34 C
Pune
Thursday, May 9, 2024

पाडगावकर आणि विंदा : दोन विलक्षण अनुभव

औरंगाबादला आकाशवाणीचा विस्तारित परिवार खूप मोठा होता आणि त्या परिवारातील माणसंही खूप मोठे होते.

Must read

सुनील शिनखेडे
सुनील शिनखेडे
कवी, लेखक, माध्यमस्नेही अशा विविध भूमिका सुनील शिनखेडे हे पार पाडत आहेत . ते सध्या आकाशवाणी सोलापूर केंद्रात सहायक संचालकपदी कार्यरत आहेत . त्यांच्या करिअरची सुरुवात नागपुरात १९८० साली पत्रकारितेतून झाली . त्यांनी कविता संग्रह, ललित लेखन, समीक्षा अशी ५ पुस्तकं प्रकाशित केली . यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी "बातमीची विविध क्षेत्रे" या पुस्तकसंचाचं लेखन त्यांनी केले . गेल्या ३० वर्षात आकाशवाणीसाठी विविध क्षेत्रातील  अनेक मान्यवरांच्या  मुलाखती घेतल्या.

औरंगाबादला विविध क्षेत्रांतील अनेक ख्यातनाम, मातबर मंडळींचं सतत येणं असायचं. शहरात काही कार्यक्रमांच्या निमित्ताने आलेल्या मंडळींनीआकाशवाणीत ध्वनिमुद्रणासाठी यावं असा आमचा आग्रह असायचा. एकदा कविवर्य मंगेश पाडगावकर आले होते. डॉ. सुधीर रसाळ सर आणिभगवान सवाई यांनी त्यांची मुलाखत घेतली होती. मी ध्वनिमुद्रणाला होतो. मराठी कवितेतलं लखलखतं नक्षत्र डोळ्यांत साठवून घेतलं. कवितेवरच्याप्रेमानं भिजलेलं त्यांचं बोलणं मनात टिपून घेतलं. पुढे खूप वर्षांनी पाडगावकरांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार मिळाला. त्यासोहळ्यासाठी ते नाशिकला आले होते. मी त्यावेळी नाशिक आकाशवाणीत होतो. कुसुमाग्रज आणि पाडगावकर दोघंही माझे आवडते कवी. ध्यानीमनी नसताना या पुरस्काराच्या निमित्तानं मला पाडगावकरांवर कविता स्फुरली. सोहळ्यापूर्वी त्यांची भेट घेऊन मी त्यांना ती ऐकवली. तेही थक्कझाले. म्हणाले, ” मी आजवर असंख्य कविता केल्या; पण माझ्यावर कुणीतरी पहिल्यांदाच कविता केली आहे. म्हणून त्याबद्दल तुमचं मला कौतुकवाटतं.” या अशा गंधभारित आठवणींचा सडा मनात सदैव टपटपत असतो.

औरंगाबादला आकाशवाणीचा विस्तारित परिवार खूप मोठा होता आणि त्या परिवारातील माणसंही खूप मोठे होते. त्याबद्दल स्वतंत्र लेख होईल. आत्ता इथे एक छोटासा पण खूप मोठा अनुभव सांगतो. आमच्या विस्तारित परिवारातील एक दिग्गज म्हणजे न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर. मी  त्यांनानानासाहेब म्हणतो. अत्यंत विद्वान, निगर्वी आणि साधं व्यक्तिमत्व. मोठ्या माणसाचं साधेपण हा दुर्मिळ अलंकार. नानासाहेबांचा तो स्वभाव आणिसहजभाव होता.

….. तर एकदा अचानक आमच्या केंद्र संचालकांनी मला बोलावून सांगितलं की, “कविवर्य विंदा करंदीकर आले आहेत. चपळगावकरांकडे त्यांचामुक्काम आहे. आज त्यांना वेळ आहे. दुपारी रेकॉर्डिंगला येतील. तयारीत रहा.” लंचनंतर दुपारी तीनच्या सुमारास स्वतः न्यायमूर्ती चपळगावकर विंदांनाघेऊन आकाशवाणीत हजर. विंदा म्हणजे अफाट व्यक्तिमत्त्व. त्यांच्या कवितेची मोहिनी मनावर होती, तसंच ‘परंपरा आणि नवता’, अँरिस्टॉटलचंकाव्यशास्त्र’,  ‘ज्ञानदेवांचे अनुभवामृत’ यांसारखी त्यांची पुस्तकं एम. ए.ला अभ्यासली असल्यानं त्यांच्याबद्दल विलक्षण आदरयुक्त धाक होता. शिवाय त्यांच्या परखड स्वभावाबद्दलही वाचलं होतं.

