊ. जागेचे भाडे देऊ…” असं सांगून निघालो. दोन दिवसांनी ऑफिसचंपत्र आणि नाममात्र भाडं पाठवून दिलं.

पुढे वरिष्ठ अधिकार्‍यांचा दौरा झाला तेव्हा दोन्ही जागा त्यांना दाखवल्या. पसंत पडल्या.  आमचं मनुष्यबळाचं नियोजनही एव्हाना पूर्ण झालं होतं. जुलैत तीन आणि ऑगस्टमध्ये तीन अशा साधारण महिनाभरात सहा पर्वण्या होत्या. त्यासाठी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, सांगली रत्नागिरीसातारा औरंगाबाद जळगाव धुळे, नगर, कोल्हापूर इत्यादी केंद्रांवरून कार्यक्रम अधिकारी, प्रसारण अधिकारी, उद् घोषक, अभियंते, लायब्ररीयन, ड्रायव्हर…. अशा सर्वांच्या ड्युटीच्या टूर ऑर्डर्स मुंबईतील पश्चिम क्षेत्रीय कार्यालयाकडून जारी झाल्या. पाहणी, नियोजन, प्रत्यक्ष समालोचन, नेटवर्किंग इत्यादींसाठी तेव्हाचे मुंबईचे आकाशवाणीचे उपमहासंचालक जयंत एरंडे, उपसंचालक पतंजली मादुस्कर, समन्वयक मेधा कुलकर्णी येऊनगेले.

….आणि पर्वणीच्या तारखा जवळ आल्या. आकाशवाणी नाशिक केंद्र गजबजू लागलं. दौऱ्यावर येणाऱ्या सर्वांचे पासेस प्रशासनाकडून मिळवणं, इतरकेंद्रांकडून आलेलं तांत्रिक साहित्य, नवे मायक्रोफोन्स, केबल, अँप्लीफायर यांचं टेस्टिंग ही कामं सुरू झाली. नाशिक केंद्रातील उद् घोषक ह्रषिकेशअयाचित आणि  सर्व नैमित्तिक उद् घोषकांनी प्रसारणाला मंगलमय स्वरूप आणलं होतं. आता मुंबईहून किशोर सोमण, श्रीराम केळकर, रत्नागिरीहूननिशा काळे, जळगावच्या उषा शर्मा, पुण्याहून संजय भुजबळ, कार्यक्रम अधिकारी विजय रणदिवे, नीळकंठ कोठेकर, प्रसारण अधिकारी सचिन प्रभुणे, शैलेश माळोदे, सुहास विद्वांस,  विनायक मोरे आणि इतर प्रसारण अधिकारी या सर्वांचा उत्साह इतका दांडगा होता की एकूण या पर्वणीमुळे नाशिककेंद्राला लग्नघराचं स्वरूप आलं होतं…आणि आता पर्वणीचा मुहूर्तही जवळ आला होता.

Previous articleआकाशवाणीतले आठवणीतले दिवस- भाग ७
Next articleआकाशवाणीतले आठवणीतले दिवस: भाग ९
सुनील शिनखेडे
कवी, लेखक, माध्यमस्नेही अशा विविध भूमिका सुनील शिनखेडे हे पार पाडत आहेत . ते सध्या आकाशवाणी सोलापूर केंद्रात सहायक संचालकपदी कार्यरत आहेत . त्यांच्या करिअरची सुरुवात नागपुरात १९८० साली पत्रकारितेतून झाली . त्यांनी कविता संग्रह, ललित लेखन, समीक्षा अशी ५ पुस्तकं प्रकाशित केली . यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी "बातमीची विविध क्षेत्रे" या पुस्तकसंचाचं लेखन त्यांनी केले . गेल्या ३० वर्षात आकाशवाणीसाठी विविध क्षेत्रातील  अनेक मान्यवरांच्या  मुलाखती घेतल्या.