28.1 C
Pune
Monday, May 20, 2024

जनीं वंद्य ते : कथा क्विकहिलची – भाग ५

क्विकहिल वरील कथेचा हा शेवटचा भाग

Must read

विनय मोघे
विनय मोघे
विनय मोघे हे व्यवसायाने इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असले तरी ते एक तज्ज्ञ गुंतवणूकदार आहेत, केवळ नोंदणीकृतच नवे तर खाजगी कंपन्यात देखील त्यांच्या अनेक गुंतवणुका आहेत. 

मुळात क्विक हिल हे काही काटकर बंधूंच्या कंपनीच नाव नव्हता, ते त्यांच्या व्हायरस सॉफ्टवेयर प्रॉडक्टच नाव होत. १९९३ मध्ये जेव्हा कॅल्क्युलेटरच्या व्यवसायाला अलविदा करून कैलाशने संगणकाच्या देखभालीचा नवीन व्यवसाय चालू  केला तेव्हा कैलाशने या व्यवसायाचं नाव कॅट कम्प्युटर्स असा ठेवलं होतं, मांजरी सारख सहज असा या नावाचा अध्याहृत अर्थ होत असला तरी काटकर या आडनावातली पहिली ३ अक्षरं म्हणजे “कॅट” असा पण हिशेब या नावाच्या मागे दडलेला. पण १९९७-९८ सालात जेव्हा देखभालीचा धंदा बंद करून फक्त अँटी व्हायरस विकायचं ठरलं तेच कैलाशला काही तरी संस्कृत नाव ठेवायचं होत पण संजयची महत्वाकांक्षा या यशाने विश्वव्यापी झालेली, त्याला आता आपलं सॉफ्टवेयर जगभरात पोचवायची चिन्ह दिसू लागलेली म्हणून आज्ञाधारक असून पण संजयने या वेळेस दादाच्या निर्णयाला थोडासा विरोध केला आणि दादाच मन वळवलं एक वैश्विक नाव ठेवायला. त्या काळात उपलब्ध असलेल्या सगळ्या अँटी-व्हायरस कंपन्या या जागतिक पातळीवर काम करणाऱ्या होत्या आणि त्यामुळे त्यांची सॉफ्टवेयर्स पण तशीच होती सर्व समावेशक. जागतिक कंपन्यांना बरेचदा स्थानिक पातळी वरील प्रश्नांची जाणीव नसते. तशीच ती या बहुराष्ट्रीय अँटी व्हायरस कंपन्यांना पण नव्हती, भारतात येणारे व्हायरस, भारतातल्या लोकांसमोरचे प्रश्न हे वेगळे असू शकतात हे त्यांचा ध्यानीमनी पण नव्हते. बरेचदा या बहुराष्ट्रीय म्हणवणाऱ्या कंपन्या त्यांनी इतरत्र कुठे तरी बनवलेल तंत्रज्ञान भारतीयांवर लादत असतात. तो त्यांच्यासाठी सोयीस्कर माल विकायचा मार्ग असतो. तो काळ असा होता जेव्हा एखादा व्हायरस दिसल्यावर, तो शोधायला, त्या विषाणूमुळे नक्की काय परिणाम झाला आहे याचा अंदाज घेण्यासाठी हि बहुराष्ट्रीय अँटी व्हायरस सॉफ्टवेयर्स संपूर्ण संगणकभर भटकंती करत बसायच्या आणि यालाच ग्लोबल बेस्ट प्रॅक्टिस असं गोंडस नाव देऊन त्यांचे सॉफ्टवेयर भारतात विकत असत, फीचर्सचा मोठ्ठा गोतावळा ते एखाद्या अँटी व्हायरस सॉफ्टवेयर सोबत देत असत, ग्राहकाला खरंच याची गरज आहे किंवा नाही याच्याशी या कंपन्यांना फारस सोयरसुतक त्यांना नसायचं, हा काळ असा होता जेव्हा राष्ट्रीयत्व जपण्यापेक्षा अमेरिकेकडून येणारा व्यवसाय, छणछणाट करत येणारे डॉलर्स भारतीय व्यवसायांना महत्वाचे होते त्यामुळे भारतात किती पण चांगल सॉफ्टवेयर बनो, अमेरिकेत किंवा युरोपात जे वापरल जात तेच दर्जेदार असा गोड समज तेव्हा आपल्या सुशिक्षित समाजात झालेला.

