चीनच्या वुहानमधून उद्भवलेल्या प्राणघातक कोरोना व्हायरसमुळे तीन हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत आणि ८०००० पेक्षा जास्त लोक संक्रमित आहेत. सर्वच उदयोगांना कमी अधिक प्रमाणात करोनाने ग्रासले आहे. त्यातच आयटी (माहिती तंत्रज्ञान उद्योग) येतो. हा उद्योग जागतिक असल्याने ह्याचा परिणाम दीर्घ असणार आहे .
येत्या आर्थिक वर्षात भारताच्या आयटी सेवा क्षेत्रातील वाढ ही एक मोठी आव्हान ठरणार आहे. २०१९-२० व २०२०-२१ ही दोन्ही आर्थिक वर्षे त्यामुळे कमी वाढ व लाभ दर्शवणार हे सांगायला कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही. २००८ मध्ये आलेल्या जागतिक मंदी पेक्षा हे आर्थिक संकट भयानक असणार आहे.
अनेकांचे रोजगार जाणार आहेत व अनेक व्यावसायिक दिवाळखोर होणार आहेत. ह्या अरिष्टाची व त्याच्या भयावह परिणामाची व्याप्ती कुठल्याही सुनामीहून जास्त आहे. ह्याचबरोबर अनेक प्रथितयश तंत्र परिषद रद्द झाल्या आहेत. त्याची थोडक्यात यादी
- मोबाईल वर्ल्ड काँग्रेस फेब्रुवारी रोजी स्पेनच्या बार्सिलोना येथे होणार होती.
- फेसबुक वार्षिक एफ 8 विकासकांची परिषद
- गुगल विकसकांची वार्षिक परिषद
जवळ जवळ सर्व आय टी उद्योगांनी कर्मचाऱ्यांना घरातून किंवा इतर ठिकाणाहून दूरस्थपणे (वर्क फ्रॉम होम ) काम करण्यास सांगितले आहे. अनेक सेमिनार, प्रशिक्षण कार्यक्रम, ग्राहकांच्या भेटी पुढे ढकलण्यात आल्या आहेत अजून एक थोडी वाईट गोष्ट म्हणजे नवीन कर्मचाऱ्यांच्या भरतीवर निश्चितच याचा परिणाम होणार आहे.
पुढील ३ महिन्यांत केवळ अत्यावश्यक आणि अत्यंत कुशल व्यावसायिकांनाच नोकऱ्या मिळतील. पण खरा फटका बसणार आहे इलेक्ट्रॉनिक (विशेषतः मोबाईल फोन) भाग उत्पादनांना. इलेक्ट्रॉनिक्स घटकांच्या उत्पादनात आवश्यक असणा-या वस्तूंचा प्रमुख स्तोत्र (कमी किंमत ह्या कारणामुळे) चीन आहे कोरोना व्हायरसमुळे आता चीनमधून आयात होणा-या वस्तू येईनाशा झाल्या आहेत. त्याचा परिणाम भारतातल्या उद्योगांवर झाला आहे. अनेक ईकॉमर्स उद्योगांनीही मालाच्या किमती वाढवल्या आहेत. गेल्या काही वर्षांत भारतात स्मार्टफोन मॅन्युफॅक्चरिंगने बराच जोर धरला आहे, तरीही हा उद्योग अजूनही अनेक सुट्ट्या भागांच्या पुरवठ्यासाठी चीनवर अवलंबून आहे. भारतात जे काही शिपमेंट्स ह्या तिमाहीसाठी येणार होते ते फेब्रुवारीअखेरीस संपले आहेत. परंतु या महिन्यात चिनी उत्पादन प्रकल्प जवळपास बंद पडल्याने ही समस्या आणखी वाढणार आहे. चीन मधील परिस्थिती रुळावर यायला एप्रिल मे उजाडेल. ह्यामुळे मोबाईल फोन उत्पादनापासून वैयक्तिक संगणक, लॅपटॉप ते प्रिंटरपर्यंत, टीव्ही ते सेटटाॅप बॉक्स आणि इन्व्हर्टर अशी सर्व इलेक्ट्रॉनिक उत्पादने प्रभावीत होत आहेत.ह्या सर्व उपकरणांची किंमत पुढील दोन महिन्यात खूप वाढणार ही शक्यता आहे कारण मागणी व पुरवठा हे गणित व्यस्त आहे.
चीनमध्ये बरीच इलेक्ट्रॉनिक उत्पादने तयार केली जातात (किंवा चिनी विक्रेत्यांकडून काही भाग वापरतात) चीनमधील फॉक्सकॉन आणि पेगाट्रॉन तात्पुरते बंद पडल्यामुळे आयफोन आणि एअरपॉडच्या उत्पादनास संभाव्यत: विलंब होईल अशी अपेक्षा आहे कारण फॅक्टरी कामगार सध्या काम सुरू करण्यास अक्षम आहेत. चीनमध्ये बरीच इलेक्ट्रॉनिक उत्पादने तयार केली जातात (किंवा चिनी विक्रेत्यांकडून काही भाग वापरतात) चीनमधील फॉक्सकॉन आणि पेगाट्रॉन तात्पुरते बंद पडल्यामुळे आयफोन आणि एअरपॉडच्या उत्पादनास संभाव्यत: विलंब होईल अशी अपेक्षा आहे कारण फॅक्टरी कामगार सध्या काम सुरू करण्यास अक्षम आहेत. इतर चिनी ब्रँड (ओप्पो, झिओमी, लेनोवो आणि हुआवे) ह्यांची उत्पादनांची टंचाई निर्माण होईल व ती महागपण होतील.
कोरोना समस्येमुळे सध्या भारतीय उद्योगांना अडचणीतून जावं लागत असलं तरी ही तात्पुरती अडचण असून दीर्घकाळाचा विचार करता त्यातून आपलाच फायदा होणार आहे. फक्त त्यासाठी चीनच्या आयातीला पर्याय शोधावा लागेल. स्थानिक भारतीय लघुउद्योगाला उत्पादनावर जोर देण्यासाठी वेळ आली आहे. सरकारने ह्या उद्योगाला प्रोत्साहित करण्याची ह्याहून चांगली वेळ नाही. “मेक इन इंडिया ” वर भर देऊन भारतात उत्पादन आणि असेंब्ली लाईन स्थापण्यासाठी मायक्रोसॉफ्ट, अँपल, सॅमसंग सारख्या जागतिक दिग्गज उद्योगांना कर सवलती व स्वस्तात जमीन देऊन स्थानिक इलेक्ट्रॉनिक घटक उत्पादित करणे बंधनकारक करायला हवे. तर कोरोना संकट भारतीय इलेक्ट्रॉनिक उद्योगासाठी भविष्यातील संधी बनू शकते. अनेक नवीन उद्योग व रोजगार ह्याच प्रयत्नातून तयार होतील.