कॉफी आणि नाट्यकला यांचा अनोखा संगम
कॉफी प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे! चहाप्रेमींची संख्या जास्त असली, तरी कॉफीच्या शौकिनांची संख्याही काही कमी नाही. मग ती कोल्ड असो वा हॉट! कॉफीचा खरपूस दरवळ जसा घरभर पसरतो, तसाच आता रंगभूमीवरही कॉफीचा दरवळ पसरणार आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर यांनी ‘फिल्टर कॉफी’ हे नवीन नाटक रंगभूमीवर आणले आहे. अद्वैत आणि अश्वमी थिएटर्स प्रकाशित महेश वामन मांजरेकर सादर करीत असलेली ही तजेलदार कॉफी ६ एप्रिलला रंगभूमीवर येणार आहे.
फिल्टर कॉफी मधील कलाकारांची दमदार फळी
रितीशा प्रोडक्शन्स निर्मित महेश वामन मांजरेकर लिखित दिग्दर्शित ‘फिल्टर कॉफी’ या नाटकाचे निर्माते दिलीप माधव जगताप असून सहनिर्माते राहुल भंडारे आहेत. या नाटकात विराजस कुलकर्णी, विक्रम गायकवाड, कुणाल मेश्राम, अंकिता लांडे आणि उर्मिला कानिटकर यांच्या भूमिका आहेत.
महेश मांजरेकरांची जुनी इच्छा पूर्ण
या नाटकाविषयी बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, “मला हे नाटक १९९२ साली करायचे होते. त्यावेळी ते शक्य झाले नाही. आता हे नाटक मी आणले असून ते स्वतः दिग्दर्शित करतो आहे. कॉफीच्या गडद रंगाप्रमाणे या नाटकाची गडद शेड नाट्य रसिकांना अनुभवायला मिळेल. हे एक सस्पेन्स थ्रिलर नाटक आहे. मराठी नाट्यरसिक प्रगल्भ आहे. वेगळ्या संहितांचे स्वागत त्यांनी नेहमीच केले आहे. माझ्या सोबतीने निर्माते, कलाकार आणि तंत्रज्ञ अशा आम्ही सगळ्यांनी मिळून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आणलेली कडू गोड चवीच्या ‘फिल्टर कॉफी’ची ट्रीट नाट्यरसिक नक्कीच एन्जॉय करतील असा विश्वास मला आहे.”
विराजस कुलकर्णी आणि उर्मिला कानिटकर यांची प्रतिक्रिया
अभिनेता विराजस कुलकर्णी या नाटकाविषयी बोलताना म्हणाला, “वैविध्यपूर्ण नाटकं मराठी रंगभूमीवर येत आहेत. त्याला नाट्यरसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. रंगभूमीमुळे मराठी चित्रपटसृष्टीला एक वेगळी ओळख मिळते आहे. नाटक हे नेहमी दिग्दर्शकाचे मानले जाते. दिग्दर्शकाच्या नावामुळे नाट्यरसिक नाटक पाहायला येतात. महेश मांजरेकर यांचे नाव त्यात अग्रस्थानी आहे. त्यांच्या कलाकृती पाहत मी मोठा झालो आहे. त्यांच्या सोबत काम करण्याची संधी दवडणे शक्य नव्हते. आम्ही घेऊन येत असलेले हे नाटक थ्रिलर जॉनरचे असून काहीतरी वेगळे नाट्यरसिकांना पाहायला मिळणार याची खात्री देतो.”
अभिनेत्री उर्मिला कानिटकर म्हणाली, “माझी ही पहिली नाट्यकृती असून महेश मांजरेकर यांच्यासारख्या दिग्ग्ज दिग्दर्शकासोबत काम करणे ही माझ्यासाठी पर्वणी होती. या नाटकाच्या निमित्ताने माझी नाटक करायची इच्छा पूर्ण झाली याचा आनंद आहे.”
तंत्रज्ञांची साथ
‘फिल्टर कॉफी’ या नाटकाचे सहलेखन अभय देखणे यांनी केले असून सहाय्यक दिग्दर्शक सूरज कांबळे आहेत. संगीताची जबाबदारी हितेश मोडक यांनी सांभाळली आहे. प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची, नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे आणि वेशभूषा लक्ष्मण येलप्पा गुल्लार यांची आहे. दीपक कुलकर्णी यांचे या नाटकासाठी विशेष सहकार्य लाभले आहे.