fbpx

आकाशवाणीतले आठवणीतले दिवस : (भाग ५) रानकवी महानोरांशी ऋणानुबंध

आकाशवाणीने मला भरभरून दान दिलंय. नेहमीच्या कार्यालयीन जबाबदारीच्या आनंददायी कामाव्यतिरिक्तचं हे दान म्हणजे कवितेच्या आणि कवींच्या ऋणानुबंधाचं मोत्यांचं दान.

रानकवी महानोरांशी ऋणानुबंध

आकाशवाणीने मला भरभरून दान दिलंय. नेहमीच्या कार्यालयीन जबाबदारीच्या आनंददायी कामाव्यतिरिक्तचं हे दान म्हणजे कवितेच्या आणि कवींच्या ऋणानुबंधाचं मोत्यांचं दान. कविवर्य ना. धों. महानोर यांच्या कवितेशी नातं कॉलेजमध्ये असतानाच जडलं होतं; पण त्यांच्याशी घट्टऋणानुबंध जुळला तो आकाशवाणीमुळे. हे घडलं जळगाव मुक्कामात.

एका रिमझिमत्या श्रावणातलीच ही गोष्ट आहे. जळगाव मुक्कामातली. आम्ही आकाशवाणीलगत क्वार्टर्समध्येच राहत होतो. एका संध्याकाळी पाऊस मनसोक्त गात होता. मी ऑफिसमधून घरी आलो तर स्नेहा कवितांमध्ये बुडून गेलेली. कविता हा आमच्या दोघांच्याही आवडीचा, आनंदाचा आणि जिवाभावाचा विषय. महानोरांच्या आठवतील तेवढ्या पावसाळी कविता आम्ही मोठ्यानं म्हणत पावसाचा आणि कवितांचा आस्वाद घेत होतो.. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. पाऊस आणि कविता यांत मस्त रमला असताना आता कोण? असा प्रश्न मनात घेऊनच स्नेहाने दार उघडलं आणिती आश्चर्याने जागीच खिळली. दारात साक्षात महानोर उभे होते. पावसाळी संध्याकाळ, कवितांचे मेघ बरसताहेत अशा वातावरणात खुद्द महानोर अनपेक्षित श्रावणसरींसारखे आलेले बघून आम्हाला आभाळ अक्षरशः ठेंगणं झालं.  पुढे जवळजवळ दोन तास महानोरांच्या काव्याच्या धबधब्यात आम्ही मनसोक्त न्हाऊन निघालो. कविता, ओव्या, लोकगीतं आणि कवितेसारख्याच नितळ आठवणी… महानोर त्या संध्याकाळी छान खुलले होते. या अविस्मरणीय आनंदाचा मोरपिसारा तेव्हापासून दर श्रावणात आमच्या मनात अवचित उलगडतो आणि पावसाळी कवितांची रिमझिम आमची मनंटवटवीत करते.

पाऊस येताना घेऊन येतो दरसालच्या वाणी
हिमगर्द वर्षावात भिजून जाणारी पावसाची गाणी
तरंगत जाणाऱ्या डोळ्यांच्या हिंदोळ्यात हळुवार सावनी
सावल्यासावल्यांनी उतरून येणाऱ्या जुन्या आठवणी.. (पावसाळी कविता)

जळगावच्या मुक्कामात महानोरांच्या निगर्वी सहवासाचा लाभ झाला. कौटुंबिक स्नेहबंध जुळले. लवकरच आम्ही त्यांच्या कुटुंबातले झालो. जळगावच्या त्या मुक्कामाचं महानोर यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याची बातमी आली. “पानझड” या त्यांच्या संग्रहासाठी. जळगावकरांचं महानोर दादांवर भारी प्रेम. नुसतं तोंडदेखलं, वरवरचं नाही. खरोखरचं. साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेल्या रानकवीचा गौरव कसा औचित्यपूर्ण झाला ते मी त्यावेळी अनुभवलं. जळगावातल्या मुख्य रस्त्यांवरून महानोरांची बैलगाडीतून जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. नंतर बालगंधर्व खुलेनाट्यगृहात सत्कार समारंभ झाला होता. अलोट गर्दीत. त्यात साहित्यिक, रसिकांबरोबरच शेतकरी, कष्टकरी मोठ्या संख्येनं होते. बाया होत्या, बापडेहोते. त्यांचा कवितेशी संबंध नव्हता; थेट कवीशी होता. कारण महानोर हे निष्ठावंत शेतकरी. स्वतः शेतीत कष्टणारे. अजिंठ्याच्या कुशीतलं पळसखेडहे त्यांचं गाव.

