38.3 C
Pune
Saturday, May 18, 2024

साधे विचार क्लिष्ट व्यापार: भांडवल बाजारात व्यवहारांना सुरुवात 

Must read

विनय मोघे
विनय मोघे
विनय मोघे हे व्यवसायाने इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असले तरी ते एक तज्ज्ञ गुंतवणूकदार आहेत, केवळ नोंदणीकृतच नवे तर खाजगी कंपन्यात देखील त्यांच्या अनेक गुंतवणुका आहेत. 

शेयर बाजारात कोणते शेयर्स घ्यावेत आणि कोणते घेऊ नये याच्या टिप्स देणाऱ्या संस्थांचे जगभरात पीकच आलेले आहे. या टिप्स देणार्यांचे अनेक चांगले वाईट अनुभव  गुंतवणूकदारांना येतच असतात. त्यामुळे  आपणच आपला अभ्यास केला तर फसवलं जाण्याची शक्यता  कमी होते त्यामुळे गेल्या २० वर्षात मला जो काही शेयर बाजार कळला त्याबद्दल मी काही गोष्टी या सदरातून मांडत जाणार आहे. या सदरातून कोणत्याही टिप्स देण्याचा माझा मानस नाही. मी मुळात एक इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर, व्यवसायाच्या निमित्ताने अनेक लोकांना भेटायचा योग्य येतो त्यातूनच मी अनेक गोष्टी शिकत गेलो या बाजारा बद्दल, यातून कोणाला काही फायदा झाला तर चांगलच आहे.

आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती घडलेली साधारण ९० च्या दशकात. शेयर बाजाराची रीतच न्यारी होती. मी नुकताच इंजिनियर झालेलो आणि एका फ्लॅटचे कंत्राट मला मिळालेलं, मी त्या सोसायटीत जायचो त्यांच्या घराच्या  शेजारी सीए करणारा एक मुलगा रहायचा, तो आणि त्याची आई शेयर बाजारात तुफान ट्रेडिंग करत असायचे. खर तर हि पुण्यातल्या मध्यवर्ती भागातली एक सामान्य को-ऑपरेटिव सोसायटी होती, सर्वसाधारण नोकरदार लोकं तिथे रहात होती.

मी साधारण दहा वाजता या साईटवर जात असे, माझी स्कुटर पार्क करत असताना मला या मुलाचे रोज सकाळी बोलणे खिडकी बाहेर ऐकू येत असे,  दहा वाजता त्याचे त्याच्या शेयर  ब्रोकरला फोन चालू होत असत , कीर्ती भाई हजार पेंटाफोर लेलो, एनआयआयटी ५००० लेलो , इन्फोसिस ले १००० वगैरे ऑर्डर्स माझ्या कानावर पडत तेव्हा, तेव्हा लैंडलाइनवर ऑर्डर दिल्या जात आणि पार्किंग आणि या घराच्या मध्ये फक्त एकच भिंत होती त्यामुळे मला बरेचदा त्यांचे संवाद ऐकू येत.

बरेच पैसे कमवत असावेत माय लेक. कारण माझे काम चालू होते त्या काळात या कुटुंबाकडे बजाज स्कूटर विकून कायनेटिक आली, मग काही दिवसातच पोरानी स्वत:ची ओमनी व्हॅन घेतली. मुलगा सीए करत होता पण पास काही होत नव्हता. मी पण नवीन नवीनच इलेक्ट्रिक काँट्रॅक्टिंगच्या व्यवसायात आलेलो होतो त्यामुळे मला या सोसायटीत बरीच काम मिळायला लागलेली आणि साधारण वर्षभर मी या सोसायटीत अनेक लोकांकडे खेटे मारत होता  बरेचदा सकाळी माझा कानावर दहा वाजता यांचे फोन वरचे संवाद पडत, मुलाची प्रगती होऊ लागली आणि हळूहळू मुलाचे बरेच मित्र त्याच्या घराच्या आसपास दिसायला लागले, फैन्सी कपडे घालणार्या मुलींचा वावर या सोसायटीत वाढायला लागला, नंतर मग त्या मुलाने लोकांचे पैसे घेउन ते वाढवून देण्याचा धंदा चालू केलेला. एव्हाना माझी पण या कुटुंबाशी ओळख झालेली, त्यांच्या घरात नवीन इलेक्ट्रिकचं काम झाल ते मीच करून दिले, त्या काळात त्याच्या बोलण्यातून विप्रो आणि सत्यम या दोन शेयर्स बद्दल ऐकू यायला सुरूवात झालेली, सकाळी दहा नंतर मी जेव्हा त्यांच्या घरी जात असे तेव्हा मुलगा खूप अस्वस्थ दिसायचा, बहुतेक मोठी पोझिशन असावी त्याची. एव्हाना मला पण या बाजारात खूपच रस यायला आला, विप्रोचा शेयर ९६०० आणि सत्यम ७३०० रूपयांना एक या भावाने मिळत होते….

