मार्च एन्ड जवळ आला होता. भारतातले व्यवसाय टॅक्स रिटर्न, पुस्तकं बंद करायच्या गडबडीत होते. सगळं काही सुरळीत चालू होतं, चीन मध्ये काही तरी विषाणू आल्याच्या बातम्या येतच होत्या, तसंही चीनमध्ये काही ना काही तरी विषाणू थैमान घालतच असतात, त्यामुळे खरं तर काही वेगळं असं वाटत नव्हतं पण तेवढयात भारतात पण या कोरोनानी थैमान घालायची सुरवात केली. पंतप्रधानांनी भारतात लॉकडाऊन जाहीर केलं. थोड्याच दिवसात हा विषाणू इटली फ्रान्स अमेरिका आणि स्पेन सारख्या देशांमध्ये पसरत गेला आणि तो इतका कि केवळ त्यांच्याच नाही तर जागतिक अर्थव्यवस्था पण कोलमडत गेल्या, शेयर बाजार पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळत गेल्या. या अदृश्य विषाणूमुळे जागतिक स्तरावर बरेच बदल घडले आणि येण्याऱ्या काळात घडतील. त्यातलाच एक बदल म्हणजे इ-कॉमर्स कंपन्यांची गणितं. केवळ चीनमधून येणारी गुंतवणूक बंद झाली म्हणून नव्हे तर या सगळ्यात वाढ झाली ते म्हणजे ईकॉमर्स क्षेत्राशी संबंधित घोटाळा आणि त्यांचे बदलते प्रकार. लोक घरी बसून ऑर्डर तर देऊ शकतात पण आता या कंपन्यांना घोटाळ्यांची वाढीव समस्या भेडसावू लागली आहे. या सदरात आपण जाणून घेणार आहोत घोटाळ्यांचे विविध प्रकार.