मायक्रोसॉफ्ट विंडोज मध्ये आज सकाळी अचानक बिघाड झाल्याने जागतिक स्तरावर अनेक सेवा विस्कळीत झाल्याचा अभूतपूर्व प्रसंग आज पाहण्यात आला.
क्राऊडस्ट्राईक या संगणकीय सुरक्षा प्रदान करणाऱ्या संस्थेने मायक्रोसॉफ्टच्या सेवा घेणाऱ्या ग्राहकांना दिलेल्या सॉफ्टवेयर मध्ये बदल करत असताना चुकीचं कोड लिहल्याने हा गदारोळ घडून आल्याचे कंपनीच्या सूत्रांनी जाहीर केले. या अडचणीमुळे जगभरातील अत्यावश्यक सेवांवर विपरीत परिणाम झाले आहेत. बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात ऑनलाइन बँकिंग सेवा बंद पडल्या आहेत तर विमान वाहतूकही विस्कळीत झाली आहे.
ग्राहकांना त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करणे अशक्य झाल्याने मोठ्या प्रमाणात संताप आणि चिंता निर्माण झाली आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांतील बँकांमध्ये अशाच प्रकारच्या अडचणींची नोंद झाली आहे, ज्यावरून या व्यत्ययाची जागतिक व्याप्ती अधोरेखित होते.
भारतीय बँकांची नियामक संस्था असलेल्या रिझर्व्ह बँकेने एक परिपत्रक जारी करून मायक्रोसॉफ्टमुळे भारतातल्या कोणत्याच सेवा बंद ना पडल्याची ग्वाही दिलेली आहे. त्यामुळे भारतात क्राऊडस्ट्राईक मुळे झालेल्या गोंधळाचा विशेष परिणाम जाणवला नाही
वित्तीय क्षेत्रात झालेल्या व्यत्ययाबरोबरच, जगभरातील विमानतळांवर विमानं जमीनस्वस्थ झाल्याची वृत्त आहेत, ज्यामुळे प्रवासी वाहतुकीत मोठाली गडबड उडाली आहे. भारतातील एका वापरकर्त्याने हाताने लिहिलेल्या बोर्डिंग पासची छायाचित्र पोस्ट केली आहे आणि ती याच अडचणीमुळे मिळाल्याची असल्याचे म्हटले आहे.
अमेरिकेतही आपत्कालीन सेवांचे संगणक प्रभावित झाल्याची वृत्त आहे. ऑरेगॉन राज्यात 911 सेवा बंद पडल्याची उदाहरणे आहेत.