fbpx

एसएमई लिस्टिंग म्हणजे काय? संपूर्ण माहिती आणि प्रक्रिया

एसएमई (स्मॉल अँड मिडियम एंटरप्रायझेस) लिस्टिंग मध्ये जे लहान व मध्यम उद्योगांना नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) या दोन मोठ्या प्लॅटफॉर्म्सवर लिस्ट करते. यामुळे या उद्योगांना त्यांच्या व्यवसायासाठी अधिक निधी उभारण्याचा आणि त्यांच्या ब्रँडला स्ट्रॉंग करण्यात मदत होते.

एसएमई लिस्टिंगसाठी पात्रतेच्या अटी

एसएमई लिस्टिंगसाठी काही ठराविक अटी व निकषांची पूर्तता करावी लागते. या अटी मुख्यतः कंपनीच्या आर्थिक स्थितीवर, व्यवसायाच्या ट्रॅक रेकॉर्डवर आणि पारदर्शकतेच्या क्षमतेवर अवलंबून असतात.

  1. ट्रॅक रेकॉर्ड

कंपनीचा किमान तीन वर्ष व्यवसाय चालू असावा आणि त्यापैकी किमान दोन वर्षे कंपनी नफा मिळवणारी असावी. नफा केवळ नेट प्रॉफिट स्वरूपातच पाहिला जात नाही तर एबिटा (Earnings Before Interest, Tax, Depreciation, and Amortization) देखील महत्त्वाचा ठरतो. एबिटा म्हणजे कंपनीच्या व्यवसायातून निर्माण होणाऱ्या रोख रकमेतून उत्पन्न होणारी क्षमता, जी व्यवसायाची आर्थिक स्थिरता दर्शवते.

  1. नेटवर्थ

कंपनीची नेटवर्थ देखील महत्त्वाची भूमिका बजावते. नेटवर्थ ही कंपनीच्या एकूण मालमत्ता (assets) व त्यावरील देणी (liabilities) वजा करून मिळालेली रक्कम आहे. एसएमई प्लॅटफॉर्मसाठी आणि मुख्य बोर्ड लिस्टिंगसाठी लागणाऱ्या नेटवर्थची आवश्यकता वेगळी असते.

  1. पेड-अप कॅपिटल आणि मार्केट कॅप

कंपनीचे पेड-अप कॅपिटल ठरावीक निकषांनुसार असणे आवश्यक आहे. याशिवाय, आयपीओ नंतर कंपनीच्या मार्केट कॅपची अपेक्षित पातळी गाठणे महत्त्वाचे ठरते.

  1. विशेष उद्योगांसाठी अटी

जर कंपनी ब्रोकिंग, मायक्रो फायनान्स किंवा इतर काही विशिष्ट उद्योगांमध्ये काम करत असेल, तर NSE आणि BSE यांनी त्या क्षेत्रांसाठी विशेष अटी दिल्या आहेत.

एसएमई लिस्टिंगसाठी मानसिकता तयार करणे

केवळ आर्थिक निकषांची पूर्तता करून लिस्टिंगसाठी पात्र होणे पुरेसे नाही; कॉर्पोरेट मानसिकतेची तयारीही तितकीच महत्त्वाची आहे. पब्लिक लिस्टिंग नंतर कंपनीला संपूर्ण पारदर्शकता राखावी लागते.

  1. पारदर्शकता आणि डिस्क्लोजर्स

पब्लिक लिस्टेड कंपनी म्हणून, आपल्या प्रत्येक आर्थिक हालचालींचा तपशील वेळोवेळी जाहीर करणे बंधनकारक असते. सेबीने (SEBI) या संदर्भात कठोर नियमावली लागू केली आहे. उशीर झाल्यास दंड भरावा लागतो. शिवाय, रोजच्या शेअर बाजारातील किंमती, व्यापाराचा डेटा यांसारखा सर्व डेटा सार्वजनिक केला जातो.

  1. प्रायव्हेट आणि पब्लिक कंपनीतील फरक

प्रायव्हेट कंपन्यांमध्ये गुप्तता ठेवता येते; मात्र पब्लिक कंपनी असल्यास प्रत्येक गोष्ट नियामक संस्थांना व गुंतवणूकदारांना उघड करावी लागते. उदाहरणार्थ, प्रायव्हेट कंपनीत काही छोट्या समस्यांवर अंतर्गत उपाय करता येतो, पण पब्लिक कंपनीत, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सर्व नियामक निकष पूर्ण करावे लागतात.

लिस्टिंग प्रक्रिया आणि तयारी

लिस्टिंगसाठी आर्थिक स्थिरतेशिवाय नियामक संस्थांच्या विविध प्रक्रियांचा सामना करावा लागतो. यामध्ये सेबी, एमसीए (Ministry of Corporate Affairs) आणि इतर नियामक संस्थांच्या अटींची पूर्तता करावी लागते. कंपनीचे बॅलन्स शीट अत्यंत मजबूत असणे आवश्यक आहे.

  1. डिस्क्लोजर्सची पूर्तता

सेबीने कंपन्यांसाठी वेळोवेळी डिस्क्लोजर्स देणे अनिवार्य केले आहे. या प्रक्रियेमुळे कंपन्यांवर अधिक जबाबदारी येते.

  1. लिस्टिंगची फायदे व जबाबदाऱ्या

लिस्टिंगनंतर कंपनीला जागतिक गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचता येते, परंतु यासोबतच जबाबदाऱ्या वाढतात. कंपनीला वेळेवर आणि अचूक माहिती सादर करावी लागते.

एसएमई लिस्टिंग ही प्रक्रिया केवळ आर्थिक पूर्ततेची नव्हे, तर पारदर्शकता आणि जबाबदारी घेण्याच्या तयारीची परीक्षा आहे. ज्या कंपन्या या सर्व अटी पूर्ण करू शकतात, त्या एसएमई लिस्टिंगसाठी पात्र ठरतात व व्यवसायाच्या प्रगतीसाठी एक नवा टप्पा गाठतात.

ऋता कुलकर्णी
ऋता कुलकर्णी
ऋता ही कायदेतज्ज्ञ असून तिने आर्थिक व्यवहारांचे ज्ञान सुलभ होऊन ते सामान्य मराठी माणसांपर्यंत पोहोचावे म्हणून अर्थसाक्षरता नावाचा उपक्रम चालू केला आहे.

वाचनीय असे काही

error: Content is protected !!