आयुष्यात आपण अनेक प्रलोभनांच्या मागे धावत असतो. पहिले चांगल्या मार्कांच्या मागे मग चांगली नोकरी, सुंदर घर, सुखी कुटुंब. या सगळ्या गोष्टी आपल्या इच्छा आणि गरजांचा भाग आहेत. यातल्या अनेक गोष्टी सध्या करायला आपल्याला आर्थिक पाठबळाची गरज पडते. आणि त्यासाठी आर्थिक नियोजन करणे खूप महत्वाचे ठरते. आर्थिक नियोजन म्हणजे आपल्या आर्थिक भविष्याची खात्री करणे. अनेकांना आर्थिक नियोजन हि काही तरी क्लिष्ट प्रक्रिया वाटते, हे श्रीमंतांचे काही तरी चोचले असावेत असं देखील वाटते पण आर्थिक नियोजन केवळ श्रीमंतांसाठी नाही तर प्रत्येकासाठी गरजेचे आहे.
आयुष्यात कधी कधी अचानक आर्थिक अडचण येऊ शकते. आजारपण, नोकरी गमावणे, घर खर्चातील वाढ हे काही उदाहरण. आर्थिक नियोजन केल्यामुळे आपल्याकडे इमर्जन्सी फंड असतो. यामुळे अशा वेळी आपण आर्थिकदृष्ट्या स्थिर राहू शकतो. त्यामुळे दर महिन्याला उत्पन्नातील काही भाग वेगळा काढून ठेवायला लागतो. या शिवाय चांगले जीवनमान जगावे म्हणून कर्ज घेणे अनेकांसाठी सोयीस्कर वाटते. पण अनियंत्रित कर्ज आपल्या आयुष्यालाच अस्थिर करून टाकू शकते. पण आर्थिक नियोजन केल्यामुळे आपण गरजेनुसारच खर्च करतो आणि कर्ज टाळू शकतो.
आर्थिक नियोजन करणाऱ्यांच्या मनात नेहमीच सुरक्षिततेची भावना असते. आर्थिक नियोजन केल्यामुळे भविष्याची चिंता कमी होते आणि आपण आरामदायक राहू शकतो.
आर्थिक नियोजन कधी करावे?
आर्थिक नियोजन हे लहानपणापासून सुरुवात करणे फायदेशीर ठरते. पण याचा अर्थ असा नाही की आता आर्थिक नियोजन चालू करता येत नाही. आयुष्याच्या विविध टप्प्यांवर विविध उद्दिष्टांसाठी आर्थिक नियोजन चालू करता येते. जसे कि पहिली नोकरी मिळाल्यानंतर, लग्न ठरल्या नंतर, मुलांच्या जन्म नंतर किंवा घर खरेदी करण्यासाठी.
आर्थिक नियोजन कसे करावे?
आर्थिक नियोजन करणे ही प्रक्रिया आता काही कुटील किंवा क्लिष्ट राहिलेली नाही पण थोडीशी शिस्त आणि नियोजन लागते. आर्थिक नियोजनातील पहिली पायरी म्हणजे आपल्या महिन्याच्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा मागोवा घेणे. यामुळे आपण कुठे पैसे खर्च करतो आणि कुठे बचत करू शकतो याचा अंदाज घेणे. त्यामुळे आपल्या उत्पन्नातून दर महिना काहीतरी रक्कम बचत करणे गरजेचे आहे. आपली बचत क्षमता ठरवा आणि त्यानुसार बचत करण्याची सवय लागा.
बचत केलेल्या पैशावर फक्त परतावा मिळवण्यासाठी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. बँकेत ठेवी, म्युच्युअल फंड, सोनं, शेअर्स इत्यादी अनेक गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत. तुमच्या जोखीम सहनशीलतेनुसार आणि आर्थिक उद्दिष्टानुसार गुंतवणूक करा.
आपल्या आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्याची खात्री करण्यासाठी विमा काढणे गरजेचे आहे. आयुर्विमा, अपघात विमा, आरोग्य विमा हे काही विमा पर्याय उपलब्ध आहेत. तुमच्या गरजेनुसार विमा काढा.
आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक याबाबत तुम्हाला काही माहिती नसल्यास आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. ते तुमच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार गुंतवणूक पर्याय सुचवतील आणि आर्थिक नियोजन करण्यास मदत करतील.
आजच सुरुवात करा!
आर्थिक नियोजन हे दीर्घकालीन प्रक्रिया आहे. म्हणून आजच सुरुवात करणे फायदेशीर ठरते. शेवटी आर्थिक सुरक्षा हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचे आहे. आर्थिक नियोजन करून आपण आपले आणि आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करू शकतो आणि स्वप्नांची पूर्तता करू शकतो.