37.4 C
Pune
Sunday, May 19, 2024

शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करायच्या बाबी

Must read

ऋता कुलकर्णी
ऋता कुलकर्णी
ऋता ही कायदेतज्ज्ञ असून तिने आर्थिक व्यवहारांचे ज्ञान सुलभ होऊन ते सामान्य मराठी माणसांपर्यंत पोहोचावे म्हणून अर्थसाक्षरता नावाचा उपक्रम चालू केला आहे.

शेअर बाजारातून पैसे कमवायचे असतील तर काही खास गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. सहसा जे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतात, त्यांना वाटते की ते अल्पावधीत मजबूत नफा कमावू शकतात. अनेक वेळा असे घडते की काही तासांत स्टॉकमधून मोठा नफा कमावला जातो. पण त्याच उलट कधी कधी मोठे नुकसानही सहन करावे लागू शकते. त्या साठी गुंतवणूकदारांना शेअर बाजारामध्ये शिस्त आणि संयम पाळणे आवश्यक आहे. शेअर्स मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी व्यवस्थित माहिती घेऊनच व्यवहार केले पाहिजेत.

त्या साठी खालील गोष्टींचा आधार तुम्ही घेऊ शकता.

१. गुंतवणूकीचे ध्येय: गुंतवणूक करण्याच्या पहिले तुम्हाला तुमचे ध्येय ठरवणे खूप महत्वाचे असते. तुम्ही कोणत्या उद्देशाने गुंतवणूक करत आहेत त्यावर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे असते. जर का तुम्हाला कमी कालावधी साठी रक्कम गुंतवायची असेल तर त्याला शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग म्हटले जाते. तसेच अधिक कालावधीसाठी केलेल्या गुंतवणुकीस लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक म्हटले जाते.

ट्रेडिंग किंवा अल्प मुदतीसाठी केलेली गुंतवणूक ही बऱ्याचदा अगदी एका दिवसासाठी केली जाते. एका दिवसासाठी एखाद्या शेअरची केलेली खरेदी-विक्री म्हणजे ट्रेडिंग. यामध्ये मोठा नफा मिळण्याची शक्यता असली तरी जोखीमही तितकीच असते.

आणि शेअरमधली गुंतवणूक किंवा लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे किमान सहा महिने ते १ किंवा अधिक वर्षांची आखणी करून काही ठरावीक शेअरमध्ये पैस गुंतवणे. दीर्घ मुदतीतील अशी गुंतवणूक अधिक फायदेशीर ठरते.

 

२. गुंतवणुकीचे विभाजन:

जर का तुमच्या कडे एकूण रु. १०,००० असतील तर एकाच कंपनी मध्ये सगळे पैसे गुंतवण्याऐवजी ४-५ वेगवेगळ्या कंपनी मध्ये गुंतवा. त्या कंपनी सुद्धा एकाच क्षेत्रामधील नसतील तर उत्तम ठरते. त्यामुळे कधी एका कंपनीमुळे तोटा झाला तर दुसऱ्या कंपनीतील नफ्यामुळे झालेला तोटा कमी होऊ शकतो. कारण, देशाचीच बांधकाम क्षेत्राची कामगिरी एखाद्या तिमाहीत खालवली असेल तर या क्षेत्रातले सगळ्याच कंपन्याचे शेअर खाली येणार. पण, आपली गुंतवणूक एकट्या बांधकाम क्षेत्रात न ठेवता वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या कंपन्यांमध्ये विखुरलेली असेल तर आपलं एकदम नुकसान होणार नाही. म्हणून अशी विविधांगी गुंतवणूक मोलाची असते.

 

३. जोखीम सहनशीलता:

जोखीम सहनशीलता ही जोखमीची पातळी आहे जिथपर्यंत गुंतवणूकदार गुंतवणुकीच्या मूल्यातील अस्थिरता सहन करण्यास तयार असतो. जोखीम सहनशीलता हा गुंतवणुकीतील एक महत्त्वाचा घटक आहे आणि अनेकदा या वरूनच एखाद्या व्यक्तीने निवडलेल्या गुंतवणुकीचा प्रकार आणि रक्कम ठरते. अधिक जोखीम सहनशीलता असणारे गुंतवणूकदार सहसा स्टॉक, इक्विटी फंड आणि एक्सचेंज-ट्रेडेड फंड (ईटीएफ) मधील गुंतवणुकीचे समर्थन करतात. तर कमी जोखीम सहनशीलता असणारे गुंतवणूकदार बहुदा रोखे, बाँड फंड आणि उत्पन्न निधी हे पर्याय निवडतात.

