fbpx

सोन्यात गुंतवणूकीचे ४ आकर्षक पर्याय

सोन्यात गुंतवणूक ही भारतात अनेक पिढ्यांपासून एक लोकप्रिय गुंतवणूक आहे. खास करून भारतीय महिलांसाठी सोनेखरेदी हा जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. लग्नसराइ ते मोठा समारंभ सोनेखरेदीसाठी आजही भारतीय बाजारात गर्दी होतेच. त्यातच आपल्या संस्कृतित साडेतीन मुहुर्ताचे एक वेगळे महत्व आहे त्या दिवशी तर सराफा बाजार अक्षरश: तुडूंब भरलेले असतात.सोने हे महागाईपासून बचाव करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. दीर्घ कालावधीमध्ये, सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता खूप जास्त असते असा सोन्याच्या किमतींचा इतिहास सांगतो, ज्यामुळे ते तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य टिकवून ठेवण्यास मदत करते.

सोन्याच्या किमतीतील बदल

2010 मध्ये सरासरी सोन्याची किंमत ₹18,500 प्रति 10 ग्रॅम होती, जी 2012 पर्यंत वाढून ₹31,050 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचली. जागतिक आर्थिक मंदी आणि अनिश्चिततेमुळे गुंतवणुकदारांनी सुरक्षित आश्रयाच्या शोधात सोने खरेदी केल्याने ही वाढ झाली.
2013 ते 2016 दरम्यान, सोन्याच्या किंमती थोड्या स्थिर राहिल्या किंवा थोड्या कमी झाल्या. जागतिक अर्थव्यवस्थेतील सुधारणा आणि इतर गुंतवणूक पर्यायांमुळे ही स्थिरता आली. तथापि, 2016 मध्ये पुन्हा एकदा किंमती वाढल्या आणि ₹28,623 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचल्या.
पुढील काही वर्षांत म्हणजेच 2017 ते 2020 दरम्यान, सोन्याच्या किंमती काही प्रमाणात कमी झाल्या. जागतिक स्तरावर आर्थिक सुस्थिरता आणि इतर गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणुकदारांचे लक्ष्य केंद्रित होणे यामुळे ही घट दिसून आली. 2021 पासून, जागतिक अस्थिरता आणि महागाई वाढल्यामुळे सोन्याच्या किंमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. 2024 पर्यंत, सरासरी किंमत ₹67,000 प्रति 10 ग्रॅम इतकी पोहोचली आहे.

सोन्यात गुंतवणूक करण्याचे वेगवेगळे पर्याय

सर्वसाधारणपणे सोन्यात गुंतवणूक करायचे सर्व साधारणपणे चार प्रकार असतात. सोन्याचे दागिने, सोन्याची नाणी किंवा वळी, गोल्ड बॅांड्स आणि इटीएफ.

सोन्याचे दागिने

दागिने स्त्रियांसाठी सौंदर्याचा एक अविभाज्य भाग आहेत. ते विविध डिझाईन आणि आकारात उपलब्ध आहेत, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वानुसार निवडण्याची सुविधा मिळते. सोन्याचे दागिने तुमच्या पोशाखाला एका वेगळ्या पातळीवर घेऊन जातात आणि तुम्हाला अधिक आत्मविश्वास आणि सुंदर बनवतात. विविध प्रसंगी तुम्ही सोन्याचे दागिने परिधान करू शकता. लग्न, सण, उत्सव आणि इतर सामाजिक कार्यक्रमांमध्ये ते तुम्हाला एका वेगळ्या लूक देतात.

सोन्याची वळी आणि नाणी

सोन्याचे वळे हा शुद्ध सोन्याच्या पट्टीचा आंगठीसारखा दिसणारा प्रकार असतो ज्यात कोणतीही कारागिरी केलेली नसते. वळ्याची विक्री करताना कोणत्यागी प्रकारची घट येत नाही जी सामान्यत: सोन्याच्या इतर दागिन्यांच्या विक्रीत आपल्याला पहायला मिळते त्यामुळे वळे ही शुद्ध सोन्यातली गुंतवणूक समजली जाते. वळी दागिने बनवण्यासाठी आणि भेटवस्तू म्हणून पण वापरली जाउ शकतात. वळ्यांच्याच धर्तीवर सोन्याची नाणी देखील उपलब्ध असतात

गोल्ड बॉण्ड म्हणजे काय?

