मला आठवतं मी नुकताच कॉलेज मधून बाहेर पडलेलो, धंद्याची सुरवात झालेली आणि काही चांगली कामं हातात आलेली, माझ्या मित्रांनी मला काम सुचवायला सुरवात केलेली, लोकांना भेटत गेलो तसं शेयर मार्केट बद्दल कळत गेलं, एक दिवस बिलकेयर नावाच्या कंपनीचा आयपीओ आला, मी माझ्या काही मित्रांच्या सांगण्यावरून तो आयपीओ १० रुपयाने विकत घेतला. कालांतराने कामं येत गेली तशी माझी शेयर्स मध्ये गुंतवणूक करायची हौस मग मागे पडत गेली. मी विसरून पण गेलेलो कि आपण असं कोणत्या शेयर मध्ये पैसे लावले आहेत.
आणि एक दिवस अचानक मग काही वर्षांनी आठवण झाली कि अरे आपण असा एक शेयर घेतलेला, त्या दिवशी त्या शेयरची किंमत मला १७०० रुपये दिसली, माझ्या डोळ्यावर माझा विश्वासच बसेना, एवढी कशी झाली असेल किंमत, पण झाली होती. शेयर जार हे खरंच एक असं रसायन आहे जे तुम्हाला आकृष्ट करायला काहीही घडवू शकत. १७० पटीने हा शेयर काही वर्षात वाढलेला. माझ्या जवळ असलेले शेयर्स मी तात्काळ काढून टाकले. मी खूप खुश झालो, स्वर्ग जणू दोन बोटांवर राहिलेला, वॉरन बफेट नंतर कोणी असेल तर तो मीच अशा अविर्भावात मी थोडा काळ गेलो.
पण मित्रांनो मार्केट खरच इतकं सोपं नसते की कुणीही सहज पैसे कमवू शकतं? बाजारात प्रवेश तर कुणीही करू शकतं, त्याला वयाची, शिक्षणाची अट नाही. पण बाजारात यायचे म्हणजे अपार मेहनत घ्यावी लागते. ती मेहनत अभ्यास रूपात थोडीफार असते पण किंबहुना त्याहीपेक्षा अधिक मेहनत स्वतःला बदलण्यासाठी लागते. अनुभवावरून सांगतो, मार्केटला सर्वात वावडं कशाचं असेल तर ते इगोचं. तुमचा अंदाज चुकला हे खुल्या दिलाने आणि त्वरित मान्य करा, मला तोटा होणारच नाही हा अहंकार सोडा, भांडवल बाजारात यशस्वी व्हायचे असेल तर स्वयं शिस्त महत्वाची असते. साधारणपणे मनुष्य स्वभावाच्या विरुद्ध जाऊन अंगी ट्रेडिंगची शिस्त बाणवावी लागते.