fbpx

डॉ अपूर्वा जोशी यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अर्थशास्त्र क्षेत्रातील मानाचा पुरस्कार जाहीर

पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. पुण्याच्या या ख्यातीमागे मानाचे स्थान भूषवणारी व समस्त साहित्यप्रेमींच्या मनात विशेष घर करून बसलेली एक संस्था म्हणजे “महाराष्ट्र साहित्य परिषद”. ही संस्था मराठी भाषा आणि साहित्य यांची जपणूक, विकास व प्रसारासाठी सातत्याने कार्यरत आहे. महाराष्ट्रातील मान्यवर साहित्यिक या संस्थेकडून मिळणाऱ्या सन्मानसोहळ्याची आतुरतेने वाट बघत असतात. २०२४ मधील सन्मानसोहळ्यात डॉ अपूर्वा जोशी यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेद्वारे आयोजित बँक ऑफ महाराष्ट्र लोकमंगल मुख्य शाखा पुरस्कृत अर्थशास्त्र क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार त्यांच्या “आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग हर्षद ते हिंडनबर्ग” या पुस्तकासाठी प्रदान करण्यात येणार आहे.

सत्यम घोटाळ्याच्या अथ पासून इती पर्यंत चा प्रवास लेखिका अपूर्वा जोशी यांनी सामान्य वाचकांना समजेल अशा भाषेत उलगडला आहे. अवघड आणि किचकट अशा आर्थिक संज्ञांचा वापर न करता त्यांनी शक्य तेवढ्या सोप्या भाषेत या गुन्ह्यांमागचे अंतरंग उलगडले आहेत. या पूर्वी भारतात भ्रष्टचाराच्या अनेक केसेस झाल्या होत्या परंतु कंपनी च्या अकाउंट्स मध्ये एवढा मोठा घोटाळा झाला नव्हता. म्हणूनच या प्रकारचे गुन्हे सोडविण्याचा पोलिसांना सुद्धा अनुभव नव्हता. या साठी CBI ने अनेक खासगी फॉरेन्सिक अकाऊंटंट तज्ञांची मदत घेतली. फॉरेन्सिक अकाऊंटंट असलेल्या डॉ अपूर्वा जोशी यांनी घोटाळ्यांमधील अनेक आर्थिक बारकावे या पुस्तकात उलगडून दाखवले आहेत.

सत्यम घोटाळा या भारतातील सर्वात मोठ्या आर्थिक घोटाळ्याची कथा हा या पुस्तकाचा मुळ गाभा आहे. या घोटाळ्यानंतर भारतात अनेक घोटाळे झाले पण त्यांची पाळंमुळं याच घोटाळ्याशी जुळलेली आहेत. कोणत्याही थ्रिलर स्टोरी च्या तोडीस तोड असलेली ही घोटाळ्याची कथा आहे. या मध्ये कंपनीचा, जमिनीची लालसा असलेला एक प्रवर्तक आहे. त्याच व्यक्तिमत्व, त्यानी केलेल्या हिशोबवही मधील गडबडी सांगितल्या आहेत. या कृत्यासाठी त्यानी तंत्रज्ञानाचा कसा वापर करून घेतला हे देखील लिहिलं आहे. वाचकांच्या पसंतीला उतरेल अशीच पुस्तकाची मांडणी आहे.

फॉरेन्सिक अकाऊंटंट डॉ.अपूर्वा जोशी मुळच्या सोलापूरच्या. वाणिज्य शाखा घेतल्यानंतर जे टिपिकल करिअर ऑपशन्स असतात ते त्यांना नको होते आणि त्याच काहीतरी वेगळे करण्याच्या ध्यासातून त्यांना फॉरेन्सिक अकाऊंटिंगची वाट सापडली आणि आता आर्थिक घोटाळेबाजांना त्यांच्यापासून घाबरून राहावं लागतं. देशभरातीलच नव्हे तर जगातील मोठमोठय़ा कंपन्या आणि बँकांमधील आर्थिक गैरव्यवहार त्यांनी शोधून काढले आहेत. सध्या ‘रिस्कप्रो मॅनेजमेन्ट कन्सल्टिंग प्रायवेट लिमिटेड’ या कंपनीच्या त्या संचालिका आहेत. अश्या या महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून पुरस्कृत गुणवान लेखिकेचे पुस्तक नक्की वाचा आणि तुमचे अभिप्राय कळवा.

ऋता कुलकर्णी
ऋता कुलकर्णी
ऋता ही कायदेतज्ज्ञ असून तिने आर्थिक व्यवहारांचे ज्ञान सुलभ होऊन ते सामान्य मराठी माणसांपर्यंत पोहोचावे म्हणून अर्थसाक्षरता नावाचा उपक्रम चालू केला आहे.

वाचनीय असे काही

error: Content is protected !!