fbpx

राम मंदिराचे अर्थशास्त्र भाग २

राम मंदिराच्या भूमिपूजनंतर अयोध्या शहराच्या विकासाला प्रारंभ झाला. २२ तारखेला श्री रामासोबतच अयोध्येमध्ये अनेक विकसनशील कार्यांचा देखील प्रवेश होणार आहे. मंदिरे आणि विकास हे पारंपारिकपणे विरुद्ध मानले जातात परंतु ते प्रत्यक्षात परस्पर समावेशक असू शकतात हे अयोध्येतील श्री राम मंदिराने सिद्ध केले आहे. श्री राम मंदिर हा केवळ धर्माच्या नाही तर व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेचाही उत्कर्षाचा भाग आहे. श्री राम मंदिरामुळे अर्थव्यवस्था कशी वाढू शकते हे आपण बघू.

अयोध्येत सुरू होणारे राम मंदिर हे देशातील कोट्यवधी लोकांच्या श्रद्धास्थानाबरोबरच उत्तर प्रदेशाच्या विकासासाठी आणि अर्थव्यवस्थेसाठीही ते महत्वाचं केंद्र आहे. राम मंदिरामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. यामुळेच पायाभूत सुविधांपासून ते हॉस्पिटॅलिटी, एफएमसीजी क्षेत्रापर्यंतच्या कंपन्या या क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत. श्री राम मंदिराच्या उदघाटनानंतर जगभरातील पर्यटन आणि पर्यटनपूरक व्यवसायांमुळे लोकसंख्येमध्ये ८-१० पट वाढ होईल असा अंदाज वर्तवला गेला आहे.

उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येला ‘ग्लोबल मेगा टुरिस्ट सिटी’ बनवण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिर परिसराव्यतिरिक्त केंद्र आणि राज्य सरकारने अयोध्येची वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी अनेक प्रकल्पांना निधी दिला आहे. यामुळे अयोध्या, आजूबाजूच्या क्षेत्रासाठी एक मोठे आर्थिक केंद्र बनेल आणि तेथील अर्थशास्त्र बदलेल.

येणाऱ्या पर्यटकांचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी अयोध्येपर्यंत मोठे वाहतुकीचे नेटवर्क उभारणे  महत्वाचे होते. म्हणून रेल्वे स्टेशन आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाची तरतूद करण्यात आली. या प्रकल्पाचे उदघाटन काही दिवसांपूर्वीच झाले आहे. याबरोबरच अयोध्या क्षेत्रामध्ये १५,००० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन झाले आहे. या सर्व पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे अयोध्येला आधुनिक स्वरूप प्राप्त होईल.

८५,००० कोटी रुपयांची तरतूद

राम मंदिराच्या उद्घाटनानंतर दररोज सुमारे ३  लाख पर्यटक अयोध्येत येण्याची अपेक्षा आहे. इतक्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी येथील पुनर्विकासावर सुमारे ८५ हजार कोटी रुपये खर्च केले जातील असा अंदाज आहे. राम मंदिर उद्घाटनानंतर अयोध्येच्या एका नागरिकामागे १० पर्यटकांचे प्रमाण असेल. त्यामुळे याठिकाणी शासकीय गेस्ट हाऊस, हॉटेल विकसित करण्यात येणार आहेत. हे प्रत्येक प्रकारच्या पर्यटकांच्या गरजा पूर्ण करतील. अयोध्येच्या मास्टर प्लॅन-२०३१ नुसार त्याचा पुनर्विकास १० वर्षात पूर्ण होईल. अयोध्येला जागतिक शहर बनवण्यासाठी हे प्रयत्न केले आहेत.

अयोध्येतील पायाभूत सुविधा आणि पर्यटन सुविधा आराखड्यात ८७५ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचे विकास कार्य योजिले आहे. मुख्य अयोध्या शहरासाठी ३१.५ किलोमीटर व बाहेरील भागातील नियोजित शहरासाठी १३३ किलोमीटर क्षेत्रफळाचा देखील समावेश केलेला आहे. या विकासाच्या आराखड्यात सर्व २१ व्या शतकातील आधुनिक सुविधांचा समावेश असेल. आधुनिक सुविधांबरोबरच धार्मिक इतिहास आणि संस्कृतीला महत्व देण्याऱ्या सजावटीचा देखील समावेश असेल.

केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक संस्था अयोध्येला नवे रूप देण्यासाठी कार्यरत आहेत. यासाठी सुमारे ३१,६६० कोटी रुपयांचे बजेट ठेवण्यात आले आहे. उत्तर प्रदेश सरकार ७,५०० कोटी रुपयांच्या सुमारे ३४ प्रकल्पांवर काम करत आहे. NHAI १०,००० कोटी रुपयांचे प्रकल्प हाताळत आहे. तर विमानतळ, रेल्वे आणि महामार्गाचा विकास स्वतंत्रपणे होत आहे.

पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांबरोबरच अयोध्येत खाजगी गुंतवणूकदार देखील दाखल होत आहेत. जसे की, ताज, रॅडिसन आणि आयटीसी सारखे लक्झरी ब्रँड अयोध्येत हॉटेल्स उघडण्यासाठी येत आहेत. तर ओयो सारखे बजेट हॉटेल ब्रँड्सही येथे पोहोचले आहेत. त्याचबरोबर बिसलेरी, पार्ले-जी आणि कोका-कोला या कंपन्याही या भागातील मागणी पूर्ण करण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात प्लांट उभारण्यावर भर देत आहेत. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर आजूबाजूच्या भागात आर्थिक घडामोडी वाढतील. याद्वारे अर्थव्यवस्थेमध्ये पैसा आला तर व्यवसाय करण्यापासून रोजगारापर्यंतच्या संधी उपलब्ध होतील. एकूणच राम मंदिरामुळे धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगती होण्यास हातभार लागेल.

सारंग खटावकर
सारंग खटावकर
सारंग खटावकर हे मराठी भाषेतील अर्थ साक्षरतेचे जनक मानले जातात. त्यांनी वित्त विषयातील क्लिष्ट संज्ञा सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी मोठे योगदान दिले आहे.

वाचनीय असे काही

error: Content is protected !!