शब्दांच्या मागचे शब्द: मनोगत 

मनोगत.

मराठी  भाषेचा अभ्यास झाला पाहिजे, व्याकरण आणि शुद्धलेखनाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, भाषा जबाबदारीने हाताळायला हवी हे असं आपण अनेकदा ऐकतो, वाचतो. मी सुद्धा असेच काहीसे कानउघाडणीपर बोल एका ज्येष्ठ व्यक्तीकडून ऐकले. त्यांचं कळकळीचं बोलणं ऐकताना फार जाणवत गेलं की आपलं शिक्षण जरी मराठी माध्यमातून झालेलं असलं आणि आपण थोडंफार लिहीत जरी असलो तरी मराठीकडे अभ्यासपूर्ण दृष्टीने कधी बघितलंच नाही. अमुक एक शब्द हा असाच का लिहायचा, त्यामागचा इतिहास काय, अमुक दोन शब्द आपण आलटून-पालटून वापरतो ते बरोबर आहे की त्या शब्दांच्या योजनेमागे काही कारण आहे, कुठले शब्द संस्कृतमधून / प्राकृतमधून आणि कुठले इतर भाषांमधून आले आणि मराठीत स्थिरावले? हे आणि असे असंख्य प्रश्न मनात घेऊन मी त्यादिवशी परतले. लेखन करताना, वाचताना आपण किती आंधळेपणाने लिहितो किंवा वाचतो हे फार प्रकर्षाने जाणवलं.  

त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची सुरूवात मनात झालीच होती, आता ती कृतीत आणणं अत्यावश्यक होऊन बसलं. मग हाताशी असलेली आणि कुठंतरी कोपऱ्यात स्थान मिळालेली शुद्धलेखन, व्याकरणावरची पुस्तकं वरती काढून, त्यावरची धूळ झटकून वाचायला सुरूवात केली. मनात एखाद्या शब्दाबद्दल प्रश्न उभा राहिला की जवळ असलेला एकमेव शब्दकोश चाळू लागले. पण मी जो काही अभ्यास करतेय तो बरोबर दिशेनं चाललाय हे कसं कळेल किंवा आपण एकाच बाजूने विचार करत असू आणि याला इतर अनेक पैलू असतील तर ते कळणार कसे, हे प्रश्न उभे राहिले. मग एके दिवशी विचार आला की दररोज किंवा आठवड्यातील ठराविक दिवशी एक पोस्ट करून फेसबुकवर का टाकू नये? त्यावर चर्चा होईल, टीकाही होऊ शकेल पण त्यानेच पुढची दिशा सापडेल. त्यातून #मराठीभाषा हा उपक्रम जन्माला आला.

या उपक्रमाला फेसबुकवर उदंड प्रतिसाद मिळाला आणि अतिशय ज्ञानी, विचारवंत, मराठीचे अभ्यासक याबरोबरच मराठीविषयी आत्यंतिक जिव्हाळा असलेली सजग माणसे या उपक्रमाशी जोडली गेली. त्यांनी अनेक सूचना केल्या, शंका उपस्थित केल्या, चुका दाखवून दिल्या, काही वेळा घणाघाती चर्चा घडून आल्या आणि या उपक्रमाचा उद्देश सफल झाला. एका शब्दकोशावरून मी आठ शब्दकोशांचा संदर्भग्रंथ म्हणून वापर करण्याइतपत मजल मारली. हे सदर या उपक्रमाचीच परिणती आहे, असे म्हणायला हरकत नाही.  पण मग इतके शब्दकोश उपलब्ध असताना पुन्हा एखादे शब्दांचा मागोवा घेणारे सदर कशासाठी? हा प्रश्न मनात येणे स्वाभाविक आहे. त्या दृष्टीने या उपक्रमामागची उद्दिष्टे जाणून घेणे क्रमप्राप्त आहे. 

 #मराठीभाषा या उपक्रमाच्या अनुषंगाने अभ्यास करताना मला जाणवलेल्या अनेक गोष्टी याला कारणीभूत आहेत. जसे- 

अगदी सारख्या वाटणाऱ्या आणि व्यवहारातही एकमेकांना पर्याय म्हणून वापरल्या जाणाऱ्या शब्दांच्या अर्थातील सूक्ष्म भेद (उदा. आमंत्रण-निमंत्रण, पाहणे-बघणे, पुरातन-सनातन),

  • इतर भाषांमधून मराठीत रुळलेले शब्द (उदा. मखलाशी, गोषवारा, ऐन),
  • एखाद्या शब्दाचा केवळ अंधानुकरणापोटी केला जाणारा चुकीचा वापर (उदा. प्रच्छन्न, निर्वाच्य),
  • काही म्हणी/वाक्प्रचारांचा डोळस अभ्यास (उदा. ताकास तूर लागू न देणे, मूग गिळून गप्प बसणे),
  • एका वेलांटी/ काना-मात्रेने अर्थात पडलेला फरक (सलिल-सलील, मिलन-मीलन),
  • वापरात असलेला एखादा शब्द शब्दकोशांत नसल्यामुळे उडणारा गोंधळ (उदा. बहुदा-बहुधा),

लिहिताना हमखास शुद्धलेखन अथवा व्याकरण चुकणारे शब्द (उदा. शुद्धलेखन, भयंकर, य:कश्चित् / यत्किंचित) वगैरे.    