आणि त्या दिवशी पहिली बातमी आली, बाळासाहेब ठाकरेंना अटक होणार असल्याची, हा मुलगा शेयर बाजारात पोझिशन घेऊन, त्याच्या अमेरिकेतून आलेल्या मित्रासोबत पिक्चरला गेलेला, घरात काम चाललेला म्हणून आई घरात होती पण तेव्हा मुंबई भर अटकेचे पडसाद उमटायला लागले आणि शेयर बाजार गडगडायला लागला, त्या दिवसानंतर अनेक दिवस काही ना काही कारणांनी शेयर बाजाराने पडती दिशा पकडली, कालांतराने केतन पारिखच्या घोटाळ्यांच्या बातम्या यायला लागल्या आणि मार्केट मग पडतच गेलं, या माय-लेकांचा सगळा  व्यवहार मार्जिनवर चालायचा, दर आठवड्याला त्याची आई पोझिशनवर झालेलं नुकसान पगारातून भरून द्यायची, पुढे काही दिवस मी सकाळी ऑफिसला जाताना केविलवाणं संभाषण ऐकायचो, आज देता हूं, कल देता हूं कदाचित ब्रोकर किंवा देणेकर्यांना सांगत असावा, मार्केट फ्री फॉल मध्ये पडतच चाललेलं, मग काही दिवस मी त्यांचं संभाषण सकाळी ऐकायचा प्रयत्न केला पण शांतता होती.

माझे ग्राहक होते तोवर माझे त्या सोसायटीत रोजचं येणं जाणं होते पण त्या घरावरून जाताना एक गोष्ट माझ्या लक्षात यायला लागलेली कि आज काल रोज सकाळी दहा वाजताचे फोनवरचे बोलणे आता बंद झाले आहे, लेलो, बेचव कितना हुवा सगळंच बंद झालेल, मी काही मुद्दाम जाऊन विचारलं नाही पण त्यानंतर काही दिवस मला मोठ्या साईटची काम मिळत गेली, मग ३ महिन्यात माझे त्या सोसायटीत जाणेच झाले नाही

एक दिवस एका परिचितांनी त्याच सोसायटीत नवीन फ्लॅट घेतला म्हणून मला सर्वेक्षणासाठी बोलावलं, मी त्याच फ्लॅट मध्ये गेलो जिथे मला पूर्वी फोनवर बोलायचे आवाज येत असत, मोठ्या कुतूहलाने मी दारावरची बेल वाजवली, माझे परिचित या घरात कसे आले या प्रश्नाच उत्तर जाणून घेणं मला फार महत्वाचं वाटलं, या काकांसाठी मी पूर्वी काम केलेल, त्यामुळे थोडी ओळख नक्कीच होती, मी बोलता बोलता त्यांना विचारले कि इथे पूर्वी राहणारे कुटुंब कुठे गेले ?

तेव्हा चाचा म्हणाले की त्यांनी ते घर विकत घेतलं कारण एका बाईला अर्जंट पैसे पाहिजे होते म्हणून ते घर तिने खूप स्वस्तात विकायला काढलेलं होतं, माझ्याकडे रोख पैसे होते त्यांनी ते विकत घेउन टाकलं, पण पुढचे शब्द माझ्या कानात घुमत राहिले …….  “ती बाई बोललेली तिच्या मुलाला जेल मधून सोडवायला पैशाची गरज आहे…..”

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

वाचनीय असे काही

error: Content is protected !!
×