1981 ते 1991 या दशकात मी नागपुरात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेत पत्रकारितेत स्थिरावलो होतो. तरुण भारतात मुद्रित शोधक, उपसंपादक ते साहित्य संपादक असा प्रवास घडला. त्या दरम्यान आम्ही काही मित्रांनी आकाशवाणीतील कार्यक्रम अधिकारी पदासाठी यूपीएससीचा अर्ज भरला होता. 90 साली त्यासाठी दिल्लीहून मुलाखतीचं बोलावणं आलं. त्यानंतर वर्षभर शांतता.
91 मध्ये निवड झाल्याचं कळलं. पहिलं पोस्टिंग औरंगाबाद. सर्व सोपस्कार पार पाडून 21 ऑक्टोबर 1991 या दिवशी मी आकाशवाणी औरंगाबाद केंद्रात रुजू झालो. जीवनात नवं पर्व सुरू झालं. मुद्रित माध्यमातून श्राव्य माध्यमात असं हे माध्यमांतरही होतं. या नव्या माध्यमात काम करण्याचा मला तेव्हा अनुभव नव्हता. या माध्यमाची ओळख मात्र होती. नागपूर आकाशवाणीत कवितावाचन, श्रुतिका लेखन आणि विधिमंडळ कामकाजाचं समालोचन असा थोडा पूर्वानुभव गाठीशी होता. परंतु आकाशवाणी माध्यमात अधिकारी पदावर काम करणं ही आता मोठी जबाबदारी होती.
औरंगाबादला त्यावेळी के एस इसरानी हे संगीतातले तज्ञ गृहस्थ स्टेशन डायरेक्टर होते. केशर मेश्राम या असिस्टंट डायरेक्टर होत्या. एस. एन. आगाशे हे स्टेशन इंजिनियर होते. शंभरावर लोकांचा स्टाफ होता. माझ्यासाठी ते सारं विश्वच नवीन. सुरुवातीला महिनाभर ड्युटी रूममध्ये बसून तिथली कार्यप्रणाली समजून घेत निरीक्षण आणि अभ्यास हे करायला सांगण्यात आलं. नवं शिकण्याची धडपड सुरू झाली.टापटीप, चकचकीत आणि शांत स्टुडिओ, त्यातली ध्वनिमुद्रण व्यवस्था याचं आकर्षण होतंच. आता त्यातलं तंत्र शिकत व्यवस्थेचा भाग बनलो होतो.
काही महिन्यातच एका आउटडोअर रेकॉर्डिंगची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. औरंगाबादच्या हर्सूल जेलमध्ये रेकॉर्डिंग होतं. तिथल्या कैद्यांच्या मुलाखती. त्यांचा रोजचा दिवस कसा असतो ते सांगणाऱ्या. जेलमध्ये कैद्यांकडून सतरंज्या तयार करणे, बुक बाइंडिंग, माळीकाम, शिवणकाम करून घेतलं जायचं. त्यांचा तो दिनक्रम, तिथली शिस्त, प्रार्थना, संध्याकाळी विरंगुळा म्हणून म्हटली जाणारी भजनं, सिनेसंगीत… असं सगळं कैद्यांना बोलतं करून रेकॉर्ड करायचं होतं. तिथे तयार झालेला माल विक्रीसाठी उपलब्ध असायचा. आकाशवाणीसाठीही तिथून काही खरेदी व्हायची. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जेलरशी बोलून ठेवलं होतं. काय विचारायचं याची पुरेशी तयारी मी केली. अभियांत्रिकी सहायकानं ध्वनिमुद्रण सामग्रीची बॅग घेतली. ऑफिसच्या गाडीतून आम्ही निघालो. जेलमध्ये त्यापूर्वी कधीही जाण्याचं कारणच नव्हतं. आतून जेल प्रथमच पाहत होतो. संबंधितांशी गाठभेट घेऊन आम्ही ध्वनिमुद्रणाची तयारी केली.
