विलीनीकरण आणि अधिग्रहण: व्यावसायिक बदलाचा मार्ग

विलीनीकरण आणि अधिग्रहण ही साधने जगभरात कंपनीच्या पुनर्रचना आणि विस्तारासाठी वापरली जातात. दोन विविध कंपनी मधील समन्वय आणि वाढीच्या संधींचा चांगला फायदा करून घेण्यासाठी आणि अधिक कार्यक्षमता प्राप्त करण्यासाठी व्यवस्थापनाच्या हातात ते एक प्रभावी साधन आहेत. विलीनीकरण ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे दोन स्वतंत्र कंपन्या त्यांचे कार्य एकत्र करून एकच संस्था बनतात. विलीनीकरणात, दोन्ही कंपनीच्या इक्विटी भागधारकांना नवीन कंपनी मध्ये स्वारस्य असते. दुसरीकडे, अधिग्रहणामध्ये, जी कंपनी अधिग्रहण करत आहे ती समोरच्या कंपनीच्या स्टॉकचा एक मोठा भाग खरेदी करते. आणि जास्तीत जास्त वोटिंग पॉवर स्वतःकडे ठेवण्यास इच्छुक असते.

विलीनीकरण

विलीनीकरण म्हणजे दोन कंपनींचे ऐच्छिक संलयन. यामध्ये दोन किंवा अधिक कंपनी  एका नवीन कायदेशीर संस्थेमध्ये समान अटींवर विलीन होतात. विलीन होण्यास सहमती देणाऱ्या कंपनी आकार, ग्राहक आणि ऑपरेशन्सच्या प्रमाणात अंदाजे समान स्तरावर असतात. यामुळेच त्यास “समानांचे विलीनीकरण” म्हणून देखील ओळखले जाते. विलीनीकरणाचा मुख्य उद्देश म्हणजे मार्केट मधील मूल्य वाढवणे किंवा व्यवसायाच्या वाढीला गती देणे. विलीनीकरण म्हणजे दोन किंवा अधिक कंपन्यांचे एकत्रीकरण. विलीनीकरणामध्ये दोन्ही कंपनीची सर्व मालमत्ता, दायित्वे, ग्राहक आणि कर्मचारी एकत्र करून एक नवीन संस्था स्थापन केली जाते.

विलीनीकरणाचे प्रकार

१. व्हर्टिकल कॉम्बिनेशन: व्हर्टिकल कॉम्बिनेशन म्हणजे समान सप्लाय चेनमध्ये काम करणाऱ्या २ किंवा अधिक कंपनीमधील विलीनीकरण. व्हर्टिकल कॉम्बिनेशन म्हणजे व्यवसायाच्या उत्पादन आणि वितरण प्रक्रियेसह २ किंवा अधिक कंपनींचे विलीनीकरण. यामध्ये सप्लाय चेनसह ग्राहक आणि तंत्रज्ञानासारख्या माहितीची देवाण घेवाणीचा समावेश होतो. उदाहरणार्थ २००० साली अमेरिका ऑनलाइन आणि टाइम वॉर्नर यांच्यात एक उल्लेखनीय व्हर्टिकल कॉम्बिनेशनद्वारे विलीनीकरण झाले.

२. हॉरीझॉन्टल कॉम्बिनेशन: हॉरीझॉन्टल कॉम्बिनेशन म्हणजे एकमेकांशी थेट स्पर्धा करणाऱ्या कंपनीमधील विलीनीकरण. हॉरीझॉन्टल विलीनीकरण मार्केट शेअर वाढवण्यासाठी, नवीन संधी एक्सप्लोर करण्यासाठी केले जाते. या विलीनीकरणाचे एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे २०११ मध्ये HP (Hewlett-Packard) आणि Compaq यांच्यात यांच्यात झालेले विलीनीकरण. या दोन कंपन्यांमधील यशस्वी विलीनीकरणामुळे US$87 अब्ज पेक्षा जास्त नेट वर्थ असलेली आणि  जागतिक तंत्रज्ञान लीडर कंपनी तयार झाली.