“या शेताने लळा लावला असा असा की
सुखदुःखाला परस्परांशी हसलो-रडलो
आता तर हा जीवच अवघा असा जखडला
मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो..”

त्यांच्या शेतात यशवंतराव चव्हाणांपासून लतादीदींपर्यंत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी पायधूळ झाडली आहे. महानोर यांच्या शेतातील सीताफळांना लताफळ म्हणतात, कारण लतादीदींनी त्या बागेत सीताफळाची रोपं लावली होती. शेती, पाणी, शेतकऱ्यांच्या व्यथा-वेदना यात आपली विधानपरिषदेची आमदारकीही अविस्मरणीय करणारे महानोर यांचं मन स्त्रीच्या आदिम दु:खानंही व्याकुळ होतं. आम्ही जळगावला असतानाच 2000 सालीमहानोर यांचा “तिची कहाणी” हा सर्वस्वी वेगळा कवितासंग्रह प्रकाशित झाला. विजया राजाध्यक्ष यांनी त्याला विवेचक प्रस्तावना लिहिली आहे. यासंग्रहात स्त्री वेदनेच्या 41 कहाण्या आहेत. एका निमित्ताने महानोर आणि सौ. सुलोचना वहिनी यांची एकत्रित मुलाखत मी आणि स्नेहाने घेतली होती. त्यावेळी सुलोचना वहिनी म्हणाल्या होत्या, “यातल्या तीस-बत्तीस कहाण्या मीच त्यांना सांगितल्या आहेत. कारण त्या पळसखेडच्या पंचक्रोशीतल्यामाझ्या मैत्रिणीच. त्यांच्या दुःखाच्या, वेदनेच्या यांच्याकडून कविता झाल्या.” तिची कहाणी मधल्या कवितांवर नंतर मी आकाशवाणी जळगावसाठी तेरा भागांची मालिका केली होती. लेखन मी केलं आणि एकेका कवितेचं सादरीकरण तसंच त्या कवितेच्या नायिकेची व्यथा महानोरांनी बोलकीकेली.

आकाशवाणीतल्या कवींशी, कवी- अधिकाऱ्यांशी,  निवेदक-निवेदिकांशी महानोरांचे जवळचे ऋणानुबंध आहेत. कारण महाराष्ट्रभर त्यांचा संचार असतो. अलीकडेच अक्कलकोटला एका पुरस्काराच्या निमित्ताने ते सोलापूरला येऊन गेले तेव्हा आमच्या घरी आले होते. दिवसा उजेडी कवितांचं चांदणं उमललं होतं. या शब्दवेल्हाळ जातिवंत रानकवीच्या आयुष्यातील काही क्षण आपल्या वाट्याला आले या आनंदाच्या सुगंधानं माझ्या मनाचा गाभारा सदैव दरवळत असतो.

 

सुनील शिनखेडे
सुनील शिनखेडे
कवी, लेखक, माध्यमस्नेही अशा विविध भूमिका सुनील शिनखेडे हे पार पाडत आहेत . ते सध्या आकाशवाणी सोलापूर केंद्रात सहायक संचालकपदी कार्यरत आहेत . त्यांच्या करिअरची सुरुवात नागपुरात १९८० साली पत्रकारितेतून झाली . त्यांनी कविता संग्रह, ललित लेखन, समीक्षा अशी ५ पुस्तकं प्रकाशित केली . यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी "बातमीची विविध क्षेत्रे" या पुस्तकसंचाचं लेखन त्यांनी केले . गेल्या ३० वर्षात आकाशवाणीसाठी विविध क्षेत्रातील  अनेक मान्यवरांच्या  मुलाखती घेतल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

वाचनीय असे काही

error: Content is protected !!