आकाशवाणीतले आठवणीतले दिवस: भाग ९

सिंहस्थ : गोदावरीचा जन्मोत्सव

561

२००३ च्या नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ठिकठिकाणांहून आलेल्या आकाशवाणी अधिकारी, अभियंते आणि निवेदकांची मोठी टीम तयार झाली. कार्यालय गजबजलं. कॉलनीत काही क्वार्टर्स रिकामे होते ते व्यवस्थित करून तिथे सर्व डेरेदाखल झाले. साधूंचे जसे वेगवेगळे आखाडे असतात तसेआकाशवाणी टीमचेही तीन आखाडे तयार झाल्याचे आम्ही गंमतीने म्हणू लागलो. आपल्याला नेमकं कुठं काम करायचंय ते या टीम्सना एक दिवसदाखवून आणलं. जबाबदाऱ्या सोपवल्या. या सर्वांच्या कामाची नियोजित ठिकाणं सांगून तिथे पोचण्याच्या वेळा, साहित्य सामग्रीचं किट, मोबाईल, walkie-talkie, वाहन, सिक्युरिटी आणि एन्ट्री पासेस, खाद्यसामग्री असं बरंच काही सोबत देऊन, सूचना देऊन या टीम ठरलेल्या दिवशी ठरलेल्याठिकाणी पोचल्या.

तत्पूर्वी झालेल्या काही मीटिंग्जमध्ये मी आणि मेधा कुळकर्णी या आम्ही समन्वयकांनी संपूर्ण टीमला सिंहस्थ पर्वणी म्हणजे काय, दर बारा वर्षांनीहिचं नेमकं प्रयोजन काय, परंपरा, पूर्वेतिहास, काळानुरूप होत गेलेले बदल, सांस्कृतिक आणि सामाजिक अभिसरण यामुळे आता अशा धार्मिक सोहळेआणि उपक्रम यांकडे बघण्याचा समाजाचा बदलत चाललेला दृष्टिकोन, अशा सोहळ्यांचं वृत्तांकन किंवा कॉमेंट्री करताना माध्यमांची — विशेषतःआकाशवाणीची भूमिका आणि जबाबदारी अशी सविस्तर माहिती दिली. काही अधिकृत छापील वाड्.मय दिलं. आम्ही नाशिक केंद्रावरून केलेलेकाही कार्यक्रम ऐकवले. पोलीस, प्रशासन, मंदिर समिती, पुरोहित संघ यांतील जबाबदार अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या मोबाईल नंबर्सची यादीसर्वांना वितरित केली. ऑफिसच्या मोबाईल आणि लँडलाईन नंबर्सवर ओबी स्पॉटवरून बोलून टेस्टिंग झालं होतंच.  मग डमी ट्रान्समिशनच्या शॉर्टरिहर्सल्स झाल्या. अशी सगळी साग्रसंगीत जय्यत तयारी झाली. एक प्रकारचं चैतन्यदायी मंगलमय वातावरण निर्माण झालं.

संतसाहित्याचे व्यासंगी विद्वान डॉ. यशवंत पाठक यांच्या बोलण्या-लिहिण्यातून सिंहस्थाबद्दल खूप माहिती मिळाली होती. या मीटिंगच्या निमित्तानेटीमला दिलेली ही माहिती तुम्हा वाचकांना मुद्दाम यासाठी देतोय की नेमकी माहिती अनेकांना नसते.

सिंहस्थ ही दर बारा वर्षांनी येणारी पर्वणी. भारतात ज्या काही मोजक्या भागात सिंहस्थ भरतो त्यापैकी श्रीक्षेत्र नाशिक त्र्यंबकेश्वर हे आहे. नाशिकम्हणजे दक्षिण भारताची काशी अशी मान्यता आहे. सिंहस्थाला सनातन परंपरा आहे.  कूर्मावतारात गुरु सिंह राशीत भ्रमण करीत होता. त्यावेळी गौतमऋषींनी अथक प्रयत्न करून ब्रह्मगिरी फोडून माघ शुद्ध दशमीला गोदावरी भूतलावर आणली. हा गोदावरीचा अवतरण दिन. गोदावरीला बघायला सारेदेवगण, यक्ष, गंधर्व, किन्नर, सबंध सृष्टीतले प्राणीमात्र आले. यावेळी स्वर्ग, मृत्यू, पाताळ यातल्या देवदेवतांनी, सर्व तीर्थांनी गोदावरीत स्नान केलंआणि वर्षभर तप, ध्यानधारणा केली. म्हणून या वर्षभराच्या काळाला सिंहस्थ म्हणतात.