केंद्र संचालकांच्या केबिनमध्ये चर्चेत विंदांनी असं सुचवलं की “पठडीतली मुलाखत करण्यापेक्षा मी माझ्या बालकविता, बडबडगीतं ऐकवतो. फक्तसमोर मुलं मात्र हवीत.”  — आता आली का पंचाईत !! पण सुदैवानं बालविभागही त्यावेळी माझ्याकडे होता. अनेक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक- शिक्षिका यांची चांगली ओळख होती. त्यांचे फोन नंबर्स होते. आकाशवाणीच्या अगदी जवळ असलेल्या जयभवानी विद्यामंदिरला फोन केला. तिथलाचौथीचा वर्ग जसाच्या तसा उचलून अर्धा तासात स्टुडिओत हजर झाला. तोवर कविवर्यांचं चहापाणी -गप्पाष्टक आटोपलं. स्टुडिओत येताच त्यांचीकळी खुलली. कारण समोर उत्सुक शंभर कोवळे डोळे त्यांना बघत होते. विंदांनी खास त्यांच्या शैलीत त्यांची बडबडगीतं,  बालकविता ऐकवून धमालकेली. मुलं हसत होती, मनमुराद आनंद लुटत होती. रेकॉर्डिंग उत्तम झालं.

सारं काही आटपून विंदांना घेऊन पुन्हा केंद्र संचालकांच्या केबिनमध्ये गेलो. नानासाहेब चपळगावकरही होतेच. त्यांना बसवून मी माझ्या खोलीतआलो. प्रसारणाची तारीख निश्चित करून करारपत्रावर विंदांची सही घेण्यासाठी पुन्हा लगेच केबिनमध्ये गेलो. सही घेतली आणि शिरस्त्याप्रमाणे त्यांनासांगितलं की आपण थांबा. चेक तयार झाला की मी इथेच आणून देतो. हे ऐकलं मात्र… आणि विंदा स्पष्टपणे म्हणाले, “मी चेक स्वीकारीत नसतो, मला मानधन रोख हवे. आणि आत्ता. लगेच.” केंद्र संचालक चाफळकर सर आणि मी दोघंही स्तंभित झालो. रोख रक्कम मानधन देणंआकाशवाणीच्या नियमात बसणारं नव्हतं. काही अपवादात्मक स्थितीतच त्याला तेव्हा मान्यता होती. कलाकार अंध असतील तर वगैरे…. इथे तसंकरता येणं शक्यच नव्हतं. विंदा आपले चेकच्या बाबतीतले अनुभव सांगून रोख रकमेचा पुन्हा पुन्हा आग्रह धरीत होते. वातावरणात अकारण तणावनिर्माण झाला होता.

नानासाहेबांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं आणि ते म्हणाले, शिनखेडे, जरा बाहेर या.  आम्ही दोघं बाहेर आलो. नानासाहेब चपळगावकर मलाम्हणाले, ” हे बघा, ते काही ऐकणारातले नाहीत. तुमचीही अडचण मी समजू शकतो. तेव्हा आपण एक काम करू. तुम्ही एक लिफाफा घेऊन या.”  मी माझ्या खोलीतून लिफाफा आणला. केंद्र संचालकांच्या केबिनबाहेर कॉरिडॉरमध्ये चपळगावकर सरांनी आपल्या स्वतःच्या पाकिटातून पाचशेच्यादोन नोटा काढल्या आणि त्या लिफाफ्यात घातल्या. म्हणाले, ” विंदांचं नाव लिहून त्यांना हे द्या. बाकीचं आपण नंतर बघू . आपण इथेच आहोत. तेआत्ता आपले पाहुणे आहेत.”  मी थक्क झालो. हा सारा अनुभव विलक्षण आणि अनपेक्षित होता. प्रसंग निभावला गेला तो चपळगावकर सरांमुळे. त्यांनी त्यावेळी जे केलं ते विंदांवरील आणि आकाशवाणीवरील प्रेमामुळे. सारेच त्यांना आपलेसे….

नंतर सवडीने एक दिवस मी नानासाहेबांच्या घरी गेलो तेव्हा विंदांच्या अनेक गोष्टी, त्यांचा सामाजिक दृष्टिकोन, परोपकार व्रुत्ती याबद्दलचे अनुभवआणि किस्से त्यांनी मला सांगितले. “देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे..” असं आपल्या कवितेतूनमांडणारा, पुढे ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित झालेला हा कवी दात्रुत्वाच्या बाबतीत आणि माणूस म्हणूनही किती थोर होता हे नानासाहेबांनीसांगितल्यामुळे कळले. माणूस लहान असो की मोठा, पण एखाद्या प्रथमदर्शनी फटकळ किंवा फुटकळ अनुभवावरून त्याचं लगेच मूल्यमापन करूनआपण आपल्या एकांगी मताचं शिक्‍कामोर्तब करू नये… हा धडा मी या अनुभवातून शिकलो.!

 

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!
×