आकाशवाणीतले आठवणीतले दिवस: भाग ११

शेतीचा प्रगत विचार सर्वदूर पोचवण्याचं आकाशवाणीचं हे जणू व्रतच! आकाशवाणी सातत्याने गेली अनेक वर्षे ते करतेय.

0
1372
नाशिक

आकाशवाणीचा शेती विभाग

आकाशवाणी 1927 सुरू झाली ती “बहुजन हिताय बहुजन सुखाय” हे ब्रीद अंगीकारून. ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचं हे माध्यम अल्पावधीत लोकशिक्षणाचं माध्यम बनलं. घरातल्या आणि समाजातल्या प्रत्येकाला हे माध्यम आपलं वाटावं यासाठी आकाशवाणीने सर्व वयोगटांसाठी आणि समाजातल्या सर्व घटकांसाठी कार्यक्रमांचं नियोजन केलं. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर नवसमाजनिर्मितीचं स्वप्न साकारण्यासाठी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी अनेक क्षेत्रांत भक्कम पायाभरणी केली. साहित्य, कला, संस्कृती याबरोबरच शिक्षण, आरोग्य, उद्योग, शेती, सहकार या मूलभूत क्षेत्रांना त्यांनी प्राधान्य दिलं. कृषी विद्यापीठांची स्थापना, शेतीत विक्रमी उत्पादनासाठी नवं तंत्र, कृषी संशोधनाला प्रोत्साहन, कृषीमूल्य निर्धारण आणि बाजारपेठेची उपलब्धता, भूविकास बँकांची आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची निर्मिती अशा अनेक आघाड्यांवर शासन प्रयत्नशील होतं.

साधारण याच कालखंडात आकाशवाणीवर शेती कार्यक्रमांची आखणी करण्यात आली. ‘माझं घर माझं शिवार’, ‘गावकरी मंडळ’, ‘किसान वाणी’ अशा शीर्षकांअंतर्गत हे कार्यक्रम गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ आजही त्याच उत्साहाने सुरू आहेत. हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा महाराष्ट्रात केंद्रंही कमी होती. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, परभणी आणि नंतर रत्नागिरी, सांगली, जळगाव अशा निवडक केंद्रांवर हे कार्यक्रम सुरू झाले. कदाचित आज विश्वास बसणार नाही, पण पुणे केंद्रात प्रसिद्ध साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर हे सेवेत होते ते शेती विभागातच. त्यांनी कल्पक नियोजनाने या कार्यक्रमाचा दर्जा उंचावला आणि त्याची उपयुक्तताही लक्षात आणून दिली.  त्यांची आणि पुरुषोत्तम जोशी यांची नाना आणि हरबा ही जोडी वेधक संवादांच्या सादरीकरणातून धमाल करायची.

प्रसिद्ध नाट्य चित्रपट कलावंत जयराम कुलकर्णी हेही प्रारंभी पुणे केंद्रात याच विभागात कार्यरत होते.  ग्रामीण भागात शेतकरी श्रोत्यांची संख्या त्यामुळे लक्षणीय वाढली. घरातला रेडिओ शेतीच्या बांधावर पोचला. महाराष्ट्रातलं पहिलं कृषी विद्यापीठ अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी इथं स्थापन झालं. त्यानंतर अकोल्याचं पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, दापोलीचं बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ, परभणीचं मराठवाडा कृषी विद्यापीठ यांची स्थापना झाली. नागपूरला तर विसाव्या शतकाच्या प्रारंभापासूनच म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात 1920 –25 च्या आसपास कृषी महाविद्यालय सुरू झालं आणि ते अतिशय नावाजलेलं होतं. आजही ते सुरू आहे.

कृषी विद्यापीठं, संशोधन केंद्रं यांतील प्राध्यापक, संशोधक तसंच समाजातील प्रयोगशील शेतकरी यांच्या सहकार्यानं सर्वसामान्य शेतकऱ्यांना समजेल अशा त्यांच्याच भाषेत शेतीतलं नवं तंत्रज्ञान पोचवणं हे आकाशवाणी शेती कार्यक्रमांच्या निर्मात्यांसमोरचं आव्हानच होतं. सर्वच केंद्रांवर शेती कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी ते स्वीकारलं. तज्ञ निर्मात्यांची नियुक्ती करून शेती विभागाची जडण-घडण आकाशवाणीत उत्तम करण्यात आली. फार्म रेडिओ ऑफिसर आणि फार्म रेडिओ रिपोर्टर अशी नवी पदं निर्माण करून या नियुक्‍त्या झाल्या. नवं बियाणं, पेरणीपूर्व मशागत, पिकांवरील कीड नियंत्रणाचे उपाय, खतांच्या मात्रा, नवनवीन पिकांच्या उत्पादनासाठी प्रोत्साहन, सल्ला, जमिनीचा कस राखण्याचे उपाय, पाण्याचा वापर आणि नियोजन, पशुपालन, दुग्धोत्पादन, बँकांचं कर्ज कसं मिळतं, ते कसं फेडायचं, बचत कशी करायची, स्वयंपूर्णता, शेतमालाच्या काढणीनंतरची  साठवण, बाजारपेठेत माल कसा पोचवायचा, मालाची निर्यात, सरकारी योजनांची माहिती, या योजनांचा लाभ कसा घ्यायचा… असे कितीतरी विषय कधी मुलाखती, संवाद आणि माहिती स्वरूपात शेतकऱ्यांपर्यंत पोचवायचे हा या कार्यक्रमाचा उद्देश सफल होत होता.

