बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांना महाराष्ट्र बाबासाहेब पुरंदरे या नावाने ओळखतो. त्यांचा जन्म २९ जुलै १९२२ मध्ये पुण्यात झाला.
महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थान सर्वोच्च आहे. त्यांच्या कार्याची ज्योत जनमानसात जागृत ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य बाबासाहेब पुरंदरे यांनी केले. इतिहास संशोधक, लेखक, नाटककार आणि समाजसेवक अशा बहु आयामी व्यक्तिमत्त्वाचे ते धनी होते.
शिवशाहीराचे जीवनदर्शन : बाबासाहेब पुरंदरे
जानेवारी २०१९ रोजी त्यांना पद्मविभूषण (भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांची कामे मुख्यत: मराठा साम्राज्याचे १६ व्या शतकातील संस्थापक शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित घटनांवर आधारित आहेत; बाबासाहेब लहान असतानाच त्यांनी “ठिणग्या” हे पुस्तक शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर लिहले. या शिवाय त्यांनी केसरी हे पुस्तक नारायणराव पेशव्याच्या आयुष्यावर लिहलेले पण त्यांची सर्वात महत्वाची साहित्यकृती म्हणजे जाणता राजा, या पुस्तकावर १९८५ साली सर्वप्रथम नाटक बसवले आणि त्याचे गावागावात १००० पेक्षा जास्त प्रयोग झाले.
जाणता राजा या नाटकाच्या प्रयोगाद्वारे ते केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर आंध्र प्रदेश आणि गोव्यामध्येही लोकप्रिय झाले होते.
२०१५ साली त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेलं. बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन व जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले.
पुरंदर्यांची दौलत, पुरंदर्यांची नौबत, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड, आणि राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांचे आजवर प्रकाशित झालेले साहित्य. शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनी अथक संशोधनातून व परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला.
या ग्रंथाच्या १६ आवृत्ती आजपर्यंत सुमारे ५ लाख घरांमध्ये पोहोचल्या आहेत.अनेक दस्तावेजांचा सखोल अभ्यास करून लिहिलेल्या ‘राजा शिवछत्रपती’ या महाग्रंथासह अनेक पुस्तके, देश-विदेशातील १२ हजारांहून अधिक व्याख्याने, ‘जाणता राजा’सारखे आशिया खंडात गाजलेले महानाट्य, या सार्या तपस्येतून बाबासाहेबांनी तब्बल ७५ वर्षे शिवचरित्र तीन पिढ्यांपर्यंत पोहोचविले.
बाबासाहेबांच्या पत्नी निर्मलाताई पुरंदरे या समाजकार्यात गुंतलेल्या. ऑक्टोबर २०१९ मध्ये त्यांचे निधन झाले. निर्मलाताई वनस्थळी ही संस्था चालवायच्या. फ्रांस या देशासोबत त्यांनी घनिष्ट संबंध प्रस्थापित केलेले . बाबासाहेब आणि निर्मला याना अमृत आणि प्रसाद ही मुले तर माधुरी ही मुलगी आहे.
शिवसृष्टी
बाबासाहेबांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे “शिवसृष्टी” ही संस्था. पुणे जिल्ह्यातील शिवापूर येथे बाबासाहेबांनी शिवसृष्टीची स्थापना केली. ही संस्था शिवकालीन वास्तुकला, शस्त्रास्त्रे, जीवनशैली आणि इतिहास यांचे जिवंत प्रदर्शन आहे.
-
शिवसृष्टीचे वैशिष्ट्य: शिवसृष्टीत एक भव्य किल्ला, तळे, वाडा, शस्त्रागार, वेषभूषा कक्ष अशी वास्तू आहेत. या ठिकाणी शिवकालीन युद्ध पद्धती, शस्त्रास्त्रांची माहिती, राजवाड्यातील जीवनशैली इत्यादींचे जिवंत दर्शन घडते. येथे होणारे “राज्याभिषेक” आणि “जलदुर्ग” हे कार्यक्रम प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात.
-
शिवचरित्राचा प्रसार: शिवसृष्टीच्या माध्यमातून शिवचरित्राचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो. दरवर्षी हजारो शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी भेट देतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिवकालीन इतिहासाची माहिती येथे उपलब्ध आहे.
जनी वंद्य अशी या थोर शिवशाहीरांनी वयाच्या ९९व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.