fbpx

माहिती बोनस आणि राईट इश्यूची

आपल्या कानावर बऱ्याचदा एखादी कंपनी बोनस शेअर इश्यू करतीये किंवा राईट इश्यू करतीये असं ऐकू येत. तर हे इश्यू नक्की काय असतात ते आपण बघूया.

बोनस शेअर:
बोनस शेअर या नावातच याचा बराच अर्थ सामावलेला आहे. बोनस शेअर हा एक प्रकारचा बोनस असतो. मात्र, तो शेअरच्या स्वरूपात असतो. एखादी कंपनी आपल्याला शेअरधारकांना बोनस म्हणून अतिरिक्त शेअर देत असते. या शेअरसाठी कुठलेही वेगळे पैसे आकारले जात नाहीत. त्यालाच बोनस शेअर, बोनस इश्यू, स्क्रीप इश्यू किंवा कॅपिटलायझेशन इश्यू असंही म्हणतात.

बोनस शेअरचे बरेच फायदे आहेत. त्यापैकी काही म्हणजे

बोनस शेअर्समुळे मार्केटमधील शेअरची लिक्विडीटी वाढते.
कंपनीकडून बोनस शेअर्स घेताना गुंतवणूकदारांना कोणताही कर भरावा लागत नाही.
बोनस शेअर्स इश्यू करत असतांना मार्केट व्हॅल्यू कमी होते आणि त्यामुळे लहान गुंतवणूकदारांना कंपनीतिला त्यांची गुंतवणूक वाढवणे सोपे होते.
गुंतवणूकदारांचा कंपनीप्रती विश्वास वाढतो.
गुंतवणूकदारांना फायदा करून दिल्यामुळे कंपनीची प्रतिमा उंचावते.

बोनस शेअर्स गुंतवणूकदाराकडे आधीपासून असलेल्या शेअर नंबरवर गुणोत्तरात दिले जातात. जसे की १:१, २:१, ३:१ किंवा १:२, १:५.
म्हणजेच जर एखाद्या गुंतवणूकदाराकडे आधीपासूनच असलेले १०० शेअर्स असतील तर बोनस शेअरच्या इश्यू मध्ये त्याला प्रत्येकी २ शेअर मागे १ शेअर मिळेल. म्हणजेच ५० अतिरिक्त शेअर्स मिळतील.

पण अतिरिक्त शेअर मिळाले म्हणजे गुंतवणूकदाराची गुंतवणूक वाढली असं होत नाही. बोनस शेअर्स देतांना शेअर्सची किंमत मात्र त्याच्या विरुद्ध प्रमाणात कमी होत असते. म्हणजे शेअर्सची संख्या जरी दुप्पट झाली तरी शेअरची मार्केट प्राइस मात्र निम्मी होते. पण एकूण गुंतवणूक मात्र तेवढीच राहते.

उदाहरणार्थ माझ्याकडे टाटा कंपनीचे १५० शेअर्स आहेत आणि प्रत्येक शेअरची मार्केट प्राइस ५० रुपये आहे म्हणजे माझी टाटा कंपनीतील एकूण गुंतवणूक आहे १५०*५०= ७,५०० रुपये.
आता मला प्रत्येक १ शेअर मागे १ असा बोनस इश्यू मिळाला तर माझ्या गुंतवणुकीची किंमत १५,००० न होता ७,५०० रुपयेच राहील. कारण बोनस इश्यू नंतर शेअर ची मार्केट प्राईस कमी होते. मात्र शेअर्सच्या फेस व्हॅल्यूमध्ये कोणताही फरक पडत नाही.
बोनस शेअर्स इश्यू होत असतांना फेस व्हॅल्यू बदलत नाही मात्र डिव्हिडंड जाहीर होत असतांना फेस व्हॅल्यूच्या प्रमाणात जाहीर होत असतो मग आता तुमच्या अकाउंटमध्ये असणारे शेअर्स रात्रीतून दुप्पट झाले तर तुमच्याकडे असणारी फेस व्हॅल्यूच्या स्वरूपातील गुंतवणूक किंवा मूळ गुंतवणूक आता दुप्पट होईल.
उदाहरणार्थ माझ्याकडे टाटा कंपनीचे १०० शेअर्स आहेत आणि प्रत्येक शेअरची फेस व्हॅल्यू १० रुपये आहे आता टाटा कंपनीने २००% डिव्हिडंड जाहीर केल्यास आपल्याला २०० रुपये प्रति शेअर प्रमाणे एकूण २०,००० रुपये डिव्हिडंड मिळेल.
दुसऱ्या वर्षी टाटा कंपनीने १:१ बोनस शेअर्स देण्याचे जाहीर केले तर मला आणखी १०० शेअर्स मिळतील आणि माझ्याकडे एकूण २०० शेअर्स होतील.
आता इथून पुढे कंपनीने पुन्हा २००% डिव्हिडंड जाहीर केल्यास आपल्याला मिळणारा डिव्हिडंड ४०० प्रति शेअर म्हणजे २००*४००=८०,००० होईल.
बोनस शेअर्स जाहीर झाल्यास ज्या प्रमाणात बोनस शेअर्स इश्यू केले जाणार आहेत त्याच्या विरुद्ध प्रमाणात मार्केट प्राईस कमी होते.

