भारतीय क्रिप्टो एक्सचेंज क्षेत्रातील एका धक्कादायक घटनेमध्ये, प्रमुख भारतीय क्रिप्टो एक्सचेंज असलेल्या वजीरेक्स ची Safe Multisig वॉलेट हॅक झाल्याची बातमी समोर आली आहे. या हल्ल्यात सायबर चोरट्यांनी तब्बल $234.9 दशलक्ष इतक्या रकमेची चोरी केलेली आहे.
वेब३ सुरक्षा फर्म म्हणून ज्ञात असलेल्या Cyvers ने या हल्ल्याची माहिती सर्वप्रथम दिली. त्यांनी वजीरेक्सच्या Ethereum वरील Safe Multisig वॉलेटमध्ये “संशयास्पद व्यवहार” आढळल्याचे सांगितले. या हल्ल्यात हॅकरने वॉलेटमधील रक्कम नवीन वॉलेटमध्ये ट्रांसफर केली आणि नंतर त्या रकमेचे Ether मध्ये रूपांतर केले.
चोरी झालेल्या रकममध्ये Tether (USDT), Pepe (PEPE) आणि Gala (GALA) सारख्या क्रिप्टोकरन्सींचा समावेश होता. हल्लेखोरांनी या सर्व क्रिप्टोकरंसीज विकून सर्वप्रथम त्याचे Ether मध्ये रूपांतर केले आहे. या प्रक्रियेला मिक्सिंग असे देखील म्हंटले जाते, हे केल्याने शोधकर्त्यांना या चोरीचा माग काढणे कठीण होईल असा त्यांचा होरा असू शकतो.
या हल्ल्यामुळे वजीरेक्सचे नोंदणीकृत टोकन असलेल्या WRX ची किंमत पंधरा टक्क्याने घसरली आहे. तसेच, या हल्ल्यामुळे गुंतवणदारांमध्ये मोठी असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
वजीरेक्स ने अद्याप या हल्ल्यावर अधिकृत निवेदन दिलेले नाही. परंतु, या हल्ल्यामुळे भारतीय क्रिप्टो क्षेत्राची सुरक्षा आणि नियमनाची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.