लहान-मोठा शेतकरीवर्ग आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकू लागला. या कार्यक्रमातून दिल्या जाणाऱ्या सल्ल्यानुसार आपल्या शेतीचं संपूर्ण नियोजन करणाऱ्यांची संख्याही वाढली. प्रत्येक केंद्रावर कृषी सल्लागार समित्या स्थापन झाल्या. विद्यापीठ संशोधन केंद्रं, राज्य शासनाचे अधिकारी, प्रगतिशील शेतकरी, कृषिभूषण अशांचा त्यात समावेश असायचा. पुढल्या तीन महिन्यांचं नियोजन या समितीच्या बैठकीत केलं जायचं. अजूनही ही पद्धत सुरू आहे. आता तालुका स्तरावरील कृषी विज्ञान केंद्रांचीही त्यात भर पडली आहे.

माझ्या आकाशवाणीतल्या तीस वर्षांच्या काळात मी पाहिलेले सुरुवातीचे काही कर्तबगार एफ आर ओ म्हणजे श्याम पनके, रमेश देशपांडे, अनिल देशमुख, मधुकर सावरकर, शरद भोसले, पी.बी. कुरील, प्रल्हाद यादव, प्रमोद चोपडे, राम घोडे इत्यादी.  त्यानंतर नवी मंडळीही पुढे आली. त्यात श्रीपाद कहाळेकर, डॉ. संतोष जाधव, नानासाहेब पाटील, संजीवन पारटकर, सचिन लाडोळे हेही शेती विभाग समृद्ध करीत आहेत. शेतीविषयक कार्यक्रमांची पार्श्वभूमी नसतानाही आणि फार्म रेडिओ ऑफिसर म्हणून नियुक्ती झालेली नसतानाही काही अधिकारी हे काम सातत्याने आणि उत्तम पद्धतीने करीत आलेत. त्यात सुभाष तपासे, प्रभाकर सोनवणे, राजेंद्र दासरी आणि इतरही काही जणांचा उल्लेख करता येईल. आकाशवाणीच्या एका प्रायमरी केंद्राच्या कक्षेत पाच ते सहा जिल्हे येतात. त्यानुसार कार्यक्रमांची आखणी आणि निर्मिती करायची म्हणजे पूर्ण समर्पण आणि समरसून काम करणं याला पर्याय नाही. शिवाय अनेक केंद्रांत हे कृषी अधिकारी जनसंपर्काचे कामही सोपं करतात. कारण शासकीय अधिकारी, विद्यापीठं, लोकप्रतिनिधी आणि मंत्री स्तरावर त्यांची वैयक्तिक घनिष्ठ ओळख असते.

आपला महाराष्ट्र वैविध्यपूर्ण आहे. विविध प्रदेशानुसार इथे पीक पद्धती ( crop pattern ) बदलते. कोकणात भात आणि मत्स्य शेती, नारळ, सुपारी, आंबा, काजू यांच्या बागा ; तर पूर्व विदर्भात फक्त भाताचं पीक. नागपूर परिसरात संत्री, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात ज्वारी, बाजरी, कापूस, डाळी, गहू.. तर पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने ऊस, ज्वारी, डाळिंबं, द्राक्षं शिवाय फुलशेती. खानदेशात ज्वारी, डाळी यांच्याबरोबरच चिकू, केळी यांचं पीक तसंच वांगी आणि मिरच्या. नाशिक परिसर द्राक्ष आणि कांदा यासाठी प्रसिद्ध. ठाणे- वसई -जव्हार -पालघर इकडे भात, नाचणी ही पिकं, तर मिठागरं सुद्धा!!