राइट्स इश्यू म्हणजे भागधारकांना कंपनीमधील अतिरिक्त नवीन शेअर्स खरेदी करण्यासाठी मिळालेली सवलत. या प्रकारच्या इश्यू भागधारकांचा एक प्रकारे अधिकार असतो.या द्वारे शेअरहोल्डर भविष्यातील नमूद केलेल्या तारखेला बाजारभावावर सवलतीने नवीन शेअर्स खरेदी करू शकतात. कंपनी भागधारकांना सवलतीच्या किमतीत शेअरमध्ये त्यांचे एक्सपोजर वाढवण्याची संधी देतात.
राईट इश्यू च्या अंतर्गत शेअरधारकांना ठराविक प्रमाणात नवीन शेअर्स दिले जातात. कंपनी पैसे जमा करण्यासाठी अनेकदा राइट्स इश्यूचा अवलंब करते. शेअरधारकांकडे असलेल्या शेअर्सच्या संख्येनुसार, राइट्स शेअर्स त्याला विकले जातात. जर राइट्स इश्यूचे गुणोत्तर ५:१ चा असेल, तर गुंतवणूकदाराला ५ शेअर्समागे १ राईट शेअर विकला जातो. .
राइट्स इश्यू आकर्षक बनवण्यासाठी त्यांची किंमत सध्याच्या बाजारभावापेक्षा कमी ठेवली जाते. आणि कंपनीच्या भांडवलात वाढ होते.

राइट्स इश्यूमध्ये कंपनी शेअरधारकांना शेअर्सच्या किंमतीत सवलत देते.
उदाहरणार्थ जर एखाद्या कंपनीच्या शेअरची किंमत स्टॉक एक्सचेंजवर ५०० रुपये असेल, तर कंपनी राइट्स इश्यूमध्ये त्याला 10 टक्के सूट देण्यात येईल. तर यामुळे तुम्हाला कंपनीचे अतिरिक्त शेअर्स खरेदी करण्यासाठी ४५० रुपये प्रति शेअर द्यावे लागतील.

कंपनी पैसे उभारण्यासाठी राइट्स इश्यू आणते. बऱ्याच वेळा कंपनी व्यवसायाच्या विस्तारासाठी किंवा दुसऱ्या कंपनीच्या अधिग्रहणासाठी पैसे गोळा करण्यासाठी शेअर होल्डर्सला अधिकार जारी करते. तर काही कंपन्या कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी देखील यापद्धतीचा अवलंब करतात.

ऋता कुलकर्णी
ऋता कुलकर्णी
ऋता ही कायदेतज्ज्ञ असून तिने आर्थिक व्यवहारांचे ज्ञान सुलभ होऊन ते सामान्य मराठी माणसांपर्यंत पोहोचावे म्हणून अर्थसाक्षरता नावाचा उपक्रम चालू केला आहे.

वाचनीय असे काही

error: Content is protected !!