प्रसाद खांडेकर आणि श्लोक खांडेकर एकत्र येणार ‘चिकी चिकी बुबूम बुम’मध्ये
वडील आणि मुलाचे नाते हे नेहमीच खास असते. मुलांसाठी वडील हे नेहमीच आदर्श आणि प्रेरणास्थान असतात. चित्रपटसृष्टीतही अनेकदा बाप-लेक जोडी एकत्रित झळकलेली पाहायला मिळते. आता या यादीत आणखी एका जोडीची भर पडणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद महादेव खांडेकर आणि त्यांचा मुलगा श्लोक खांडेकर ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या मराठी चित्रपटातून एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. विशेष म्हणजे, या चित्रपटातून श्लोक अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे.
श्लोकची दमदार एंट्री
फक्त आठ वर्षांचा आणि सध्या दुसरीत शिकणारा श्लोक खांडेकर याने या चित्रपटात जॉनी लिव्हर पाध्ये ही व्यक्तिरेखा साकारली आहे. त्याची मजेशीर भूमिका प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहे. अत्यंत थंड हवामानात स्विमिंग पूलमधील शूटिंग असो किंवा स्केटिंगवरचा जबरदस्त सीन, श्लोकने हे सर्व अगदी सहजतेने साकारले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने वडील आणि मुलगा पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र काम करत असल्याने प्रसाद खांडेकर यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. ‘लेकाच्या अभिनय क्षमतेचा मला अभिमान आहे आणि त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याचा अनुभव खूप खास वाटतो,’ असे ते सांगतात.
नुकताच ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या चित्रपटाचा धमाल ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट मित्रांच्या एका मजेशीर रियुनियनवर आधारित आहे, ज्यामध्ये काही विचित्र प्रसंगांमुळे मित्रांची फजिती होते आणि त्यातूनच विनोद निर्माण होतो. या चित्रपटाची निर्मिती नारकर फिल्म्स अँड एंटरटेनमेंटने केली आहे, तर आयडियाज द एंटरटेनमेंट कंपनी प्रस्तुत करत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद महादेव खांडेकर यांनीच केले आहे. सुनील नारकर हे चित्रपटाचे निर्माते असून, सहनिर्मितीची धुरा सेजल दिपक पेंटर आणि प्रसाद खांडेकर यांनी सांभाळली आहे. पटकथा आणि संवाद लेखन प्रथमेश शिवलकर व प्रसाद खांडेकर यांचे आहे, तर छायांकन गणेश उतेकर यांनी केले आहे.
‘चिकी चिकी बुबूम बुम’ हा धमाल, मस्ती आणि हसण्याचा जबरदस्त डोज देणारा चित्रपट २८ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मनोरंजनाची पर्वणी असलेल्या या चित्रपटासाठी मराठी चित्रपटप्रेमी उत्सुक आहेत.