त्या त्या प्रदेशातील हवामान आणि पाण्याच्या नैसर्गिक व सिंचन सोयीनुसार ही पिकं घेतली जातात. ती ती केंद्रं त्यानुसार कार्यक्रमांची आखणी करतात. औरंगाबाद, जळगाव, नाशिक या ठिकाणच्या वास्तव्यात माझा शेती विभागाशी थेट संबंध आला नसला तरी तिमाही मिटिंगला मी कधीतरी जायचो. त्यानिमित्ताने शेतकऱ्यांशी, त्यांच्या प्रश्नांशी मी जोडला गेलो. जळगावला जैन इरिगेशन ठिबक प्रकल्प, त्यांचं केळीचं टिश्यूकल्चर संशोधन, जैन समुहाचे सर्वेसर्वा श्रीयुत भंवरलाल जैन यांची शेतकरी हिताची कळकळ मी जवळून बघितली. इथेच ना. धों. महानोर यांच्याशी अधिक मैत्र जुळलं. त्यांच्या पळसखेडच्या शेतीचं दर्शन झालं. जळगावच्या मुक्कामात शेतातल्या भरीत पार्टीचा आस्वाद कितीदातरी घेतला. नाशिकला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातले शेतीचे प्रयोग बघितले. वनाधिपती विनायकदादा पाटील यांची उत्तम शेती, लासलगाव- पिंपळगावची कांदा, द्राक्षपिकाची समृद्धी अनुभवली. यातून आकाशवाणीचे अनुबंध जोडून नवनवीन शेती कार्यक्रमांची निर्मिती करता आली.

सध्या सोलापूरलाही कोरडवाहू कृषी संशोधन केंद्राचे प्रयोग, कृषी विज्ञान केंद्राच्या डॉ. लालासाहेब तांबडे यांचं आणि टीमचं संशोधन, तसंच कृषिभूषण विश्वासराव कचरे, सीताफळाचं निर्यातक्षम पीक घेणारे नवनाथ कसपटे, द्राक्षांचं उत्तम पीक घेणारे नान्नजचे काळे (सोनाका),  शेवगा, दोडकी यांचं पीक घेऊन आंध्रात निर्यात करणारे बार्शी तालुक्यातले कितीतरी तरुण,
सांगोल्यातले डाळिंबं शेतकरी, ऊसशेतीमुळे आणि कारखानदारीमुळे साखर सम्राट अशी ओळख झालेले दिग्गज, लोकमंगलची वडाळ्यातील जरबेराची लागवड…. हे एकीकडे आणि कधी कोरडवाहूमुळे तर कधी नैसर्गिक आपत्तीमुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांचं दैन्य, दुःख, जगण्याचा संघर्ष …असे विरोधाभासी अनुभवही घेतोय. कार्यक्रमांतून मांडतोय. अंकोलीत वैज्ञानिक अरुण देशपांडे यांनी चालवलेल्या प्रयोगांचं महत्त्वही आकाशवाणीच्या माध्यमातून लोकांना पटवून देतो आहे. पाण्याचा वापर, पाण्याचं ऑडिट, महात्मा गांधी यांच्या विचारधारेतून आणि तिला वैज्ञानिक उपक्रमांची जोड देऊन अरुण देशपांडे, सुमंगल देशपांडे अनेक प्रयोग करत असतात ते आकाशवाणीवरून सर्वांपर्यंत पोचतायत. आकाशवाणी सोलापूर केंद्रात आता क्रुषी पदवीधर असलेले सुजित बनसोडे हे माझे तरुण सहकारी अनेक नवे उपक्रम करत असतात.

शेतीचा प्रगत विचार सर्वदूर पोचवण्याचं आकाशवाणीचं हे जणू व्रतच! आकाशवाणी सातत्याने गेली अनेक वर्षे ते करतेय. क्रुषी मेळावे आणि नभोवाणी शेतीशाळेसारख्या उपक्रमांतून शेतकऱ्यांशी घट्ट नाळ जोडली गेली आहे. शेतकऱ्यांच्या विश्वासाबद्दल तर काय बोलावं? पूर्वी आंध्रप्रदेशात शेती कार्यक्रमातून सांगितलेल्या तांदळाच्या नव्या जातीची तिथल्या असंख्य शेतकऱ्यांनी लागवड केली आणि जोमदार, प्रचंड पीक आलं…तेव्हा त्या तांदळाची ओळख “रेडिओ राईस ” अशी झाली. आजही आंध्रात रेडिओ राईस पिकतो आणि प्रचलित आहे. महाराष्ट्रातही शेतीच्या ऊर्जितावस्थेस आकाशवाणीचा फार मोठा हातभार लागला आहे. त्याचं हे प्रातिनिधिक शब्दरूप.

Previous articleआकाशवाणीतले आठवणीतले दिवस: भाग १०
Next articleसदा सर्वदा स्टार्टअप : वाटाघाटींचे महत्त्व!
सुनील शिनखेडे
कवी, लेखक, माध्यमस्नेही अशा विविध भूमिका सुनील शिनखेडे हे पार पाडत आहेत . ते सध्या आकाशवाणी सोलापूर केंद्रात सहायक संचालकपदी कार्यरत आहेत . त्यांच्या करिअरची सुरुवात नागपुरात १९८० साली पत्रकारितेतून झाली . त्यांनी कविता संग्रह, ललित लेखन, समीक्षा अशी ५ पुस्तकं प्रकाशित केली . यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी "बातमीची विविध क्षेत्रे" या पुस्तकसंचाचं लेखन त्यांनी केले . गेल्या ३० वर्षात आकाशवाणीसाठी विविध क्षेत्रातील  अनेक मान्यवरांच्या  मुलाखती घेतल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here