अभिनेत्री प्राजक्ता माळीची नवी भूमिका
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने अभिनय, नृत्य आणि निर्मिती अशा विविध भूमिका पार पाडत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नेहमी काहीतरी नवीन करण्याच्या प्रयत्नात असलेली प्राजक्ता आता ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या आगामी चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात ती रावी नावाच्या एका चुलबुली, उत्साही पण गोंधळलेल्या मुलीची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेचा विनोदाचा एक वेगळा बाज असून, ती प्राजक्तासाठी एक आव्हानात्मक अनुभव असणार आहे.
चित्रपटाची कथा आणि प्रदर्शान
चिकी चिकी बुबूम बुम’ हा चित्रपट काही मित्रांच्या रियुनियनच्या सेलिब्रेशनभोवती फिरतो. मात्र, या रियुनियन दरम्यान काही विचित्र घटनांमुळे ही मित्रमंडळी कचाट्यात सापडतात आणि त्यातून उडणाऱ्या धमाल प्रसंगांची गंमत चित्रपटात पाहायला मिळणार आहे. विनोदाने परिपूर्ण आणि मनोरंजनाची मेजवानी ठरणारा हा चित्रपट २८ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
प्राजक्ता शिवाय इतर कलाकार आणि निर्मितीसंघ
या चित्रपटाविषयी बोलताना प्राजक्ता माळी म्हणली, ‘कसलेल्या विनोदी कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळणे माझ्यासाठी खूप खास अनुभव होता. आतापर्यंतच्या माझ्या भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे, त्यामुळे ‘चिकी चिकी बुबूम बुम’ मधील माझ्या भूमिकेलाही नक्कीच सकारात्मक प्रतिसाद मिळेल याची मला खात्री आहे.’
या चित्रपटात प्राजक्ता माळी व्यतिरिक्त स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, प्रसाद महादेव खांडेकर, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, सचिन गोस्वामी, ओंकार राऊत, प्रियदर्शनी इंदलकर, अभिजीत चव्हाण, निखिल रत्नपारखी, प्रभाकर मोरे, चेतना भट, निखिल बने, श्याम राजपूत, ऐश्वर्या बडदे, श्लोक खांडेकर आणि प्रमोद बनसोडे यांसारखे प्रतिभावान कलाकार प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
‘चिकी चिकी बुबूम बुम’ हा चित्रपट नारकर फिल्म्स अँड एंटरटेनमेंट निर्मित असून, आयडियाज द एंटरटेनमेंट कंपनी प्रस्तुत करत आहे. तसेच स्वर्ण पट कथा आणि प्रजाकार प्रोडक्शन्स यांच्या सहयोगाने हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येत आहे. प्रसाद महादेव खांडेकर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, सुनील नारकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाचे सहनिर्माते सेजल दिपक पेंटर आणि प्रसाद महादेव खांडेकर आहेत. तसेच चित्रपटाचे लेखन प्रथमेश शिवलकर आणि प्रसाद महादेव खांडेकर यांनी केले आहे, तर छायांकन गणेश उतेकर यांनी केले आहे.
चिकी चिकी बुबूम बुम’ हा चित्रपट हास्याची आतषबाजी उडवण्यासाठी सज्ज असून, प्रेक्षकांना एक अनोखा अनुभव देईल अशी अपेक्षा आहे.