काटकर बंधू महात्मा गांधीजींचे खूप मोठे  भक्त वगैरे नव्हते पण तुम्हाला समाजात परिवर्तन घडवायचं असेल तर तुम्हीच ते परिवर्तन बनल पाहिजे हा गांधीजींचा महत्वाचा संदेश ते दोघे जण शब्दशः जगत होते. काटकर बंधूंना समाज बदलायचा होता, भारतीय सॉफ्टवेयरची ताकद जगाला दाखवून द्यायची होती, पण जागतिक झेप घेत असताना त्यांना भारतीयत्व जपायचं होत, कंपनीच नाव जागतिक हवं होत पण भारतीय समाजाचे संगणकीय आणि तांत्रिक प्रश्न त्यांना सोडवायचे होते. खूप मोठं अवाढव्य अँटी व्हायरस प्रॉडक्ट त्यांना भारतीय समाज समोर आणायचं नव्हतं, त्या उलट कमीत कमी फीचर्स असलेलं आणि जास्तीत जास्त किचकट विषाणूंचा नाश करणारं सॉफ्टवेयर त्यांना हवं होत, विषाणूने जर्जर झालेल्या संगणकाला आजारातून लवकरात लवकर बर करण्यासाठी त्यांचं सॉफ्टवेयर वापरलं जावं या उदात्त हेतूने त्यांनी या कंपनीचं नाव क्विक हिल असा ठेवलं. आज खूप सहज आणि सोपं वाटणाऱ्या या नावामागे एक विचार होता, एक विचारधारा होती, भविष्याची आस होती. भारतीयत्व जपून जगाच्या नकाशावर कंपनीला नेण्याची महत्वाकांक्षा होती. शरीरात विषाणूची लागण झालेला रुग्ण जेव्हा डॉक्टर कडे जातो तेव्हा त्याला कोणता डॉक्टर आवडतो, जो पटकन त्याला पूर्वपदावर आणेल तो का जो विषाणूची लागण झाल्यावर त्याला १०० वेगवेगळ्या टेस्ट करवत १० वेगळ्या हॉस्पिटल्स मधून फिरवून शेवटी सुंदर वेष्टणांत क्रोसिनची गोळी विकणारा. पहिला डॉक्टर कदाचित लवकर बरं करतो म्हणून तो चार पैसे कमी कमावेल, त्याला इतर व्यवसायातुन मिळणारी वरकमाई होत नसेल पण रुग्णाचा पसंतीला तर तोच उतरतो ना. शेवटी पद्धत कोणतीही वापरा महत्व कशाला आहे ? रोगाचे अचूक निदान करून रुग्णाला पूर्ववत करण्यालाच मग त्यासाठी तुम्ही जागतिक पातळीवरची सुंदर पद्धत वापरली काय किंवा स्थानिक पातळीवरही पद्धत वापरली काय – शेवटी निकाल तोच असेल तर मग रुग्णाने केवळ जागतिक दर्जाच्या पद्धतींचा खर्च का उचलायचा. माणसाच्या शरीराचं काय किंवा संगणकाचं काय लवकर बरं करणं महत्वाचं.  संगणकाला विषाणू पासून लवकर बरं करून पूर्ववत करणारं अँटी व्हायरस म्हणून काटकर बंधूंनी आपल्या नवीन कंपनीचं नाव क्विकहिल अस ठेवलं. ७ ऑगस्ट १९९५ या दिवशी कंपनीची मुहूर्तमेढ रोवली गेली.

भाग एकभाग दोनभाग तीनभाग चार

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

वाचनीय असे काही

error: Content is protected !!
×