दुसरे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे या निमित्ताने सर्व कोशकर्त्यांचे मी आभार मानू इच्छिते. आजच्या काळातल्यासारखी प्रगत साधने हाताशी नसतानासुद्धा त्या काळातल्या मर्यादित साधनांच्या आधारे इतकी शब्दसंपत्ती एकत्रित करून ती क्रमवार निबद्ध करणे हे सोपे काम नव्हते. विविध शब्दकोशांमधून शब्दाच्या वेगवेगळ्या संज्ञा, शब्दार्थ, व्युत्पत्तीचे स्रोत, व्याकरणाच्या दृष्टीने त्या शब्दांचा केलेला ऊहापोह हे भांडार पाहिलं की थक्क व्हायला होतं. एकाच शब्दाविषयी या शब्दकोशांमधून खूप वेगवेगळी माहिती सहज उपलब्ध होते, परंतु आजघडीला त्याचे एकत्रित संकलन मात्र उपलब्ध नाही. तेव्हा जाता-जाता अशा माहितीचं मर्यादित स्वरूपात का होईना पण एकत्रीकरण होणं, संकलन होणं, हे ही या उपक्रमाचे फलित.  थोडक्यात सांगायचं तर एखाद्या शब्दाचा अभ्यास करून त्या शब्दाची व्युत्पत्ती, त्यातून निर्माण झालेले इतर शब्द, त्या शब्दाचा भाषेत उपयोग हे माहिती असेल तर तो शब्द समजायला सोपा जातो आणि त्याचा वापर करताना काळजी घेतली जाते; हे अनुभवातून आलेलं शहाणपण शब्दांच्या मागचे शब्द हा मराठी भाषेला समृद्ध बनवण्याच्या दृष्टीने केलेला आमचा खारुताईचा प्रयत्न  या सदरामागे आहे. मात्र हे सगळे करताना व्याकरणाच्या नियमांचा आवश्यक तिथे फक्त संदर्भ घेतलेला आहे, हे लक्षात घ्यायला हवे. व्याकरणाचे नियम शुद्धलेखनाच्या पुस्तकात आधीच उपलब्ध असल्याने ते इथे उद्धृत करणे योग्य वाटले नाही.  

या उपक्रमाची सुरूवात जून २०१८ मध्ये झाली आणि आजही हा उपक्रम सुरु आहे. या सगळ्या पोस्ट एकत्रित करून मांडल्यास त्यात आणखी सुसूत्रता, सुसंबद्धता येईल असे वाटले. म्हणून हा प्रपंच !

अर्थातच शब्दांच्या मागचे शब्द हे सदर  सुफळ संपूर्ण नाही आणि होऊही शकणार नाही याची पूर्ण कल्पना आहे. मराठी भाषेचे शब्दवैभव इतके असीम आहे की ते माझ्या एवढ्याशा मुठीत मावणे केवळ अशक्य. त्या दृष्टीने काही त्रुटी राहिल्या असतील तर ती पूर्णतः माझी मर्यादा आहे. जे या सदरात मांडले आहे ते समजण्यास साधे, सोपे, सुलभ असेल आणि व्यवहारात भाषेचा उपयोग करताना उपयोगी पडेल याची काळजी घेतली आहे.  बाकी, ‘इदं न मम’ या भावनेने हे सदर वाचकांच्या हातात ठेवते आहे.   

लोभ असावा ही विनंती.  

धन्यवाद ! 

– नेहा लिमये  

नेहा लिमये
नेहा लिमये
मराठी भाषेच्या अभ्यासक. डिजिटल मीडियासाठी लघुकथा, लेख आणि ललितलेखन तसेच मराठीतून कायदेविषयक माहिती देणारे लेखन.#मराठीभाषा उपक्रमाला २०१९ मध्ये महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाचा उत्कृष्ट डिजिटल कंटेंटसाठीचा सन्मान प्राप्त. व्यवसायाने कंपनी सेक्रेटरी. गेले १५ वर्षे कंपनी कायदा, सेबी रेग्युलेशन संदर्भात सेवा व सल्लागार म्हणून कार्यरत.

TOP 10 TRENDING ON NEWSINTERPRETATION

Melania and Barron Trump caught in stunning fallout from new GOP plan to end dual citizenship

A new proposal from Senator Bernie Moreno, a MAGA-aligned...

Explosive Senate memo ignites storm over Harvard’s new board member and her ties to Epstein’s financial network

Harvard University has appointed Paul B. Edgerley, Mary Callahan...

Olivia Nuzzi accused of feeding Kennedy Jr. insider intel, suppressing scandals and influencing 2023 campaign decisions

A shocking political scandal has emerged involving Robert F....

Upbit reports largest breach in six years with $36.9 million in stolen assets

South Korea’s largest cryptocurrency exchange, Upbit, faced a major...

Related Articles

Popular Categories

error: Content is protected !!