मेल्ट्रॉनच्या कॉम्पॅक्ट मशीनवर त्याकाळी आऊटडोअर रेकॉर्डिंग केलं जायचं. मॅग्नेटिक टेपवर हे रेकॉर्डिंग होत असे. टेप मशीनवर लावून अभियांत्रिकी सहायकानं मला विचारलं, “रिकामं स्पुल आणलंय ना तुम्ही? द्या.” मला काहीच बोध होईना. ते माझं काम आहे हेही मला माहीत नव्हतं. त्यामुळे आणण्याचा प्रश्नच नव्हता. झालं. आमचं काम थांबलं. रिकामं स्पुल आणण्यासाठी आकाशवाणीत दहा किलोमीटरवर गाडी पुन्हा पाठवण्यात आली. ते स्पूल आल्यानंतर रेकॉर्डिंग केलं. जेलमधून बाहेर पडलो तेव्हा संध्याकाळ झाली होती.
मी आउटडोर रेकॉर्डिंगला रिकामं स्पुल घेऊन जायला विसरलो याची चर्चा दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये दिवसभर सुरू होती. परंतु वस्तुस्थिती कळली ती धक्कादायक होती. रिकामं स्पुल घेणे ही माझ्या त्या सहकाऱ्याची जबाबदारी होती. मी नवीन. आउटडोर रेकॉर्डिंगचा पहिलाच अनुभव. त्यात मी यूपीएससी सिलेक्टेड डायरेक्ट कार्यक्रम अधिकारी. “कसं करतात हे रेकॉर्डिंग बघूया” या भावनेतून त्या सहकाऱ्याने दिलेला तो झटका होता. तो विपरीत अनुभव कायमच माझ्या लक्षात राहिला.
चांगलं घडणारंही अवतीभवती खूप होतं. साहित्य, संगीत, कला, संस्कृती, पत्रकारिता या क्षेत्रात माझ्या हळूहळू ओळखी होत होत्या. ज्येष्ठ नेते गोविंदभाई श्रॉफ, पत्रपंडित अनंतराव भालेराव, न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, डॉ. गंगाधर पानतावणे, डॉ. सुधीर रसाळ, गायक नाथराव नेरळकर, व-हाडकार लक्ष्मण देशपांडे, लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. प्रभाकर मांडे, एमसीईडीचे सोमण, निर्लेपचे राम भोगले, शायर बशीर, रुस्तुम अचलखांब, सुधीर गव्हाणे, गीतकार अशोकजी परांजपे, लेखिका अनुराधा कुलकर्णी आणि इतर अनेक. औरंगाबाद हे हिंदु- मुस्लिम -दलित बहुल आणि घटना घडामोडींचं आक्रमक केंद्र होतं. सतत काही तरी घडायचं. 92 साली बाबरी मशिद पाडल्यानंतर तिथे झालेल्या दंगलीत प्रसारण करणे हा अनुभव अदभुत होता. दंगल जबरदस्त होती. महिनाभर संचारबंदी होती. पोलिसांच्या उघड्या जीपमधून संचारबंदीग्रस्त मुस्लिम परिसरात फिरून रेकॉर्डिंग करणं ही नंतर वाटलेली जोखीम तेव्हाच्या उत्साहात कर्तव्याचा भाग म्हणून सहज केली गेली. ऑफिसमध्ये बारा ते पंधरा तास काम करावं लागायचं , पण कामात वेळ कसा कुठे निघून जायचा ते कळत नसे.
औरंगाबाद वास्तव्यातच कायम मनावर कोरून राहिलेली अविस्मरणीय दुर्दैवी घटना म्हणजे किल्लारीचा महाभयंकर भूकंप. 93 सालच्या या घटनेने, त्या आठवणींनी आजही मन अस्वस्थ होतं. जबाबदार माध्यम म्हणून आकाशवाणी औरंगाबाद केंद्राने त्या काळात केलेलं सकारात्मक काम आणि त्या कामाचा भाग बनल्यानंतर माझ्या पक्कं लक्षात आलं की आकाशवाणी हे केवळ मनोरंजनाचं माध्यम नाही. आकाशवाणीचं ब्रीदच “बहुजन हिताय बहुजन सुखाय” असं आहे. या माध्यमाची नाळ समाजातल्या सर्व स्तरातल्या घटना-घडामोडी आणि सुखदुःखांशी जोडलेली आहे. ही जाणीव माझ्या मनात ठळक करणाऱ्या किल्लारी भूकंपाविषयी अधिक बोलुया पुढल्या लेखांकात.