‘छावा’ हा ऐतिहासिक सिनेमा सध्या खूप चर्चेत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेला ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. या चित्रपटात बॉलिवूडमधील मोठ्या कलाकारांसोबतच मराठमोळा अभिनेता सुव्रत जोशी झळकणार आहे.
‘छावा’ चित्रपटाबद्दल बोलतांना तो म्हणाला, “छत्रपती संभाजी महाराज यांचं कार्य जगभर पोहोचायला हवं, कारण त्यांच्या कार्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. लक्ष्मण उतेकर सरांनी असा ऐतिहासिक चित्रपट करण्याचं ठरवलं आणि या चित्रपटात काम करण्याची संधी मला मिळाली हे माझं भाग्य आहे. महाराजांच्या काळाशी निगडित चित्रपटात काम करायचं माझं स्वप्न या निमित्ताने पूर्ण झालं.”
सुव्रत जोशीचा सेटवरील अनुभव
सेटवरील अनुभव सांगतांना सुव्रत पुढे म्हणतो, “लक्ष्मण सर एक उत्तम दिग्दर्शक आहेत. त्यांच्यासोबत काम करतांना खूप गोष्टी शिकता आल्या. विकी कौशलसोबत काम करणं हा एक छान अनुभव होता. विकी सेटवर प्रचंड मेहनत घेतो, त्याच्याकडून अभिनयाच्या अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.”
चित्रपटासाठी सगळ्या कलाकारांनी व टीमने खूप मेहनत घेतली. रायगडचा सेट उभा केला तेव्हा त्या ऐतिहासिक वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाल्यासारखं वाटलं, असं तो म्हणाला. कोणत्याही गैरसोयीची पर्वा न करता प्रत्येक कलाकाराने आपलं काम उत्कृष्ट केलं आहे.
जगभरात पोहोचावा ‘छावा’!
“हा चित्रपट भारतातच नाही, तर जगभरात पोहोचायला हवा. संभाजी महाराजांचं कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावं, ही माझी इच्छा आहे,” असं सुव्रत म्हणाला.
सध्या सुव्रत त्याच्या ‘वरवरचे वधू वर’ या नाटकात व्यस्त आहे आणि 2025 मध्ये त्याचे अनेक प्रोजेक्ट्स येणार आहेत. ‘छावा’मधील त्याची भूमिका पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना नक्कीच आहे!