fbpx

होर्मुज सामुद्रधुनी: जागतिक व्यापारासाठीचा संकटग्रस्त दुवा

जागतिक व्यापार म्हणजेच ग्लोबल ट्रेड हा कोणत्याही अर्थव्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ आहे. प्राचीन काळापासून व्यापारासाठी मोठ्या प्रमाणावर समुद्रमार्गांचा वापर केला जातो. अगदी प्राचीन व्यापारमार्ग असो किंवा मध्ययुगीन सागरी व्यापार असो, समुद्राने नेहमीच जागतिक व्यापाराला आधार दिला आहे. तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी आजही जागतिक व्यापाराचे ८० ते ९० टक्के वाहतूक सागरी मार्गांद्वारे होते. हे मार्ग स्वस्त, विश्वासार्ह आणि जागतिक स्तरावर उत्तम प्रकारे जोडलेले असल्याने त्यांचे महत्त्व कायम टिकून आहे.

व्यापारासाठी मोठ्या जहाजांचा व कंटेनरचा वापर केला जातो. हे जहाजे सागरी मार्ग म्हणजेच मारिटाइम रूट्स वापरतात. या मार्गांवर जाताना त्यांना विविध भौगोलिक व मानवनिर्मित जलमार्ग लागतात. यात नैसर्गिक सामुद्रधुनी, चॅनेल्स आणि पाणथळ प्रदेश महत्त्वाचे ठरतात. स्ट्रेट्स म्हणजे दोन समुद्रांना जोडणारे अरुंद मार्ग. उदाहरणार्थ, मध्यपूर्वेतील होर्मुज सामुद्रधुनी, जी पर्शियन आखात आणि ओमान आखाताला जोडते आणि पुढे अरबी समुद्राला मिळते.

होर्मुज सामुद्रधुनी: जागतिक व्यापारातील महत्त्वाचा दुवा

होर्मुज सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाची व निर्णायक सागरी chokepoint मानली जाते. याचे प्रमुख कारण म्हणजे या सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेलवाहतुकीचा मोठा वाटा. जगातील जवळपास २१ टक्के क्रूड ऑइल म्हणजेच कच्चे तेल या मार्गाने वाहिले जाते. ही सामुद्रधुनी पर्शियन आखाताला ओमान आखाताशी जोडणारा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे या मार्गाला कोणताही पर्याय उपलब्ध नाही.

होर्मुज सामुद्रधुनीच्या आसपास इराण, इराक, सौदी अरेबिया, ओमान, कतार, कुवैत, बहरिन, आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) असे आठ देश आहेत. या प्रदेशातील तेलसंपत्तीमुळे हा भाग जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तसेच, या मार्गाच्या बंदीमुळे संपूर्ण जागतिक व्यापार विस्कळीत होऊ शकतो.

या सामुद्रधुनीवरून तेलवाहतूक करताना मोठ्या सागरी जहाजांना अरुंद पाणमार्गातून जावे लागते. हा मार्ग केवळ अरुंदच नाही, तर भूराजकीय संघर्षांच्या कारणाने नेहमीच तणावात राहतो. त्यामुळे हा मार्ग जागतिक राजकारण आणि सुरक्षा धोरणांचा केंद्रबिंदू ठरतो.

सामुद्रधुनीतील संघर्ष आणि सुरक्षा आव्हाने

होर्मुज सामुद्रधुनीतील संघर्ष १९८७ साली सुरू झाला, जेव्हा इराण-इराक युद्धाच्या काळात बगदादने इराणच्या जहाजांवर हल्ला केला. या घटनेला “टँकर वॉर” असेही संबोधले जाते. तेव्हापासून या सामुद्रधुनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध देशांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे.

आजही इराणचा या सामुद्रधुनीवर प्राबल्य आहे. अमेरिकेच्या विरोधात इराणने अनेक वेळा ही सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी दिली आहे. यामुळे जागतिक व्यापाराला मोठा धक्का बसू शकतो. अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे या भागात सतत युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण होते.

२०१९ मध्ये अमेरिकेने ट्रम्प प्रशासनाच्या नेतृत्वाखाली इराणी अणुकरारातून (Iran Nuclear Deal) माघार घेतली. त्यामुळे होर्मुज सामुद्रधुनीतील तणाव शिगेला पोहोचला. त्या वेळी संपूर्ण जगभरात अमेरिका-इराण युद्ध होईल का, याबद्दलची भीती होती. याचप्रमाणे, २०२० साली इराणचे लष्करी प्रमुख कासिम सोलेमानी यांची अमेरिकेने ड्रोन हल्ल्यात हत्या केल्यानंतर परिस्थिती आणखीनच गंभीर झाली.

सध्या इस्रायल-हामास आणि इस्रायल-लेबनॉन संघर्षामुळे या सामुद्रधुनीतील तणाव आणखी वाढला आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील जुना तणाव, तसेच मध्यपूर्वेतील अशांतता यामुळे हा भाग नेहमीच संवेदनशील राहिला आहे.

चीन आणि भारतासाठी होर्मुज सामुद्रधुनीचे महत्त्व

चीनसाठी महत्त्व:

चीनला ५० टक्क्यांहून अधिक तेलसाठा आखाती देशांतून मिळतो. त्यामुळे होर्मुज सामुद्रधुनीचा मार्ग चीनसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. चीनने आपल्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI) उपक्रमांतर्गत या मार्गाचा समावेश करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे चीनने या मार्गावर आपला प्रभाव प्रस्थापित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे.

भारतासाठी महत्त्व:

भारतासाठी होर्मुज सामुद्रधुनी आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. भारताचा कच्च्या तेलावर मोठ्या प्रमाणावर अवलंब आहे, आणि ते प्रामुख्याने आखातातील देशांतून आयात केले जाते. याशिवाय, आखातातील देशांमध्ये राहणाऱ्या प्रवासी भारतीयांकडून भारताला मिळणाऱ्या रेमिटन्सेस (remittances) मुळे या भागाचे महत्त्व अधिक वाढते.

होर्मुज सामुद्रधुनी जागतिक व्यापारासाठी अत्यंत निर्णायक आहे. या मार्गावरून होणारी तेलवाहतूक, राजकीय संघर्ष, आणि सागरी नियंत्रणासाठी सुरू असलेली स्पर्धा यामुळे हा भाग नेहमीच चर्चेत राहतो.

ऋता कुलकर्णी
ऋता कुलकर्णी
ऋता ही कायदेतज्ज्ञ असून तिने आर्थिक व्यवहारांचे ज्ञान सुलभ होऊन ते सामान्य मराठी माणसांपर्यंत पोहोचावे म्हणून अर्थसाक्षरता नावाचा उपक्रम चालू केला आहे.

वाचनीय असे काही

error: Content is protected !!