क्रिएटर होण्यासाठी योग्य दृष्टिकोन: आवड आणि समर्पण महत्त्वाचे

आजकाल सोशल मीडियावर अनेक नवोदित कलाकार आणि क्रिएटर्स येत आहेत. त्यांचा मुख्य हेतू अनेकदा प्रसिद्धी मिळवणे आणि पैसे कमावणे असतो. मात्र, यशस्वी क्रिएटर होण्यासाठी केवळ व्हिडिओ व्हायरल होणे पुरेसे नाही. यासाठी योग्य समज, मेहनत आणि वेळ द्यावा लागतो.

अथर्व सुदामे म्हणतो, “स्वतःच्या आवडीसाठी काम करा, फक्त पैशांसाठी नव्हे”

एका काळी सोशल मीडियाचा उपयोग केवळ मनोरंजनासाठी होत होता, मात्र आता त्यातून करिअर करता येते. काही वर्षांपूर्वी क्रिएटर्सनी हा मार्ग ठरवून निवडलेला नव्हता. अनेक लोक केवळ स्वतःच्या आवडीसाठी कंटेंट तयार करत होते, आणि नंतर त्यातूनच मोठे व्यासपीठ तयार झाले.

मी स्वतः थिएटर करत होतो, आणि केवळ त्या आवडीतून मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. मात्र, जसजसे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मजबूत होत गेले, तसतसे या माध्यमाने वेग घेतला आणि मोठे बदल घडले. त्यानंतर सोशल मीडियावर क्रिएटर म्हणून ओळख मिळाली. पण सुरुवातीला कधीही ठरवून पैसे कमवायचेत, म्हणून मी हे सुरू केले नव्हते.

आजकाल अनेक लोक ठरवून सोशल मीडिया क्रिएटर बनण्याचा निर्णय घेतात. मात्र, जर फक्त पैसे कमावण्याच्या उद्देशाने कोणी कंटेंट तयार करत असेल, तर त्यांना हे लक्षात घ्यायला हवे की हा प्रवास सोपा नाही.

व्हायरल व्हिडिओ म्हणजे यश नव्हे

आजच्या घडीला अनेक जण असा गैरसमज करून घेतात की इंस्टाग्रामवर काही व्हिडिओ व्हायरल झाले की लगेच त्यांना पैसे मिळायला लागतील. मात्र, वस्तुस्थिती याच्या अगदी उलट आहे. इंस्टाग्राम तुम्हाला कोणताही थेट आर्थिक मोबदला देत नाही.

युट्यूबवर पैसे मिळू शकतात, पण त्यासाठी खूप मेहनत आणि वेळ द्यावा लागतो. सुरुवातीच्या काळात युट्यूबवर ग्रो व्हायला अनेक महिने किंवा वर्षे लागू शकतात. त्यामुळे घर चालवण्याइतपत उत्पन्न मिळवायचे असेल, तर केवळ सोशल मीडियावर अवलंबून राहणे योग्य ठरणार नाही.

क्रिएटर होण्यासाठी आधी कौशल्य शिका

जर कोणालाही कंटेंट क्रिएटर बनायचे असेल, तर आधी त्या क्षेत्राची समज आणि कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे. डान्स, अभिनय, लेखन, व्हिडिओ एडिटिंग, छायाचित्रण – कोणत्याही गोष्टीत नैपुण्य मिळवण्यासाठी सराव आणि समर्पण गरजेचे असते.

फक्त सोशल मीडियावर काही व्हिडिओ टाकून तुम्ही मोठे क्रिएटर बनू शकणार नाही. कोणतेही क्षेत्र समजून घेऊन, त्यात पूर्ण तयारीनिशी उतरले, तरच दीर्घकालीन यश मिळवता येईल.

सोशल मीडिया क्रिएटर बनण्याच्या प्रवासात तुम्हाला ध्येय, समर्पण आणि धीर आवश्यक आहे. जर केवळ पैसे कमावण्याच्या उद्देशाने हा मार्ग निवडला, तर निराशा पदरी पडू शकते. त्यामुळे कोणतेही माध्यम निवडण्यापूर्वी, त्या गोष्टीबद्दल सखोल ज्ञान मिळवा आणि त्यात प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न करा. यश मिळवण्यासाठी शॉर्टकट नाही, मेहनत हीच खरी गुरुकिल्ली आहे.

ऋता कुलकर्णी
ऋता कुलकर्णी
ऋता ही कायदेतज्ज्ञ असून तिने आर्थिक व्यवहारांचे ज्ञान सुलभ होऊन ते सामान्य मराठी माणसांपर्यंत पोहोचावे म्हणून अर्थसाक्षरता नावाचा उपक्रम चालू केला आहे.

वाचनीय असे काही

error: Content is protected !!