सकाळचे नऊ वाजले अन् ऑनलाइन तासाची घाई सुरू झाली. लॅपटॉपची जुळवाजुळव, नेटवर्क चेकिंग, बॅकग्राऊंड, कॅमेरा – माईकची ॲडजस्टमेंट, लाईट व्यवस्थित आहे की नाही या सगळ्यात काय शिकवायचं आणि काय शिकायचं याला किती महत्त्व दिलं गेलं? विचार करायला लावणारं होतं सगळं ! शिक्षण सुरू व्हायला हवं हे खरं आहे… पण हेअसं? ! पाठ्यपुस्तकातून विद्यार्थी ज्ञान मिळविणार आहे की माहिती? माहिती मिळाली तरी विषय समजणार आहे का? ज्ञान मिळालं तरी त्याचं उपयोजन जमेल का? ज्ञान किती सखोल असेल ? पुन: पुन्हा प्रत्येकजण विचार करतोय पणव्यक्त होताना दिसत नाही आणि व्यक्त झालाच तरी अगदी आपल्या परीघातल्या जवळ.
शिक्षकांनी मेहनतीने तयार केलेले पाठ मुलांना समजणं खूप महत्त्वाचं. त्यासाठी उपाययोजना झाल्या पाहिजेत. आजचा विद्यार्थी तंत्र–स्नेही झालाआहे, त्यानेही काळानुरूप बदल स्वीकारलेत हे दिसतंय. शिक्षण कोणाला नको असणारं? प्रत्येक विद्यार्थ्याला ते हवेआहे आणि ते मिळवण्याची तो धडपड करतोय. काही वेळेला पालकांना लाडीगोडी लावून, काही वेळेला जरा रागावून, हट्ट करून… परिस्थिती चांगली असणाऱ्याकडेही आणि बेताची परिस्थिती असणाऱ्याकडेही आज हीच स्थिती आहे. अमर्याद आकाश – क्षितिज पाहणारे डोळे आज उत्तुंग भरारीसाठी सहा/नऊ ते सतरा इंच अशी चौकटीतील मर्यादा स्वीकारताहेत.
विद्यार्थी – पालक – शिक्षक या सर्व बदलांना स्वीकारत आहेत, पूरक म्हणून पाहत आहेत हे नक्की. पण भविष्यकाळात विद्यार्थ्याला स्वावलंबी असणं आणि स्वयंअध्ययनाची शिस्त लावून घेणे अपरिहार्य आहे. शाळा – महाविद्यालयं यांची जबाबदारी तर आता कैकपटीने वाढणार आहे. विद्यार्थी – शिक्षक अशा जुळलेल्या भावबंधामुळे शाळा – महाविद्यालयांना पर्याय मिळणं किंवा पर्याय असणं तसं अवघड आहे. कारण शिक्षणासाठी म्हणजे पर्यायानं ज्ञानार्जनासाठी सक्षम शिक्षक खंबीरपणे समोर असणं जास्त हितावह. विद्यार्थ्यांसाठीही… येणाऱ्या सुसंस्कृत आणि ज्ञानसमृद्ध पिढीसाठीही… तसेच बलवान राष्ट्रासाठीही.
गुरुकुल पद्धती प्रमाणे आता शिक्षणपद्धत बदलेल का हे येणारा काळच ठरवेल. इथून पुढे वर्गात मर्यादित विद्यार्थी असणार हे मात्र नक्की. यात हित, फायदा पूर्णपणे विद्यार्थ्यांचाच असणार हेही निश्चित आणि तेच खरं ज्ञानार्जनासाठी उपयुक्त. उच्चविद्याविभूषित – संस्कारदात्या शिक्षकाला पूर्वीही मान होता, आताही आहे आणि या पुढील काळात तर तो आणखी वाढणार आहे. उत्तम शिक्षकांची मागणी वाढणार असंच दिसतंय. कारण प्रत्येक पालकाला आपले मूल उत्तम शिकले पाहिजे असंच वाटतं. पालकांची ही भूमिका रास्तच आहे… सध्याच्या परिस्थितीचा मागोवा घेतला तर कुठला व्यवसाय किंवा कुठली नोकरी सुरक्षित आहे त्याप्रमाणे विद्यार्थ्यांचं शिक्षण ठरणार आहे. व्यवसायाभिमुख शिक्षण, कमी कालावधीचे सॉफ्ट स्किल्स कोर्सेस यांना आता प्राधान्य असेल, त्यांची मागणीही वाढेल.
विद्यार्थ्यांना व पालकांना शिक्षक निवडीचे स्वातंत्र्य असणार आणि त्याचबरोबर शिक्षकांना कोणता विद्यार्थी ज्ञानसमृद्ध, ज्ञानसंपन्न करावयाचा हा अधिकार असणार. पण ज्ञानदानाचा ‘व्यवसाय’ होऊ नये हे पथ्य, ही नीतिमत्ता शिक्षकांनीच पाळली पाहिजे, ती पाळली जाईलही. या सर्व शिक्षण बदलात नामांकित शिक्षण संस्थांना खूप मोठा धोका पत्करूनकामाला लागावे लागेल हे नाकारता येत नाही. याचे कारण गाव भागातून शहरी भागात शैक्षणिक प्रगतीसाठी शिक्षणासाठी येणारा ओघ कमी व्हायची शक्यता जास्त आहे कारण घरबसल्या किंवा घराजवळ उत्तमाची उपलब्धता असेल तर कशासाठी शहरात जायचे उच्च शिक्षणाच्या वेळी पुढे बघू असा विचार मनात जोर धरायला लागलाय.
त्यात गाव भागातल्या ग्रामीण भागातल्या छोट्या संस्थांना महत्त्व प्राप्त होणार त्यांचा पसारा वाढणार पर्यायाने जबाबदारीही वाढणार हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. तसेच काही नावाजलेल्या विदेशी शैक्षणिक संस्थाही या ग्रामीण तसेच शहरी मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील हे नक्की आणि त्यात वावगं काहीच नाही. फायदा दोन्ही बाजूंचा होणारच आहे. उत्तम शैक्षणिक संस्थांना चांगला विद्यार्थी मिळेल तर मेहनती विद्यार्थ्यांना उत्तम शैक्षणिक संस्था. मग यशाचा, प्रगतीचाआलेख उंचावत जाईल यात शंकाच नाही.