30.1 C
Pune
Monday, April 22, 2024

कंपनीतील प्रवर्तक, त्यांची भूमिका आणि महत्त्व

Must read

ऋता कुलकर्णी
ऋता कुलकर्णी
ऋता ही कायदेतज्ज्ञ असून तिने आर्थिक व्यवहारांचे ज्ञान सुलभ होऊन ते सामान्य मराठी माणसांपर्यंत पोहोचावे म्हणून अर्थसाक्षरता नावाचा उपक्रम चालू केला आहे.

कोणत्याही कंपनीचे शेअर्स घेण्यापूर्वी त्या कंपनीचे प्रवर्तक कोण आहेत हे बघणे खूप गरजेचे असते. कारण प्रवर्तक हा कंपनीचा खूप महत्वाचा घटक आहे. कंपनीच्या कार्यकारणीमध्ये प्रवर्तकाचा खूप मोठा वाटा असतो.

प्रवर्तक ही कायदेशीर पदापेक्षा अधिक कार्यात्मक भूमिका असते. प्रवर्तक अशी व्यक्ती असते जी कंपनी स्थापन करण्यात सक्रिय असते. प्रवर्तक ही एखादी व्यक्ती किंवा संस्था देखील असू शकते. तसेच, त्यांचे कंपनीमध्ये भांडवल असायलाच पाहिजे असे देखील गरजेचे नसते. प्रवर्तक हे कंपनीचे विश्वासक असतात आणि त्याच विश्वासाला पात्र ठरून त्यांनी कार्यभाग सांभाळण्याची अपेक्षा असते.

कंपनीच्या स्थापनेसाठी लागणारी पूर्ण प्रक्रिया करण्याची जबाबदारी प्रवर्तकाची असते. आणि त्यामुळेच शेअर होल्डिंग नसेल तरी प्रवर्तक कंपनीसाठिचे महत्वाचे निर्णय घेण्यात मोठी भूमिका बजावतात. फंडामेंटल विश्लेषणामध्ये प्रवर्तकाच्या पार्श्वभूमिला अनन्यसाधारण महत्व आहे.

प्रवर्तक आणि त्यांची पार्श्वभूमि

मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताना किंवा मोठ्या रकमेचे कर्ज देत असताना प्रवर्तकाची पार्श्वभूमि तपासणे हे बॅंकेच्या अथवा गुंतवणूकदाराच्या भविष्यातील निर्णयांसाठी मोलाचे ठरते. राजकीय पार्श्वभूमि असलेल्या प्रवर्तकास कर्ज देणे ही खूप मोठी जोखिम मानली जाते. त्याच्या भ्रष्टाचाराच्या पैशामुळे बॅंकेचे नाव खराब होउन बाजारातून ठेवी स्वीकारण्याची त्यांची क्षमता कमी होउ शकते. भारतात रिस्कप्रो सारख्या नामांकित कंपन्या हे केवळ कंपन्यांच्या प्रवर्तकाची पार्श्वभूमि तपासण्याचे काम करतात.

गुंतवणूकदारांनी देखील पार्श्वभूमि तपासणे महत्वाचे असते एखादी कंपनी ही केवळ राजकीय वरदहस्त आहे म्हणून वाढत असेल तर सत्ताबदल झाल्यावर त्या कंपनीची वाढ त्या पद्धतिने होइलच याची खात्री नसते. अशा वेळेस गुंतवणूकदार आपले पैसे अशा कंपन्यांच्या समभागात गुंतवून गमावू देखील शकतात.

बऱ्याच वेळा प्रवर्तकाकडे मोठ्या प्रमाणावर शेअर्स असल्यामुळे कंपनीमधील निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्याकडेच असते. त्यासाठी प्रवर्तकाचा कंपनी चालू करण्यामागचा हेतू काय आहे हे बघणे महत्वाचे ठरते. कोणत्या प्रवर्तकांची प्रतिष्ठा खालावलेली असेल किंवा आधी कोणता घोटाळा त्यांनी केला असेल तर त्यांच्या बाकीच्या कंपनीमध्ये देखील घोटाळे होण्याची शक्यता वाढते. नव्वदीच्या दशकात सामान्य गुंतवणूकदारांकडून आयपीओच्या नावाखाली पैसे उभारून समभाग न नोंदवताच पळून गेलेल्या मंडळींची काही कमी नाही. हीच मंडळी नंतर दुसरी कंपनी काढून पुन्हा भांडवल बाजारात येण्याची शक्यता असते.