सर्व गुंतवणुकीमध्ये काही प्रमाणात जोखीम असतेच ही जोखीम सहनशीलता पातळी जाणून घेतल्याने गुंतवणूकदारांना त्यांच्या संपूर्ण पोर्टफोलिओची योजना बनवण्यास मदत होते. जोखीम पातळी गुंतवणूकदाराने कशी गुंतवणूक करावी हे निर्धारित करते. गुंतवणूकदार किती जोखीम सहन करू शकतात यावर गुंतवणूकदारांचे वर्गीकरण आक्रमक, मध्यम आणि पुराणमतवादी असे केले जाते. तुम्हाला जर का तुमची जोखीम सहनशीलता ठरवता येत नसेल तर अश्या प्रकारच्या मूल्यांकन तपासणी चाचण्या ऑनलाइन उपलब्ध आहेत. त्यामध्ये जोखीम-संबंधित सर्वेक्षणे किंवा  प्रश्नावलीचा समावेश असतो. त्यावरुन तुम्ही तुमची जोखीम सहनशीलता तपासू शकता.

याचे एक उदाहरण म्हणजे जर का कोणी विद्यार्थी किंवा निवृत्त झालेला गुंतवणूकदार असेल तर त्याचे आर्थिक उत्पन्नाचे साधन सहसा इतके मजबूत नसते. त्यामुळे आपोआपच त्यांची जोखीम सहन करण्याची पातळी खालावलेली असते. म्हणून त्यांनी लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट करणे शहाणपणाचे ठरते. त्या उलट नोकरदार वर्गाकडे उत्पन्नाचा वाहता स्रोत असल्याने त्यांची जोखीम सहनशीलता पातळी अधिक असते. म्हणून ते अधिक जोखमीचे पर्याय देखील निवडू शकतात. इंट्रा डे ट्रेडिंग सारखे पर्याय त्यांना उपलब्ध राहतात.

 

४. गुंतवणुकीचा कालावधी:

शेअर बाजारात जर खरेदीचं वातावरण असेल निर्देशांक वर चढतो. आणि विक्रीच्या वातावरणात तो खाली येतो. अशी आवर्तनं शेअर बाजारात अव्याहत सुरू असतात. अशावेळी शेअरचा भाव खाली आलेली वेळ साधून खरेदी करणं आणि भाव वर कधी जाईल याचा अंदाज बांधून उंचीवर असताना विक्री करणं ते हि योग्य वेळ साधून हे खूप अवघड ठरत. शिवाय किती काळ एखादा शेअर आपल्याकडे ठेवायचा याचं उत्तरही असंच कठीण आहे. कारण कोणत्याही शेअरचा वरचा आणि तळाचा अचूक अंदाज लावता येत नाही. या क्षेत्रातले तज्ज्ञही याचं निश्चित उत्तर देऊ शकणार नाहीत. गुंतवणूक करताना आपण केलेला अभ्यास, त्यातून स्वत:ची अशी तयार झालेली रणनीती आणि तात्कालिक पैशाची गरज यावर शेअर बाजाराची स्थिती गुंतवणुकीचा कालावधी ठरवता आला पाहिजे.

 

५. फायद्याची अपेक्षा

जशी शेअर बाजारातली मुदत आणि कंपन्यांची निवड ही ज्याची त्याला करावी लागते. तसंच फायद्याचं आहे. कधी कधी शेअर बाजारात  खूप फायदा झालेली उदाहरण असतात पण कर्जबाजारी झालेली उदाहरणे देखील कमी नाहीत. शेअर बाजाराकडे आपल्या इतर गुंतवणुकीला पूरक गुंतवणूक म्हणून पाहिलं गेलं पाहिजे. आपली पूर्ण कमाई माहिती नसताना किंवा असताना देखील गुंतवल्यास खूप मोठी जोखीम निर्माण होऊ शकते.

सरकारी बचत योजनांमध्ये सगळ्यांत जास्त व्याजदरापेक्षा देखील जास्त परतावा सुनियोजित शेअर गुंतवणुकीवर मिळू शकतो. पण, यात शेअरची किंमत उलटी कमी होऊन नुकसान होण्याचा धोकाही असतो.

शेअर बाजारातला नफा हा अर्थातच तुम्ही किती जोखीम घेऊ शकता आणि तुमची शेअरची निवड किती चोख होती यावरच अवलंबून असतात. पण, महागाई दरापेक्षा जास्त परतावा इथं मिळू शकतो.

 

त्यामुळे गुंवणूक करण्यापूर्वी या सर्व गोष्टी विचारात घेऊनच गुंतवणूक करा आणि संभाव्य नुकसानापासून स्वतःचे संरक्षण करा.

More articles

- Advertisement -spot_img

वाचनीय असे काही

error: Content is protected !!
×