३० सप्टेंबर १९९३ पहाट मी कधीच विसरू शकणार नाही. या पहाटे लातूर जिल्ह्यात महाभयंकर भूकंपाने क्षणार्धात हजारो निष्पाप जीवांचे बळी घेतले. किल्लारी हे भूकंपाचं केंद्र होतं. उस्मानाबाद जिल्ह्यातील सास्तूर, उमरगा आणि नजीकचा परिसरही हादरला होता. आदला दिवस अनंत चतुर्दशीचा होता. रात्री उशिरापर्यंत गणपती विसर्जनाच्या मिरवणुकांमुळे गावं जागी होती. विघ्नहर्त्याला निरोप देऊन लोक झोपी गेले ते उठलेच नाहीत. पहाट उगवली ती या महाविघ्नाची बातमी घेऊन.
दहा हजारांहून अधिक बळी घेणाऱ्या महाप्रलयंकारी अशा या भूकंपाची बातमी संपूर्ण जगाला सर्वप्रथम दिली ती आकाशवाणीने. दिल्लीच्या सकाळी सहाच्या राष्ट्रीय बातमीपत्रात ही बातमी प्रसारित झाली. भूकंप पहाटे तीन नंतर झाल्याने दैनिकांना ती कव्हर करता आली नव्हती. अनेक दैनिकांना अनंत चतुर्दशीची सुट्टी असल्यानं ३० सप्टेंबरला त्यांचे अंक निघणार नव्हते. जगभर आकाशवाणीच्या माध्यमातून ही बातमी पोचू शकली ती आकाशवाणी औरंगाबाद केंद्राचे तेव्हाचे वृत्तविभाग प्रमुख पुरुषोत्तम कोरडे यांच्या सतर्कतेमुळे. फोनवर प्राप्त झालेल्या बातमीची सत्यता पडताळून त्यांनी ती फ्लॅश केली. त्यांनी त्यावेळी दाखवलेलं प्रसंगावधान आणि तत्परतेनं घेतलेला निर्णय अचूक आणि मोलाचा ठरला.
मी त्यावेळी आकाशवाणी औरंगाबाद केंद्रात कार्यक्रम अधिकारी होतो. आम्ही सिडकोत राहत होतो. औरंगाबाद शहरालाही सौम्य धक्का बसला होता. आमच्या घरातही किचन रॅकवरची भांडी पडली. वस्तू पडल्या. पलंग हलले. भूमंडळ हलल्याची सौम्य जाणीव झाली. या धक्क्यानेच आम्हाला जाग आली होती. काहीतरी अघटित घडल्याची जाणीव होत होती होतीच. तेवढ्यात सहाच्या बातम्यांतून भूकंपाच्या भीषणतेची कल्पना आली. मी तयार होऊन नऊला ऑफिसला पोहोचलो तेव्हा ऑफिस गजबजलं होतं. इमर्जन्सी ओळखून सर्वांनीच ऑफिसकडे धाव घेतली होती. गंगाधर चाफळकर हे तेव्हा केंद्र संचालक होते. त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन दोन टीम तयार केल्या होत्या आणि ऑफिसच्या गाड्यांमधून दोन्ही टीम लातूर- किल्लारीकडे निघण्याच्या बेतात होत्या. आपल्याला जायला मिळायला हवं होतं असं मला वाटलं, पण दोन्ही टीममध्ये अनुभवी सिनियर्स होते.
त्यानंतरच्या आठवड्यात मात्र माझा नंबर लागला. तोवर पहिल्या टीमने तयार केलेल्या कार्यक्रमांवरून भूकंपग्रस्त भागातल्या हृदयद्रावक परिस्थितीची कल्पना आली होतीच. आम्ही प्रत्यक्ष किल्लारी परिसरात पोचलो आणि बघतो तर काय… गावचं गाव जमिनीखाली गाडलं गेलं होतं. सर्वत्र घरांच्या पडझडीमुळे ढिगारे आणि त्याखाली दबलेले मृतदेह. आठ-दहा दिवस झाले तरी मृतदेह ढिगार्यांखालून काढण्याचं काम सुरू होतं. पाऊस पडल्याने सर्वत्र चिखल, दुर्गंधी. गावालगतच मोठ्या प्रमाणात म्रुतदेहांवर अंत्यसंस्कार सुरू असल्यानं शेकडो चिता पेटलेल्या. महाराष्ट्रासह देशातून आणि जगभरातूनही मदतीचा ओघ सुरू झाला होता. स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते जीव ओतून मदतकार्य करीत होते. शासन यंत्रणा आपल्या पद्धतीनं परिस्थिती हाताळत होती.
तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार ठाण मांडून मदतकार्याची पाहणी करत होते आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक दिशानिर्देश देत होते. परिसरात सर्वत्र हताश विषण्णता आणि सुन्न शांतता होती. जमेल तसं, जमेल तेवढं रेकॉर्डिंग आम्ही करत होतो. तेवढ्यात किल्लारीचे नगराध्यक्ष डॉ. पडसलगी हे भेटले. त्यांना बोलवतही नव्हतं. मूक आक्रंदन. आपलं गाव डोळ्यांदेखत जमीनदोस्त झालं, मृत्यूचं तांडव होत्याचं नव्हतं करून गेलं आणि आपण काही करू शकलो नाही याची बोच त्यांच्या मनात होती. आपण जगलो याबद्दलच्या अपराधीपणाचा भावही. महत्प्रयासानं ते थोडं बोलले. उमरगा, सास्तूर, हराळी या भागातही प्रचंड नुकसान झालं होतं.
आम्ही त्या उद्ध्वस्त गावात फिरत होतो. घरं, दुकानं, गाईगुरं, गोठे, पार, पंचायत, विहिरी, हवेल्या…. कशाच्याच खुणा उरल्या नव्हत्या. घरांचा मलबा काढताना बाया-माणसं आणि मुलांचे मृतदेह हाती लागायचे. चालताना माझ्या पायाजवळ एके ठिकाणी ढिगाऱ्याखाली हिरवा चुडा भरलेला हात तेवढा बाहेर आलेला बघून मी थरारलोच. मन विकल करणारा हा अनुभव. काम आटपून आम्ही औरंगाबादला परतलो. त्यानंतर पुन्हा पुन्हा भूकंपग्रस्त भागात जात राहिलो. राज्यस्तरावर आणि देशपातळीवरही आकाशवाणीवरून वर्षभराच्या कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलं होतं.
त्या वर्षभरात आम्ही क्षणभंगुर जीवनाचा आणि जीवनसातत्याचाही अनुभव घेतला. आमच्या कॉलनीतील एका कुटुंबानं भूकंपातून वाचलेल्या काही महिन्यांच्या चिमुरडीला दत्तक घेतलं. ती वाचली हे नवलच होतं म्हणून तिचं नाव ठेवलं किमया. पुढे भूकंपग्रस्त परिसरात हजारो अनाथ मुलांसाठी निवासी शाळा निघाल्या. नळदुर्गचं आपलं घर, हराळीची ज्ञानप्रबोधिनी, यमगरवाडी प्रकल्प असे आशेचे दिवे तेवू लागले. गावांच्या पुनर्वसनाला सुरुवात झाली. आनंदवनचे डॉ. विकास आमटे यांच्या संकल्पनेतून भूकंपरोधक घरांची निर्मिती होऊ लागली. वीज, पाणी, आरोग्यसेवा यासाठी शासन झटू लागलं. शेती, पशुधन याकडे जगल्या वाचलेल्या लोकांनी लक्ष पुरवलं. आज या घटनेला सत्तावीस वर्ष झाली. नवं जग उभं राहिलं..पण सर्वस्व हरवलेल्यांची अवस्था आजही वाईट आहे.
माझं मन त्या काळात अस्वस्थ असायचं. मनाची खळबळ कवितेतच व्यक्त व्हायची आणि मन काहीसं शांत व्हायचं. तेव्हाची एक कविता आठवते….
कोपली धरणी
आक्रंदले मन
ओसाड जीवन
बापड्यांचे
ओळखीचे आता
नसे नावगाव
चिमुकले जीव
घरट्याविना
मानव्याची ऐसी
काळ करी कट्टा
कपाळीचा पट्टा
अटळ हो
कुठे भजनाचा
नाद गोठलेला
कुठे रंगलेला
विडा ओठी
कुठे स्तनांवर
सुकलेला पान्हा
कुशीतच तान्हा
गप्पगार..!!
पूर, महामारी, भूकंप या नैसर्गिक आपत्ती माणसापुढे आव्हानांचे डोंगर उभे करतात याची प्रचिती अशा संकटसमयी येते. अशावेळी माध्यमांची जबाबदारीही वाढते ते या काळात शिकता आलं. एक मात्र खरं. संकटं झेलता येतात. फक्त माणसातला माणुसकीचा झरा तेवढा आटायला नको.