या साऱ्या प्राचीन संदर्भांचं सार असं की, गोदावरी ही लोकमाता आहे. ती भूमीला समृद्ध करते. नवरस निर्माण करते. सृष्टीला जीवन देते. तिच्याबद्दलचीकृतज्ञता म्हणजे सिंहस्थ. प्रभू श्रीरामांनी काही काळ गोदावरीकाठच्या पंचवटीत घालवला होता. गोदावरीकाठच्या रम्य परिसरानं श्रीरामांना मोहितकेलं. जानकीने पंचवटी परिसरात कुटी बांधली. ती सीता कुट्टी आजही आहे. श्रीरामांनी आपले तीर्थरूप दशरथ यांचं श्राद्ध गोदाकाठी केलं म्हणूननाशिकचं महत्त्व. गोदेच्या साक्षीने प्रभू श्रीरामांनी ज्ञान आणि पराक्रम आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केलं म्हणून नाशिक जनस्थान ठरलं.

अशा या गोदावरीच्या वाढदिवसाला कोणतीही लेखी सूचना, निमंत्रण न देता गंगोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ, चित्रकूट, उज्जैन अशा देशभरातील अनेकपवित्र तीर्थक्षेत्रांहून साधू, महंत, तपवी, साधक नाशिकला येतात. हा एक अनोखा, समृद्ध करणारा अनुभव आहे. जी नदी मानवाच्या पिढ्यानपिढ्यापोसते तिचा उत्सव करणं, तिच्या प्रवाहाला साक्षी ठेवून ज्ञान, सत्कर्माचं सातत्य राखणं, भक्तीने माणूस जोडणं हा अभिजात सुसंस्कृतपणा आणिजगण्याचं सार आहे. सिंहस्थ हेच शिकवतो.

वाणीची साधना करणार्‍या आकाशवाणीला सिंहस्थ सर्वांपर्यंत पोचवावासा कां वाटला?  तर नाशिकला आकाशवाणी केंद्र स्थापन झालं १९९४साली. त्याआधी ९१ साली सिंहस्थ होऊन गेला होता. २००३ चा सिंहस्थ आकाशवाणी नाशिक केंद्राच्या स्थापनेनंतरचा पहिलाच. हे केंद्र सुरू झालंत्यावेळी उद् घाटन करताना कविश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणाले होते,  “ही आकाशवाणी लोकवाणी व्हावी”.  लोकवाणीने लोकमातेच्या स्तुतीचा सोहळासाजरा करण्याचा हा पहिलाच सिंहस्थ योग माझ्या कुंडलीत होता हे माझं भाग्यच  !!

 

Previous articleBiggest Sports League owners in the world
Next articleA CA’s View on frauds in India with special emphasis on the IL&FS fraud
कवी, लेखक, माध्यमस्नेही अशा विविध भूमिका सुनील शिनखेडे हे पार पाडत आहेत . ते सध्या आकाशवाणी सोलापूर केंद्रात सहायक संचालकपदी कार्यरत आहेत . त्यांच्या करिअरची सुरुवात नागपुरात १९८० साली पत्रकारितेतून झाली . त्यांनी कविता संग्रह, ललित लेखन, समीक्षा अशी ५ पुस्तकं प्रकाशित केली . यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी "बातमीची विविध क्षेत्रे" या पुस्तकसंचाचं लेखन त्यांनी केले . गेल्या ३० वर्षात आकाशवाणीसाठी विविध क्षेत्रातील  अनेक मान्यवरांच्या  मुलाखती घेतल्या.