३. मार्केट एक्स्टेंशन कॉम्बिनेशन: मार्केट एक्स्टेंशन विलीनीकरण म्हणजे समान उत्पादने किंवा सेवा विकणाऱ्या परंतु भिन्न बाजारपेठांमध्ये कार्यरत असलेल्या कंपन्यांमधील विलीनीकरण. मार्केट-विस्तार विलीनीकरणाचे उद्दिष्ट मोठ्या बाजारपेठेत प्रवेश मिळवणे आणि अशा प्रकारे मोठा ग्राहक वर्ग आकर्षित करणे हा  आहे.

४. प्रॉडक्ट एक्स्टेंशन कॉम्बिनेशन: प्रॉडक्ट एक्स्टेंशन  विलीनीकरण म्हणजे संबंधित उत्पादने किंवा सेवा विकणाऱ्या आणि त्याच बाजारपेठेत कार्यरत असलेल्या कंपन्यांमधील विलीनीकरण.या प्रकारच्या  विलीनीकरणाचा वापर करून, विलीन केलेली कंपनी त्यांची उत्पादने एकत्रितपणे गटबद्ध करू शकते आणि अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचू शकते. यामध्ये दोन्ही कंपनीची उत्पादने आणि सेवा समान नसून त्या संबंधित असतात. आणि ते समान वितरण वाहिन्या आणि समान उत्पादन पुरवठा साखळी वापरतात.

५. काँग्लोमेरेट कॉम्बिनेशन: या प्रकारच्या विलीनीकरणात पूर्णपणे वेगवेगळ्या मार्केटमध्ये कार्यरत असणाऱ्या कंपनींचे विलीनीकरण होते. याचे पुढे आणखी ही  दोन प्रकार आहेत: शुद्ध आणि मिश्रित.

  • शुद्ध विलीनीकरणामध्ये अशा कंपन्यांचा समावेश असतो ज्या पूर्णपणे भिन्न आहेत आणि भिन्न बाजारपेठेत कार्यरत असतात.
  • मिश्रित विलीनीकरणामध्ये अशा कंपन्यांचा समावेश होतो ज्या नवीन उत्पादने किंवा नवीन मार्केटप्लेसमध्ये विस्तार करू पाहत आहेत

या विलीनीकरणातील सर्वात मोठा धोका म्हणजे वर्तमान व्यवसायात त्वरित बदल किंवा ऍडिशन्स करावे लागतात, कारण या दोन्ही कंपनी पूर्णपणे भिन्न बाजारपेठांमध्ये कार्यरत असतात आणि भिन्न उत्पादने/सेवा पुरवतात.

अधिग्रहण

अधिग्रहणामध्ये अधिग्रहण करणारी कंपनी अधिग्रहित होणाऱ्या कंपनीतील स्टेक मोठ्या प्रमाणावर खरेदी करते. अश्या प्रकारचे व्यवहार विलीनीकरण आणि अधिग्रहण (M&A) मधील मुख्य भाग आहे. सोप्या भाषेत अधिग्रहण म्हणजे दुसऱ्या कंपनीच्या मालमत्तेचे मालकी हक्क मिळवणे.

अधिग्रहणाच्या पद्धती

अधिग्रहण कोणत्याही कंपनीने खालील गोष्टी केल्या तर होऊ शकते:

  • खुल्या बाजारातून शेअर्सची खरेदी केल्यामुळे.
  • सर्वसाधारण भागधारकांना टेकओव्हरची ऑफर दिल्यामुळे
  • कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये बहुसंख्य स्टेक होल्ड करत असलेल्या व्यक्तीशी करार केल्याने देखील अधिग्रहण प्रक्रिया पार पडू शकते. या व्यक्तींमध्ये कोणता बोर्ड सदस्य किंवा सर्वात जास्त वोटिंग पॉवर धारण करणारा भांडवलदार यांचा समावेश होतो.
ऋता कुलकर्णी
ऋता कुलकर्णी
ऋता ही कायदेतज्ज्ञ असून तिने आर्थिक व्यवहारांचे ज्ञान सुलभ होऊन ते सामान्य मराठी माणसांपर्यंत पोहोचावे म्हणून अर्थसाक्षरता नावाचा उपक्रम चालू केला आहे.
- Advertisment -

वाचनीय असे काही

error: Content is protected !!