आकाशवाणीतले आठवणीतले दिवस ६ मध्ये जळगाव स्टेशन च्या कालावधीतले अनुभव कथन करतोय.
सोलापूरचे माझे एक ज्येष्ठ सुह्रुद नारायणकाका कुलकर्णी मला नेहमी म्हणतात की, ‘सुनील, तुम्ही सरकारी नोकरीत पेढे खाता.’ त्यांच्या याम्हणण्याचा लक्ष्यार्थ असा की “आध्यात्मिक अनुभूतीचा अपरिमित आनंद तुम्हाला तुमच्या नोकरीच्या कामात सहज मिळतो. हे दुर्मिळ आणि दैवदुर्लभआहे.” मी क्षणभर विचार केला तेव्हा त्यांचं म्हणणं मला पटलं. असं घडलंय आणि घडतंय खरं. सध्या मी सोलापूरला विठोबा, अक्कलकोट स्वामी, तुळजाभवानी, दत्तमहाराज गाणगापूर, श्री सिद्धेश्वर महाराज, शंकर महाराज, शुभराय महाराज, दंडवते महाराज यांच्या पुण्यपावन संतभूमीत त्यांच्याकृपाशीर्वाद-सान्निध्यात राहतोय म्हणूनच केवळ नाही, तर आकाशवाणीतल्या माझ्या वेगवेगळ्या टप्प्यांवरच्या वाटचालीतही याची प्रचिती मी घेतलीआहे.
जळगाव मध्ये 1998 ते 2002 अशी चार वर्षं होतो. चार वर्षे पूर्ण होत आली असतानाच कां कोण जाणे मला असं वाटलं की आता इथून अन्यत्र बदलीझाली तर बरं. त्यावेळी मुंबईला आमचे पश्चिम विभागाचे उपमहासंचालक श्री. विजय दीक्षित हे होते. तिमाही मीटिंगच्या निमित्ताने त्यांची भेट होतअसे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने आणि विचारांनी मी तेव्हा प्रभावित झालो होतो. माझ्यासारखेच महाराष्ट्रातील इतरही काही अधिकारी होते. मळलेल्यावाटेवरून वर्षानुवर्षे चालत राहण्यापेक्षा नवी वाट निर्माण करण्याचे दीक्षित साहेबांचे प्रयत्न आम्हा सर्वांना आवडायला लागले. ते होते उत्तर प्रदेश-दिल्लीचे; परंतु अल्पावधीतच त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक, पौराणिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि साहित्यिकसमृद्धतेचा, परंपरांचा सखोल अभ्यास केला. इतका की ते या मातीतलेच वाटावेत. सद्गुरूकृपेने त्यांची आध्यात्मिक साधनाही उत्तम होती आणि आहे. निवृत्तीनंतर ते आता मुंबईतच स्थायिक झाले आहेत.
… तर जळगाव मधील माझ्या वास्तव्याची चार वर्षं पूर्ण होण्याच्या बेतात असतानाच जळगावला आयोजित आमच्या कार्यक्रम समन्वय समितीच्यातिमाही प्रादेशिक बैठकीसाठी दीक्षित साहेब आले. बैठक व्यवस्थित पार पडली. नंतर त्यांना अजिंठा बघायचा होता म्हणून अजिंठ्याला गेलो. मीत्यांच्या सोबत होतो. त्याच प्रवासात मी त्यांना माझा बदलीचा मानस सांगितला. क्षणभरच विचार करून ते म्हणाले, “कार्यकाल पुरा होतेही निवेदनभेज दो। नाशिक जाना चाहते हो? आप के लिए वहां बहुत काम है।” पडत्या फळाची आज्ञा मानून मी मीटिंगनंतर नाशिकच्या बदलीसाठी रिप्रेझेंटेशनपाठवून दिलं आणि लगेच तीन महिन्यांत माझी नाशिकच्या बदलीची ऑर्डर आली. 14 नोव्हेंबर 2002 ला मी नाशिक आकाशवाणी केंद्रात रुजू झालो.
नाशिकच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक वातावरणाचा मला मोह होताच. शिवाय नदी संस्कृती. गोदावरीकाठचं हे पुण्यपावन तीर्थस्थळ. आकाशवाणी नाशिक केंद्रात तेव्हा उत्तम कोळगावकर हे केंद्र संचालक होते. त्यांच्यासोबत मी जळगावला काम केलं होतंच; पण मराठीतले उत्तमकवी म्हणून त्यांची ओळख होती. माझीही कवी म्हणून त्यांना ओळख होती. मी नाशिकमध्ये लगेच रुळलो. अवघ्या दोन महिन्यानंतर म्हणजे जानेवारी2003 ला नाशिकला तिमाही मीटिंग ठरली. याच बैठकीत दीक्षित साहेबांनी आकाशवाणीच्या इतिहासातील अभूतपूर्व क्रांतिकारी निर्णय घेतला तोम्हणजे जुलै -ऑगस्ट 2003 मध्ये नाशिक त्र्यंबकेश्वरला होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची आकाशवाणीवरून लाईव्ह कॉमेंट्री.
महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून एकाच वेळी हे प्रत्यक्ष वर्णन ऐकायचं आणि नाशिकच्या तीन तसंच त्र्यंबकेश्वरच्या तीन अशा सहा शाही पर्वण्यांची प्रत्यक्षअनुभूती श्रोत्यांना घडवायची. महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या आकाशवाणीच्या इतिहासात असं काही प्रथमच घडत होतं, घडणार होतं. कुठल्याहीधार्मिक सोहळ्यात आकाशवाणीच्या अशा प्रत्यक्ष आणि थेट सहभागाची कल्पनाच त्यापूर्वी कुणा वरिष्ठ अधिकाऱ्याने मांडली नव्हती त्यामुळे तीप्रत्यक्षात येण्याचा प्रश्नच नव्हता. विजय दीक्षित साहेबांनी दिल्लीच्या आकाशवाणी महासंचालनालयाकडून रीतसर परवानगी मिळवून या कामाचीमुहूर्तमेढ रोवली आणि महाराष्ट्रातील आकाशवाणी परिवारात आगळ्या आनंदाच्या लहरी निर्माण झाल्या.
त्या मीटिंगनंतर मुंबईच्या झोनल ऑफिसकडून पत्रं, फँक्स, फोन यांद्वारे नियोजनाचे आराखडे तयार होऊ लागले. मुंबई आकाशवाणी केंद्रातीलकार्यक्रम समन्वय अधिकारी मेधा कुलकर्णी आणि नाशिकचा मी आमच्या दोघांवर दीक्षित साहेबांनी या कुंभमेळा पर्वणीच्या महत्त्वाकांक्षी थेटप्रसारणाची जबाबदारी सोपवली. पाच-सहा महिन्यांपूर्वी जळगावला माझा बदलीचा मानस ऐकून मला “नाशिक जाना चाहते हो? आप के लिए वहांबहुत काम है”.. अशी विचारणा करणाऱ्या दीक्षित साहेबांच्या बोलण्याची मला एका क्षणी आठवण झाली आणि मी मनोमन थरारलोच. माझंनाशिकला येणं हा दैवी संकेतच होता जणू !!
या कुंभमेळ्याची तयारी आणि प्रत्यक्ष अनुभूती याविषयी आता पुढच्या लेखांकात.