प्रवर्तक होल्डिंग

कंपनीमध्ये अनेक प्रकारचे गुंतवणूकदार असतात. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये प्रवर्तक, देशांतर्गत गुंतवणूकदार आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार असू शकतात. पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये वर नमूद केलेल्या गुंतवणूकदारांव्यतिरिक्त किरकोळ गुंतवणूकदार असू शकतात. प्रवर्तकाकडे असलेले शेअर्स प्रमोटर्स स्टेक किंवा प्रमोटर्स होल्डिंग म्हणून ओळखले जातात.

उदाहरणार्थ, कोणत्याही सरकारी कंपनीच्या शेअरहोल्डिंग मध्ये राज्य किंवा केंद्र सरकारचा मोठा वाटा असतो. सरकारी कंपनी मध्ये राज्य किंवा केंद्र सरकारच प्रवर्तकाची भूमिका पार पडतात.

ज्या कंपनी मध्ये प्रवर्तक जास्त भांडवल धारण करत आहे ती कंपनी चांगली समजली जाते. कारण प्रवर्तकांनी गुंतवलेले पैसे त्यांचा त्या कंपनीवरील चांगले काम करण्याबद्दल असलेला विश्वास दर्शवतो. दुसरीकडे, कमी प्रवर्तकांचं भागभांडवल कमी असलेल्या कंपनीकडे गुंतवणूकदार सामान्यतः नकारात्मक दृष्टीकोनाने बघतात.

समजा की एबीसी लिमिटेडचा प्रवर्तक भाग २७% आहे जो त्याच्या डोमेनमधील इतर कंपन्यांपेक्षा कमी आहे. तथापि, मागील तिमाहीत प्रवर्तकाचा हिस्सा १०% आणि त्यापूर्वीच्या तिमाहीत ५% होता. पण आता हिस्सा वाढल्याने कंपनीवरील प्रवर्तकांचा विश्वास वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे इतर गुंतवणूकदारांचादेखील  दृष्टीकोन बदलतो. प्रवर्तक होल्डिंगची इतर कंपनीपेक्षा  कमी टक्केवारी असूनही, हा वाढता कल कंपनीसाठी एक सकारात्मक दृष्टीकोन म्हणून काम करतो.

दुसरीकडे, असे म्हणूया की कंपनीचा सध्याचा प्रवर्तक भाग ५०% आहे. हे या कंपनीच्या उद्योगक्षेत्रामधील इतर सरासरीपेक्षा जास्त आहे. तथापि, गेल्या तिमाहीत तोच हिस्सा ६०% आणि त्याआधीच्या तिमाहीत ८०% होता. म्हणजेच प्रवर्तक त्यांचा हिस्सा कमी करत आहेत. तर हि काळजीची बाब ठरू शकते.

त्यामुळे, केवळ प्रवर्तक भागभांडवल टक्केवारी कंपनीच्या अपेक्षित कामगिरीचे स्पष्ट चित्र देऊ शकत नाही. होल्डिंग्समध्ये वाढ किंवा घट होण्याच्या सरासरीवर  लक्ष ठेवल्यास खरे चित्र गुंतवणूकदारांना समजू शकते.

पण फक्त एवढे बघूनच गुंतवणुकीचा निर्णय घेऊ नये. कारण काहीवेळा, प्रवर्तक त्यांचे शेअर्स इतर खर्चासाठी देखील विकू शकतात. म्हणूनच, जर तुम्हाला कमी होत असलेला ट्रेंड आढळला तर त्यामागील कारण शोधण्याचा प्रयत्न करा. प्रवर्तक होल्डिंगमध्ये कोणतीही अस्पष्ट घट ही नकारात्मक घटच आहे असे नसते.

गुंतवणुकदारांनी आणखी एक बाब लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे जर एखाद्या कंपनीमध्ये प्रवर्तकांचा हिस्सा कमी असेल परंतु देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीची टक्केवारी जास्त असेल तर ती गुंतवणूकीसाठी चांगली कंपनी असू शकते.

गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी कंपनीची आर्थिक, व्यवस्थापन, स्पर्धात्मक स्थिती आणि इतर विश्लेषणे यांचा देखील विचार केला पाहिजे. प्रवर्तक हे कंपनीचे महत्त्वाचे घटक आहेत, परंतु कंपनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम करणारे इतरही घटक आहेत. त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी या सर्वच घटकांचा सर्वसमावेशक दृष्टिकोन घ्या आणि त्याचा सखोल अभ्यास करूनच अंतिम निर्णय घ्या.

More articles

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!