मराठी सिनेसृष्टीला ऐतिहासिक आणि आध्यात्मिक चित्रपटांची मोठी परंपरा आहे. या परंपरेत आता ‘राष्ट्रगुरु समर्थ रामदास’ या चित्रपटाची भर पडणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. हा चित्रपट केवळ एक ऐतिहासिक कलाकृती नसून, समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा आधुनिक काळात जागर करणारा आहे.
दहा वर्षांचे स्वप्न आणि अथक मेहनत
या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध व्हिएफएक्स डिझायनर अनिकेत साने यांनी केले असून, कल्पना फिल्म्स अँड व्हिएफएक्स स्टुडिओने याची निर्मिती केली आहे. अनिकेत साने यांनी ‘जंगलबुक’सारखा भव्य चित्रपट मराठीत बनवण्याचा ध्यास घेतला होता. तब्बल दहा वर्षांच्या अथक संशोधन आणि परिश्रमानंतर हे स्वप्न साकार झाले आहे. रामदास स्वामींच्या जीवनाचा आणि ‘दासबोध’ ग्रंथाचा सखोल अभ्यास करून या चित्रपटाची कथा साकारण्यात आली आहे.
अनिकेत साने यांनी या प्रकल्पासाठी मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांशी संपर्क साधला, पण अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने त्यांनी स्वतःच दिग्दर्शनाची धुरा सांभाळण्याचा निर्णय घेतला. या प्रवासात त्यांना अनेक अडचणी आल्या, पण त्यांचा निर्धार कायम राहिला.
व्हिएफएक्स स्पेशलिस्टचा ऐतिहासिक ‘राष्ट्रगुरु समर्थ रामदास’ चित्रपट
अनिकेत साने हे व्हिएफएक्स डिझायनिंगमधील एक मोठे नाव आहे. ‘सनी’, ‘झिम्मा २’, ‘नवरा माझा नवसाचा २’ यांसारख्या अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांसाठी त्यांनी व्हिएफएक्स केले आहे. याशिवाय ‘गांधी टॉक्स’, ‘सनक’, ‘केरला स्टोरी’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये आणि ‘दिल बेकरार’, ‘सनफ्लॉवर १’ या वेबसिरीजमध्येही त्यांनी योगदान दिले आहे.
व्हिएफएक्समधील आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करून अनिकेत साने यांनी या चित्रपटात भव्य व्हिएफएक्स आणि ऐतिहासिक दृश्ये साकारली आहेत. चित्रपटाच्या टीझरमध्ये सज्जनगड, काळाराम मंदिर, जांब समर्थ आणि इतर ऐतिहासिक स्थळे व्हिएफएक्सच्या माध्यमातून जिवंत करण्यात आली आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना १६व्या शतकातील वातावरणाचा अनुभव मिळेल.
राष्ट्रगुरु समर्थ रामदास यांच्या विचारांचा आधुनिक जागर
हा चित्रपट केवळ इतिहास सांगत नाही, तर समाजाला दिशा देण्याचे काम करतो. समर्थ रामदास स्वामींची शिकवण, श्रवण भक्तीचे महत्त्व, कर्मयोग आणि भक्तीची संकल्पना या चित्रपटात प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.
चित्रपटाबद्दल बोलताना अनिकेत साने म्हणाले, “हा केवळ चित्रपट नाही, तर समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा आधुनिक काळात जागर आहे. त्यांनी समाजासाठी दिलेले योगदान आणि त्यांची शिकवण आजच्या तरुणांपर्यंत पोहोचवणे हा माझा मुख्य उद्देश आहे.”
समर्थ रामदास स्वामींच्या विचारांना नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारा हा चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर येत आहे. या ऐतिहासिक प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.