महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभाग, फिल्मसिटी आणि एशियन फाऊंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित २१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची सुरुवात झाली आहे. महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र फिल्म स्टेज अँड कल्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MFSCDCL) च्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, महामंडळाच्या वित्तीय सल्लागार चित्रलेखा खातू – रावराणे, मुख्य प्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महोत्सवाच्या उद्घाटनाच्या वेळी, चित्रपट क्षेत्रातील अविस्मरणीय योगदानाबद्दल ‘एशियन कल्चर’ पुरस्काराने सुप्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांचा सन्मान करण्यात आला. त्यांना महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
जावेद अख्तर यांनी या पुरस्काराबद्दल आभार व्यक्त करतांना चित्रपट क्षेत्रातील लेखकांना योग्य मान मिळण्याची आवश्यकता आणि त्यांच्या योगदानाला अधिक महत्त्व दिले पाहिजे, असा विचार मांडला. त्यांचे मत होते की, भारतात असलेल्या विविध प्रादेशिक कलाकृतींना योग्य वाव देणे महत्त्वाचे आहे. तसेच, त्यांनी चित्रपटांमधील गीत-संगीताच्या परंपरेवरही भाष्य केले. त्यांच्या मते, दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये गीत-संगीताचा उत्कृष्ट वापर होतो आणि त्याच प्रकारे हिंदी चित्रपटांतही या परंपरेचा समावेश करणे आवश्यक आहे.
जावेद अख्तर यांनी आपले विचार पुढे मांडले की, “आपल्याकडे अद्वितीय कलागुण असलेले कलाकार आहेत, आणि कलाकारांना योग्य मंच मिळावा लागतो. आपली चित्रपट परंपरा गीत-संगीताची आहे, आणि त्यामुळे आपले चित्रपट अधिक नावाजले जातील.”
जावेद अख्तर हे हिंदी चित्रपट क्षेत्रातील प्रमुख लेखक आणि गीतकार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या गाण्यांनी, गझलांनी आणि चित्रपट पटकथांनी भारतीय चित्रपटसृष्टीत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘शोले’, ‘जंजीर’, ‘दिवार’ यांसारख्या अत्यंत लोकप्रिय चित्रपटांचे लेखन करणाऱ्या जावेद अख्तर यांचे योगदान चित्रपट क्षेत्रासाठी अमूल्य आहे.
स्वाती म्हसे-पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “फिल्मसिटीमध्ये अनेक उत्तम उपक्रम राबवले जातात आणि त्याचा लाभ कलाकारांनी घ्यावा. तसेच, ‘फिल्मसिटी’ ला जागतिक ‘प्रोडक्शन हब’ बनवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”
महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम यांनी यावेळी या महोत्सवाची २१ वर्षांची गौरवमयी परंपरा मांडली. त्यांचे मत होते की, या महोत्सवाने २५ वर्षे पूर्ण केली असता तो अधिक यशस्वी होईल आणि चित्रपट रसिकांना उत्तम चित्रपट पाहण्याची संधी देत राहील.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी महोत्सवाला शुभेच्छा दिल्या आणि यंदाच्या महोत्सवात प्रदर्शित होणाऱ्या उत्कृष्ट चित्रपटांचा आनंद घेण्याचे प्रेक्षकांना आवाहन केले. फेस्टिव्हल डिरेक्टर संतोष पाठारे यांनी महोत्सवाच्या उद्घाटनासोबतच ‘ब्लॅक डॉग’ चित्रपटाने महोत्सवाची भव्य सुरुवात केली असल्याचे सांगितले. सात दिवस चालणाऱ्या या महोत्सवात आशियाई देशांतील उत्कृष्ट चित्रपटांचा आस्वाद रसिकांना मिळणार आहे.
संदीप मांजरेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त करत महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी धन्यवाद दिले.