देशात ई-कॉमर्सची व्याप्ती वाढल्याने खरेदीचे सत्रही सतत चालूच असते. आधी फक्त दसरा, दिवाळीला होणारी फ्रिज, वॉशिंग मशीन सारखी खरेदी आता वर्षभर चालू असते. ग्राहकांच्या या बदलत्या मानसिकतेनुसार त्याच्याशी संलग्न असणाऱ्या इतर बाबी देखील बदलणार यामध्ये काही शंका नाही.
ग्राहकांचा थोडा अभ्यास केल्यावर आलेल्या निकषांमध्ये असे लक्षात आले की उपस्थित ग्राहक वर्गामध्ये तरुण वर्गाचीही मोठी संख्या आहे. आर्थिक स्थैर्य नसल्याने मोठ्या खरेदीच्या वेळेस त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामधूनच “आता खरेदी करा, नंतर पैसे द्या” (Buy Now Pay Later – बीएनपीएल) संकल्पना उदयास आली.
आता खरेदी करा, नंतर पैसे द्या म्हणजे काय?
आज खरेदी नंतर पैसे हा पूर्वापार चालू असलेला एक उधारीचा प्रकार आहे. याद्वारे ग्राहकांना खिशात पैसे नसताना देखील सामान खरेदी करण्याची सोय उपलब्ध केली जाते आणि कालांतराने त्यांच्यासाठी एखादी वित्त संस्था पैसे पैसे देत असते ही बाब इथे महत्वाची. ग्राहक जर सामानाचे पैसे देत नसेल तर ते कोणाला तरी द्यावेच लागतात पण विक्री वाढावी म्हणून अशा प्रकारच्या क्लुप्त्या शोधल्या जातात.
या कर्जप्रकरात व्याज आकारले जात नाही. बीएनपीएल वित्तपुरवठा वापरणे सोयीचे असले तरी यामध्ये संभाव्य धोके देखील आहेत. हा पर्याय फक्त शॉपिंगपुरताच नाही तर ट्रॅव्हल बुकिंग, जेवण मागवणे, किराणा सामान, राइड शेअरिंगसाठी देखील उपलब्ध आहे.
बीएनपीएल कसे काम करते?
सर्व बीएनपीएल सेवा प्रदात्यांच्या काही अटी असतात. प्रथमच बीएनपीएल सुविधा वापरणाऱ्या खरेदीदारांना ही सेवा प्रदान करणाऱ्या प्लॅटफॉर्मवर केवायसी करावे लागते. काही रक्कम ग्राहकाला डाउन पेमेंट म्हणून भरावी लागते तर उरलेले पैसे एकरकमी किंवा हप्त्याने दिले जाऊ शकतात. याशिवाय खरेदी केल्यानंतर अॅपवर पेमेंटच्या वेळेस बीएनपीएल पर्याय निवडावा लागतो. याची परतफेड बँक ट्रान्सफर, चेक, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा यूपीआय इत्यादीद्वारे केली जाऊ शकते.
२००० च्या दशकापेक्षा बीएनपीएल पर्याय आत्ताच्या दशकात अधिक लोकप्रिय झालेला आहे. जेव्हा महागाई जास्त असते आणि व्याजदर वाढलेले असतात तेव्हा खरेदी करण्यासाठी ग्राहाकांसाठी बीएनपीएल हा एक उपयुक्त पर्याय असू शकतो.
बीएनपीएल पर्यायाचा वापर केल्यास ग्राहकास परफेडीसाठी काही वेळ दिला जातो. यासाठी साधारण १५ ते ४५ दिवसांचा कालावधी दिला जातो. एक्सपायरी तारखेला बँक खात्यातून पैसे कापले जातात. जर त्या दिवशी एकरकमी रक्कम द्यायची नसेल, तर ती हप्त्यांमध्ये भरण्याची देखील सुविधा उपलब्ध आहे.
बीएनपीएल तुम्हाला खरेदी करण्यात मदत करते, पण हे व्यवहार करताना सावधगिरी न बाळगल्यास तुम्ही फेडू शकण्यापेक्षा जास्त उधारी होऊ शकते. आणि याचा तुमच्या क्रेडिट स्कोअर परिणाम होऊ शकतो. बऱ्याच बीएनपीएलदेणाऱ्या संस्था कर्ज मंजुरीसाठी सॉफ्ट क्रेडिट चेक करतात. बीएनपीएलकर्जाची उशिरा परफेड केली तर ते देखील प्रमुख क्रेडिट ब्युरोन कळवले जाते. ते तुमच्या क्रेडिट अहवालांमध्ये दिसून येते आणि त्याचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होतो.
बीएनपीएलचे फायदे
बीएनपीएल ग्राहकांना व्याज शुल्काशिवाय कालांतराने रक्कम परतफेड करण्यासाठी परवानगी देतात. आणि कमी क्रेडिट स्कोअर किंवा क्रेडिट संबंधी इतर काही कमतरतेमुळे इतर कर्ज पर्याय बंद झाले असतील तरीही या प्रकारच्या वित्तपुरवठ्यासाठी मान्यता मिळणे शक्य आहे.
बीएनपीएल कर्जे तुमच्या क्रेडिट कार्डच्या कर्जात भर घालत नाहीत, परंतु ते तुमच्या वैयक्तिक कर्जाच्या कर्जात भर घालतात. तुम्ही पैसे भरण्यात अयशस्वी झाल्याशिवाय ते तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम करत नाहीत.
तोटे
बीएनपीएलमुळे क्रेडिट कार्ड ऑफर करत असलेल्या बऱ्याचश्या ऑफर्स जसे की कॅश-बॅक किंवा रिवॉर्ड पॉइंट मिळत नाहीत.
तसेच, बीएनपीएलद्वारे खरेदी केलेली एखादी वस्तू परत करायची असल्यास ती गुंतागुंतीची होऊ शकते. पैसे परत मिळवण्यासाठी जोपर्यंत व्यापारी बीएनपीएल कर्जदाराला परतावा कळवत नाही तोपर्यंत विलंब होऊ शकतो. पण याची परतफेड ठरवलेल्या कालावधीमधेच करावी लागते.
अन्यथा पेमेंट कदाचित उशिरा किंवा गहाळ म्हणून चिन्हांकित केले जाऊ शकते, परिणामी अतिरिक्त शुल्क आणि तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होऊ शकतॊ होऊ शकतो.
तुम्ही बीएनपीएल योजना वापरण्याचा विचार करत असल्यास,त्याच्या सर्व अटी व शर्ती समजून घ्या आणि तुम्ही सर्व पेमेंट वेळेवर करू शकाल तेवढ्याच कर्ज सुविधेचा लाभ घ्या.