गोल्ड बॉण्ड हे सरकारद्वारे जारी केलेले रोखे आहेत. हे बॉण्ड सोन्याच्या किंमतीशी जोडलेले असतात. म्हणजेच, गोल्ड बॉण्डची परिपक्वता मूल्य (maturity value) सोन्याच्या किंमतीवर अवलंबून असते. गोल्ड बॉण्ड खरेदी केल्याने तुम्हाला सोन्याचे दागिने अथवा वळी याची तस्करी, चोरी किंवा नुकसानी यांची चिंता करण्याची गरज नाही. ते सुरक्षितरित्या तुमच्या डीमॅट खात्यात ठेवले जातात. गोल्ड बॉण्डची शुद्धता सरकारद्वारे हमखास केली जाते. दागिने अथवा वळी खरेदी करताना सोन्याच्या शुद्धतेची शंका असू शकते, पण गोल्ड बॉण्ड खरेदी करताना अशी शंका राहत नाही.

काही गोल्ड बॉण्ड योजनांमध्ये, गुंतवणुकदारांना परिपक्वतेपर्यंत दरवर्षी व्याज दिले जाते. हे भौतिक सोन्यावर मिळत नाही.

गोल्ड ईटीएफ म्हणजे काय?

गोल्ड ईटीएफ हा एक प्रकारचा एक्सचेंज-ट्रेडेड फंड (ETF) आहे जो सोन्याच्या किंमतीचा मागोवा घेतो. एखादा गोल्ड ईटीएफ एका ट्रस्टद्वारे समर्थित असतो, ज्यामध्ये भौतिक सोने साठवलेले असते. ईटीएफ यूनिट्स (युनिट्स) शेअर्ससारखेच कार्य करतात आणि स्टॉक एक्सचेंजवर खरेदी-विक्री केल्या जाऊ शकतात.
कोणत्याही प्रकारचे दागिने अथवा वळी खरेदी करण्यापेक्षा अधिक सोयीस्कर आहे. तुम्हाला सोने साठवण्याची किंवा त्याची सुरक्षा करण्याची चिंता करण्याची गरज नाही. गोल्ड ईटीएफ मध्ये अंतर्निहित सोने उच्च शुद्धतेचे असते.
याशिवाय ईटीएफ हे अत्यंत लिक्विड गुंतवणूक आहे. तुम्ही ते स्टॉक एक्सचेंजवर सहजपणे खरेदी आणि विकू शकता.
गोल्ड ईटीएफ मध्ये गुंतवणूक करताना भौतिक सोने खरेदी करताना येणारा मेकिंग चार्जेस आणि स्टोरेज चार्जेस टाळता येतात.
पण गोल्ड ईटीएफ मध्ये गुंतवणूक करताना ट्रस्ट मॅनेजमेंट फी आकारली जाते. ही फी गोल्ड ईटीएफ चालवण्यासाठी लागणाऱ्या खर्चाची भरपाई करते.

सोन्यात गुंतवणूक करणारे काही इटीएफ

सोन्यातील गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना गोल्ड ईटीएफ मध्ये पैसे गुंतवण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी एनएससीने एक संकेतस्थळ चालू केले आहे. या संकेतस्थळ अनुसार रिलायन्स, कोटक आणि युटीआय यांनी सर्वप्रथम २००७ मध्ये गोल्ड  ईटीएफची योजना चालू केली आणि मग भारतातल्या इतरही अनेक कंपन्यांनी स्वतःच्या योजना आणल्या.

  • आदित्य बिर्ला सन लाइफ गोल्ड ईटीएफ
  • Axis गोल्ड ईटीएफ
  • इन्व्हॅस्टको इंडिया गोल्ड ईटीएफ
  • निप्पॉन इंडिया ईटीएफ गोल्ड बीज
  • UTI गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड

सोन्यात होणारी भाव वाढ, त्याचा महिलांना आकर्षित दिसण्यासाठी होणार फायदा, त्यातली गुंतवणूक म्हणून असलेली तरलता या सगळ्या शिवाय अडीअडचणीच्या वेळेस कर्ज मिळवून देण्याची क्षमता या सर्व गोष्टींमुळेच आपले पूर्वज हे सोन्याला पारंपरिक गुंतवणूक मनात आले आहेत.

सारंग खटावकर
सारंग खटावकर
सारंग खटावकर हे मराठी भाषेतील अर्थ साक्षरतेचे जनक मानले जातात. त्यांनी वित्त विषयातील क्लिष्ट संज्ञा सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी मोठे योगदान दिले आहे.

वाचनीय असे काही

error: Content is protected !!