लावणी: महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख
लावणी ही महाराष्ट्राची अनमोल कलासंपत्ती असून, तिच्या अदाकारीत रस, रंग आणि भावांचा मिलाफ असतो. शब्दलावण्य आणि भावलावण्य यांचा सुरेख संगम साधणारी ही नृत्यशैली, काळानुसार नवनवीन रूप घेत रसिकांपर्यंत पोहोचत आहे. याच लावणीला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा स्तुत्य प्रयत्न प्रसिद्ध कोरिओग्राफर आशिष पाटील यांनी केला आहे. ‘लावणी किंग’ म्हणून नावारूपास आलेल्या पाटील यांनी ‘सुंदरी’ The history of Lavani (अदा ताल शृंगार) या अनोख्या कार्यक्रमाची संकल्पना मांडत लावणीच्या भव्य परंपरेला आधुनिक रंग दिला आहे.
‘सुंदरी’ चा अमेरिकेत शानदार प्रवेश
मुंबईत ‘सुंदरी’ या कार्यक्रमाने रसिकांचे मन जिंकले, आणि आता हा लावणीचा भव्य सोहळा अमेरिकेत रंगणार आहे. जुलै महिन्यात होणाऱ्या या कार्यक्रमात लावणीच्या मोहक अदांवर प्रेक्षक मंत्रमुग्ध होणार आहेत. विशेष म्हणजे, या नृत्य मैफिलीत प्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना अमृता खानविलकर यांची नृत्यशैली आणि आशिष पाटील यांची कोरिओग्राफी यांचा सुरेख संगम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नृत्यातील लय, ताल, आत्मविश्वास आणि रंगमंचीय सहजतेच्या माध्यमातून हा कार्यक्रम कलाप्रेमींना मंत्रमुग्ध करणार आहे.
लावणीचे सौंदर्य आणि तिचे ऐतिहासिक महत्त्व
‘सुंदरी’ या नृत्यसोहळ्यात लावणीचा इतिहास, तिची विविध रूपे आणि तिला लाभलेले संगीत यांचा प्रभावी संगम साधण्यात आला आहे. लावणी केवळ मनोरंजनापुरती मर्यादित न राहता, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि कलात्मक वारशाचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे. लोकसंगीताच्या सुरावटींमध्ये लयबद्ध हालचालींच्या माध्यमातून नृत्यशैलीला एका वेगळ्याच उंचीवर नेण्याचा हा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे.
‘सुंदरी’ साठी रसिक प्रेक्षकांचा उत्साह
‘सुंदरी’ The history of Lavani (अदा ताल शृंगार) या कार्यक्रमाने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला असून, मान्यवरांनीही या प्रयोगाचे विशेष कौतुक केले आहे. जुलै महिन्यात हा कार्यक्रम अमेरिकेतील रसिक प्रेक्षकांसाठी सादर होणार असून, तेथेही तो प्रचंड लोकप्रियता मिळवेल, यात शंका नाही. लावणीप्रेमींसाठी हा एक अविस्मरणीय क्षण ठरणार आहे, जिथे परंपरा आणि नव्या युगाचा मिलाफ पाहायला मिळणार आहे.